सखी सावित्री
सखी सावित्री
चैत्राची ती रम्य पहाट. नदीच संथ वाहणार पाणी. मंदिरातील घंटानाद आणि सोबत आरतीचे कर्णमधुर बोल. पक्षांचा किलबिलाट कानाला सुखद अनुभव देत सुर्यनारायणाला अभिवादन करून ती घरटी सोडत होती. दावणीची जनावरे धन्याच्या हाकेला ओ देत जागी झाली होती. सुर्याची पाखर सर्व दुर हळूहळू पसरत होती आणि वातावरणात उबदारपणा तयार करत होती. कुण्या देवतेने या भूतलावर मुक्काम करावा आणि त्याच्या फक्त सहवासाने वातावरणात बदल व्हावा.एखाद्या ऋषीच्या पावनस्पर्शाने या धरेला कृत्य कृत्य वाटव आणि तीन आपण होऊन आपली प्रसन्नता दाखवावी अशीच काही सौदर्याची मुक्त उधळण चौफेर दिसत होती.
रामा थकल्यामुळे आजुनही अंथरुणात पहुडला होता. त्याने भावडया शिवड्याच्या घंटीचा नाद ऐकला पण ऐकून न ऐकल्या सारख केल अन पुन्हा लोळु लागला.आल्हाद डोळे उघडत सावित्रीने बुचुडा बांधला अन हलकेच एक नजर मुलांकडे पाहिले. शांतचित्ताने मुले झोपलेली होती. झोपेलाही जबाबदारीच एक भान असत ना. कमरेला पदर खोचुन ती घरातील कामे आवरायला लागली. आहो उठा किती उशीर? अस म्हणत म्हणत हंडा घेऊन पाण्याच्या टाकीकडे ती निघाली. वेळ होतोच या भावनेने राम उठला आणि थेट गोठ्यात गेला. जोडी मस्त त्याच्याकडे पाहत होती. मालक दिसला की कसे खुलतात भारी? मालकाने पाठीवर थाप मारली कि बस आता काहीही काम द्या आम्ही तयार अशीच भावना त्यांची. गाई आणि जोडी बाहेर बांधून रामा चंदी बनवायला गोठ्यात गेला. घमेलभर चंदी खाऊन सगळी जनावर खुश झाली. रामान आटोपत घेतल शेतातील बरिचशी काम आजुन बाकी होती. आपल्याला घाई करायला पाहिजे अस तो सावित्रीला सांगतच होता.लगबगीने त्याने अंघोळ केली. झाला का चहा ? असा आवाज येताच. तिने चहा त्याच्या पुढ्यात दिला. मी घाईने जातो बाकिची काम उरकतो तु लवकर ये अस सांगून बैलगाडीला मागे गाई बांधून ते लोढण घेउन शेतात गेला. बैलगाडी सोडुन उंबराच्या पारावर गेला म्हसोबाच्या पाया पडला माती कपाळावर लावली अन शेतात नांगरट करायाला लागला. कालचच वावार आजुन बाकी होत आणि नांगरट पण कडक जात होती.
