औत,,,
औत,,,
माझा बाप जव्हा काळ्या
ढेकळातून औत हाणतो,
तव्हा निथळणाऱ्या
घामाच्या धारातून
सोन पिकवण्याचा ध्यास घेतो.
सारा जल्मच नशिबाच्या
हवाली सोडून
डोळे जव्हा पावसाची
चातकासारखी वाट पाहतात,
तव्हा माझा बाप मात्र
काळ्या ढेकळा संग
खेळण्यातच दंग असतो.
भेगाळलेल्या भुईलाही
टाके घालण्याची ताकद
माझ्या बा च्या जिद्दीत हाय,
म्हणूनच बा चा औत
आजही दिमाखात चालू हाय.
ऊन पावसाचा खेळ खेळत
नशिब कवा बी दगा देत,
पर बापान मात्र औताच
नाद कधीच नाय सोडला,
अन् बेफिकीर पाऊस बी
माझ्या बापाच्या नशिबाला
कधीच नाय लागला.
साऱ्या जिंदगीचा
दुष्काळ पेलवून
माझ्या बापानं औत हाकला,
अन् महया शिक्षणाकरिता
मला मात्र औतापासून कायम दूर ठेवला.
बाप मात्र आयुष्यभर औतावरच राहिला.
आता औतावर कविता लिहिताना
मला माझा बाप आठवतो,
अन् मी मात्र चार ओळी
लिहून मोकळा होतो. "
किती हाकला
मी औत
तरी माझीच
झाली मौत."
