२१ व्या शतकातला बाबा
२१ व्या शतकातला बाबा


घरात बाळाच्या आगमनाचे समजताच
त्याच्या आनंदाला पारावर नसतो
उत्साहात सगळं घर डोक्यावर घेऊन
तो बायकोचा भावनिक आधार बनत असतो
हा २१ व्या शतकातला बाबा असतो...
येणाऱ्या बाळाशी संवाद साधायला
आपल्या मिटींगही तो कॅन्सल करीत असतो
आता त्याच्या प्रायोरिटीमध्ये
बाळालाही तितकेच महत्त्व देत असतो
हा २१ व्या शतकातला बाबा असतो...
आजपर्यंत चार हात दूर राहणारा बाबा
आता बाळाच्या जवळपास येताना दिसतो
आपल्या बाळाच्या छोट्या छोट्या हालचाली
तोही जवळून अनुभवत असतो
हा २१ व्या शतकातला बाबा असतो...
मोडेल व वाकणार नाही असणारा बाबा आता
आपल्या बाळाची नॅपी बदलायला लाज बाळगत नसतो
शिस्तबद्ध असला तरी आपल्या बाळासाठी
तो आता थोडा बदलायला तयार असतो..
हा २१ व्या शतकातला बाबा असतो...
परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून कान उघडणी क
रणारा
बाबा आता, न रागावता प्रेमाने धीर देत असतो
चार शब्द कौतुकाचे बोलून
आपल्या बाळाचा आत्मविश्वास वाढवित असतो
हा २१ व्या शतकातला बाबा असतो...
मोजकेच बोलणारा, दुरुनच विचारपूस करणारा बाबा आता
आपल्या बाळाशी वेळोवेळी संवाद साधत असतो
पालकाची भूमिका निभावत एक मित्र म्हणूनसुद्धा
आपल्या बाळाच्या मनात जागा निर्माण करीत असतो
हा २१ व्या शतकातला बाबा असतो...
आयुष्यात बऱ्याच तडजोडी करूनही आपल्या बाळाच्या
खांद्याला खांदा लावून तो उभा असतो
आपली राहिलेली स्वप्नं साकार करण्याचा अट्टाहास न करता
"तुला आवडेल ते शिक" म्हणून पाठिंबा देत असतो
हा २१ व्या शतकातला बाबा असतो...
कठोर, अबोल, गंभीर असलेला बाबा आता
आपल्या बाळाजवळ सहजपणे व्यक्त होत असतो
तो कालचा असो किंवा आजचा असो
आज मात्र तो वेगवेगळ्या रूपाने समोर येत असतो
हा २१ व्या शतकातला बाबा असतो...