इकडे सावित्रीने चुल, घर सारवून घेतल. पाणी भरल. भाकरी थापल्या फक्कड कोरड्यास बनवल अन लागली गनु आणि शिवलीच्या मागे. अर उठा आज शाळा आहे पटापट उरका बर अस म्हणत म्हणत हातातली काम हातावेगळी करत होती. सर्व काही उरकून शेतातपण जायच होत तिला. मुलानी अंघोळी केल्या अन शाळेत गेली. भाकऱ्या बांधून डोक्यावर घेतल्या अन घराला ठोकल टाळ अन निघाली झपाझप शेताकडे. बराच वेळ झाला होता रामान जोडी आंब्याच्या गर्द सावलीत बांधली आनलेली वैरण टाकली अन भाकरी खायला बसला. इकडच्या तिकडच्या गप्पा चालुच होत्या. खालच्या, वरच्या, माळाच्या ,विहिरीच्या, आंब्याच्या शेतात काय काय करायच याची गोळाबेरीज जोडी करत होती. एकमत करून शिक्कामोर्तब करत होती. तेवढ्याच बालबा रामाचा चुलतभाऊ आला. काहीतरी कामाशिवाय हा इकडे कसा हा कयास सावित्रीने बांधला. बाला जवळ आला गप्पांना सुरुवात झाली. नांगरणी, चारापाणी अशा गप्पांमध्ये आपण कशाला आलो आहोत हेच विसरला. त्यांना मध्येच टोकत तिने काय काम काढल दादा ? अस बोलून विषय बदलला. अर हा माझी विहिरीतली पानबुडी पाणी सोडत आहे जरा चाल कि मदतीला दोघही आम्ही आहोत पण पाच ची मोटार जास्तच जड आहे बुवा येताल काय लगेच. मोठा भाऊ कायम कामात मदतीला धावणारा रामा नाही म्हणु शकला नाही. भाकऱ्या तिथेच खटारगाडीत ठेवून तिघेही बालाच्या विहिरीकडे निघाले. विहीर साठ फुटी खाली पहाव तर चक्कर यावी अशीच खाली रांजनागत डेरा बनवलेली वरती बांगडी कड ताकलेल पाणी खोल त्यामुळे मोटार पाणी सोडत असेल त्यामुळे वरती पाणी येत नाही असा साधा कयास बालाचा होता. ठिक मोटार वरती काढायची, फुटबॉल चेक करायचा अन बाकी काही नटबोनटचा बिघाड पहायचा अस ठरवुन बाला अन रामाने मोटार वरती खेचायला सुरुवात केली. पाईप धरायला सावित्री आणि जना. वायर अन नाड्यावर बालाचा म्हतारा बा अन ते दोघे वाघ. सरसर करत मोटार वर काढली अन सगळे घामाघुम झाले. सोप काम नाही मोठ्या धिराच काम पण दोघांनी बेताबेताण मोटार काढली.
सर्व काही व्यवस्थितआहे याची खात्री करून मगच पुन्हा मोटार सोडायच ठरवल कारण पुन्हा पावसाळ्यात काढता येत नाही. पुन्हा पुन्हा पाहुण दोघा भावानी खात्री केली अन लागले कामाला जना सावित्री पुन्हा पाईप पकडून होती बा दोर आणि वायर पकडुन. दोघेही विहिरीच्या कड्यावर उभे राहून मोटार हळूहळू सोडत होती. क्षणात काय झाले अन काय एक तीव्र झटका लागल्याप्रमाणे रामा कठड्यावरुन उडाला तो थेट साठफुटी विहिरीत कोसळला मोटार दगडावर टेकली तिला बालाचा आधार होता.रामा क्षणात नाहिसा झाला. कुणाला काही कळायला तयार नाही. क्षणभर सर्व स्तंभीत झाल्यासारखे झाले. काय झाल आहे हेच कळेना. कोणाच्याही तोंडातुन शब्द फुटेना. सावित्रीच तर काळीज उडाल अन ती गंभीर झाली. झालेला प्रकार भयानक होता. बालाने मोटर कशीबशी दगडाला कुंटवली. आणि रामा आवाज देउ लागला. रामा ये रामा ये रामा माझ्या रामा माझ्या कर्मा माझ्या विठ्ठला धाव र ये रामा ये रामा. जना आणि बा दोघेही आवाज देत होते. सावित्री मात्र शुद्ध हरपल्या सारखी बसली होती. आपला धनी पडला याने ती पुरती खचली तिला शब्द फुटेना. तिला काय कराव याची सुध राहीली नाही. फतकल मांडून ती शेतातच बसली.