उदरी गर्भातूनी फुटतो पाझर मायेचा
तैसी माय मराठी शब्द-शब्द जिव्हाळ्याचा
जशी फुलावी सुमने भ्रमर पाहूनी वेलूचा
माय मराठी उमगावी धरुनी हाथ तान्हुल्याचा
लडीवाळ मराठी हट्ट धरुनी ममतेचा
कणखर बाणा मराठी उर पेटवून शौऱ्याचा
मधुर गाण मराठी कंठी ठाव कोकीळेचा
हास्य अन दुःख स्वप्नी मराठमोळी माय भाषेचा
जोजव बाळास अंगाई झुला माय मराठीचा
जिजा शिवाची गाथा ध्यास मराठी मातेचा
संत थोराच्या अभंगात मर्म मराठी मायेचा
भातुकलीच्या डावात रुसवा मराठी भावनेचा
माय मराठी गे आई कुंकू भाळी सौख्याचा
माय दळी प्रपंच मराठी जात्यावरल्या गाण्याचा
बाप पाखरं हाकीतो नाद मराठी घुमण्याचा
मोट खिल्लार बैलाची साज मराठी गीताचा
धाव वारकरी घेई गजर किर्तनी मराठीचा
शिव मल्हार गोंधळी जागर मराठी मायेचा
तुका वैकुंठी नाचे गौरव मराठी गाथेचा
ज्ञाना समाधीत तृप्त ग्रंथ मराठी ज्ञानाचा
ओठी अमृताची गोडी घोट माय मराठीचा
भाव मराठी-मराठी गंध मराठी भाषेचा
मधुर सुरांची मैफील सोहळा मराठी वाणीचा
माय लेकराची सत्वर अभिमान मराठीचा