आई
आई
आई म्हणजे वात्सल्याची मंगल मूर्ती ।
आई म्हणजे देवावरची अचल भक्ती ॥
संकटांना हरण्याची ही अमोघ शक्ती ।
आई म्हणजे सर्व सुखांची इच्छापूर्ती ॥
कृष्ण सखा जव महाभारती ।
अर्जुनाचा होई रथ-सारथी ॥
न धरी शस्त्र करी, सांगे युक्ती ।
तशीच माता ह्या संसार - पथी॥
संसाराच्या यज्ञामध्ये माय जळुनी देई आहुती ।
कन्या व्हावी सबल, सक्षम ; एकच देवा करे विनंती ॥
अपत्यास लाभो सुखशांती, आयुर्बल अन् आरोग्यप्राप्ती ।
नसे कोणती तिला कामना, नको जगी तिज ख्याती - कीर्ती ॥
आईसारखी न कुणी दुजी प्रतिकृती ।
माय-माऊली असे अद्वितीय जगती ॥
जन्म दिला मज ज्या आईने पृथ्वीवरती ।
नतमस्तक मी सदैव तिच्याच चरणांवरती ॥
