करू या स्वागत नवं वर्षाचे..!
करू या स्वागत नवं वर्षाचे..!
बघता बघता वर्षाच्या शेवटच्या दिवसाची पहाट झाली,
परत एकदा येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी.
"नवे वर्ष ,नवा संकल्प ' असेही म्हणतात
त्याप्रमाणे झाले गेले सारे विसरून,
आपण नव्याने सुरुवात करायला हवी.
मनात साचलेल्या अगणित गैरसमजुतीची पोतडी सोबत घेऊन नवीन वर्षाचे स्वागत कसे होणार?
सतत मनाच्या गाभ्याऱ्यात झालेल्या गोष्टींचा आराखडा तयार करून कुढत जगण्याची इच्छा करणे, चुकीचेच ना!!
मनात साचलेल्या कुत्सित विचारांनी
कोणाचेही भले होतं नाही.
याउलट आपणच संवादाचे मार्ग बंद करून घेतो.
झालेल्या गोष्टी विसरून गेलो, असं होत नाही.
परंतु त्यांना आठवून जर आपल्याला त्रास होत असेल
तर त्या आठवणी जाग्याच करायचा नाही ना..!
कारण, साठवून ठेवलेल्या आठवणी तुम्हाला
आनंद कमी आणि दुःखी जास्त करीत असतात.
विसरून जाणे सोपी नाही,
परंतु अशक्य मात्र मुळीच नाही.
हे सर्वस्वी आपल्या वागण्यावर, विचारांवर
आणि कृतीवर अवलंबून आहे.
आपण कसे वागावे, हे कोणीही आपल्याला सांगत नाही.
आपण तेच करतो जे आपलं मन आपल्याला करायला भाग पाडत असतं..
आपण मनाचे गुलाम आहोत की ,आपले मन आपल्या कंट्रोलमध्ये असावे ? हे पडताळून बघणे गरजेचे आहे.
सुख दुःखांची मोजणी आयुष्यात प्रत्येक व्यक्ती
आपल्या कर्मा प्रमाणे भोगतच असतो.
तेव्हा आपण आनंदी राहून येणाऱ्या काळाला उत्साहाने साजरे करावे, की आपले दुःख सतत उगाळून दुःखी-कष्टी राहून जगावे हा निर्णय आपलाच असतो..!
दुसऱ्याच्या आनंदात आपल्याला सुद्धा
आनंदी होता आले पाहिजे,
तेव्हाच खरा आनंद उपभोगता येतो.
आपल्या मनाचा आपल्या शरीराशी घनिष्ठ संबंध आहे.
मनासारखे झाले नाही म्हणून सतत नकारात्मक विचार
ढवळत बसून ,
" माझी कोणाला गरज नाही"
" मला कोणी विचारात नाही."
" लोकं काय म्हणतील "
असे विचार करून नैराश्य जवळ करून घेतो.
त्याला कुरवाळत बसतो.
आणि डोळ्यासमोरच्या आनंदी क्षणांना मुकत असतो.
आणि त्याचा परिणाम म्हणून आपले
मन आणि शरीर कायम अस्थिर असते.
जगात कुठेही आनंदाचे क्षण सांगून येत नाही.
आपला आनंद इतरांनी मध्ये नाही तर
आपल्याच जवळ असतो, ह्याचा विसर
मात्र आपल्याला पडलेला असतो.
"आपण आनंदी तर, आपले सभोवताली
असलेलं जग आनंदी "
हे साधं आणि सोपं समीकरण आहे.
न मिळाल्याले सुख, गत काळात सोसलेल्या हाल अपेष्टा,
झालेला अपेक्षाभंग ह्यांची कायम उजळणी करून ,
मनात सतत जपून ठेवायचे,
की येणाऱ्या काळात
अनेक सेल्फीचे क्षण गोळा करून
आपले जीवनाचे खाते निरागस आनंदाने भरायचे
हे आपले आपणच ठरवू या आणि
नवीन वर्षाच्या स्वागत करू या!