जना पळत तिच्यापाशी गेली तिला सावरण्याचा प्रयत्न करु लागली. वीस मिनिटे झाली कोणत्याही प्रकारचा आवाज किंवा प्रतिसाद विहिरीतुन येइना. बालाच्या तर पायाखालची जमीनच सरकली होती. बा ची धडधड स्पष्ट दिसत होती. बाला भान हरपून नुसता रामा रामा ये रामा हाक मारत होता पण त्याला काही यश येइना. आपल्याला काहीतरी करायला पाहिजे रामाला वाचवला पाहिजे पण कसा काय कराव कस कराव कोणाला बोलवाव काय केल म्हणजे रामा दिसेल असे एक ना नाना विचार त्याच्या बधिर झालेल्या डोक्यात येत होते पण मार्ग काही सापडेना. त्याचे डोळे फक्त फक्त रामाचा धाव करत होते. आपण हे काय विपरीत केल याच्या नुसत्या जाणीवेने तो अर्धमेला झाला होता पण हो हो आपल्याला काहीतरी करायल हव. इतक्यात सावित्री अशी आर्त हाक कानावर पडली. रामा रामा बोल मी आहे इथ बोल.तु ठीक आहे ना माझा आवाज येतोय ना रामा रामा ऐकतोय ना रामा रामा. पुन्हा एकही आवाज नाही पुन्हा निराशेच्या गर्तेत सगळे गेले. रामाला जबर मार बसला आहे आणि तो विव्हळत आहे आणि आपण काहीच करु शकत नाही याचा संताप बाला करत होता. सावित्री नुसत्या एका हाकेने सर्व प्राण एकवटून विहिरीच्या काठावर आली. हो बोला आहो बोला मीच आहे बोला आहो बोला एकदाच आवाज द्या एकदा आवाज द्या. अशी आर्त विनवणी करायल लागली आणि मोठ्याने हंबरडा फोडायल लागली.
काही क्षण जाताच पुन्हा सावित्री सावित्री मी इथ खाली आहे माझ्या डोक्यावर मोटार आहे. माझ्यावर मोटार पडेल ती बाजुला घ्या. पहिले मोटार बाजुला घ्या. आता रामा काय बोलतोय हे कळायला तयार नव्हत कारण मोटार आजुन वरतीच होती पण हा काय बोलतोय हे समजायला तयार नव्हत. पण बाला त्याच्या होला हो म्हणत म्हणाला हो रामा आम्ही मोटार वर घेतली तु आहे कुठे पण मी दगडाच्या एका कपारीला धरून बसलो आहे. मला वरती काढा मला वरती काढा मला खुप भिती वाटतेय काहीतरी करा सावित्री काहीतरी कर. आता सावित्रीच्या जिवात जीव आला आपल कुंकु आबादित आहे या नुसत्या भावनेने हत्तीच बळ तिच्या अंगात आल. तीने आवाज दिला अन म्हणाली तुम्ही फक्त थोडा धीर धरा आम्ही तुम्हाला वरती काढतो तुम्ही घाबरु नका. सावित्रीचे विचारचक्र फिरायला सुरुवात झाली. ती बालाला म्हणाली तुम्ही यांच्याशी फक्त बोलत राहा यांना सुधीवर ठेवा मी घरी जावून नाडा घेउन येते तुम्ही माझ्यासाठी एवढेच करा कि त्यांना फक्त बोलते ठेवा. सावित्री हरणाच्या वेगाने गावातील घराकडे निघाली.तिची अवस्था जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्या हरिणासारखीच झाली होती. थोडीही उसंत तिला आपला पती जीवानिशी जाईल अशीच जाणीव करून देत होती.
