अभिव्यक्ती स्त्री मनाची
अभिव्यक्ती स्त्री मनाची
अभिव्यक्ती स्त्री मनाची
असे नित अलवार
निसर्गतः तिचे मन
फार फार हळूवार
कधी तिची अभिव्यक्ती
खूप असते साजूक
जशी फुले अबोलीची
माळी केसात नाजूक
कधी असे प्रेमळशी
सायीसम मऊ मऊ
प्रेम माया वर्षावाने
कुटुंबाला घाली न्हाऊ
कधी ती शांत निवांत
नंदादीप देवळात
समईचे मंद तेज
दिसे तिच्या नयनात
कधी ती आक्रमकही
क्रोध असा आवेशाचा
अन्यायाला वाचा फोडी
वेग जणू त्सुनामीचा
आता तिची अभिव्यक्ती झालीय खुली
ती मागे वळून बघणार नाही मुळी
खुले झाले सारे आकाश
घेई कवेत सारे अवकाश