पावलागणिक ती रामाच्या आठवणीने व्याकुळ होऊन आसव गाळत होती. ऱामा मागे आपल कस मुलांच कस याच्या नुसत्या विचाराने मी वेडी होइल अशीच भावना तीची होती. कोणाची दृष्ट्य लागली आमच्या संसाराला असे ,काही काही विचार तिच्या डोक्यात डोकावून जात होते. पण पावलांचा वेग मात्र कमी झाला नाही काहीही झाल तरी आपल्याला आपल कुंकु वाचवायच आहे याचा ठाम विश्वास तिला होता. घरी गेली दार उघडल नाडा घेतला दार तसेच सताड उघड ठेउन ती पुन्हा वाट चालु लागली. ही वाट सावित्रीला सत्यवान भेटेल कि नाही याची अग्नीपरिक्षाच होती. विचारचक्राला आणखी गती आली तशी तिची पावल जमीनीवर न टेकता हवेतच पळत होती.झपाझप तिने विहिरीमध्ये दोर सोडला अन रामाला दोराला पकडून वरती या अस सांगु लागली. रामाच्याही जिवात जीव आला. रामा आता सर्व प्राण एकवटून दोराने वर येण्याचा प्रयत्न करु लागला पण आंगाला सुटलेला थरकाप आणि जखमांमुळे त्याला दोराला पकडून ठेवण्यापलीकडे काही करता येइना. पुन्हा पुन्हा ताकद एकवटून तो वरती येण्याचा प्रयत्न करत होता पण छे सर्व निष्फळ. सावित्री अन बाला यांचे मंत्रबोध शुन्य झाले. ऱामाला जास्तीचा जबर मार बसलाय कि हात पाय मोडलाय कि हा लुळा झालाय काहीही विचार यायला लागले. सावित्री पुन्हा पुन्हा ओरडून दोर सोडु नका सांगत होती. पण नुसता दोर पकडुन उपयोग काय? रामा वरतर येत नव्हता. दोघांनाही काय कराव सुचेना जीव तर नुसता कासावीस होत होता आता काराव काय? बा अनुभवी म्हातारा त्याला येवढ्या गडबडीत सुचला उपाय तो सावित्रीला म्हणाला सावे त्याला सांग दोर सोडु नको आणि तो आपल्या कमरेला भक्कम बांध आणि हाताने दोर पकडून रहा आम्ही दोर ओढला कि पायाने हळूहळू वरती सरकत रहा. बा ने सांगितलेले तसच्या तस तिने रामाला सांगितले. थोडा दोर ओढला कि रामा थांबवत होता पुन्हा पुन्हा दोर मजबुत करत होता. इकडे हे तिघेही शक्ती एकवटुन दोर वरती ओढत होते. बरोबर मधोमध रामा आला असेल तेच यांच्या हातून दोर सुटला तो सरसर करत रामा पुन्हा पाण्यात पडला मोठा आवाज झाला. सगळे पुन्हा धावले. पुन्हा ताकदीने दोर ओढायला सुरुवात केली. ऱामाला पुन्हा एकदा तीव्र झटका लागला कसाबसा सावरत त्याने पुन्हा दोराला धरले आणि पुन्हा वरची वाट चालु लागला. त्या तिघांचे हात दोराने सोलपाटुन निघाले पण आता हार मानायची नाही ह्या निर्धाराने ते दोर ओढतच राहिले. रामा थडीला लागला.सगळ्याचा जीव भांड्यात पडला.विहिरीच्या बाहेर पडलेला रामा पाहिला तसा सावित्रीने त्याला मिठी मारली. अश्रूधारा सुरुझाल्या आपला धनी सुखरुप आला याचा मनस्वी आनंद तिला झाला. ऱामाकडे आता पाहवत नव्हत सर्व कपडे रक्ताने माखलेले,हातापायावर काताल दगडाच्या खोल खोल जखमा त्यातून वाहनार रक्त, पायाची फुटलेली बोटे, जखमांमध्ये मातीचा खड्यांचा काही भाग. साक्षात यमाच्या सदनातुन हा माघारी आला असाच तो दिसत होता. हातपाय थडथड उडत होते. तोंडातुन शब्द फुटत नव्हते. काय झाल आणि काय घडल हे समजायला तयार नव्हत. बेसुद अवस्थेत गेलेली ती वीस मिनिटे काय झाल होत ते आठवायचा तो प्रयत्न करत होता पण पाण्यात त्याने काय केल त्याला आठवत नव्हत. आणि त्याचा थरकाप उडत होता साठ फुट पाण्यात पडलेला तेही शिल्लक पाण्यामुळे तो वाचला नाहीतर कपाळमोक्षच होता. नशीब बलवत्तर म्हणून निभावल नाहीतर खुपच बाका प्रसंग होता हा. यातून जिवंत वाचायची शक्यता शुन्याच्या बरोबर आहे परंतु ती खरी सावित्री तीने धिराने ह्या प्रसंगाला तोंड दिल आणि आपल्या रामाचे प्राण वाचवले. या जोडीला पाहून सर्वांचे डोळे पाणावले.बालाला तर आपण किती मोठ्या संकटातून आलो आहोत याची जाणीव झाली. आपण एका कुटुंबाच्या करत्या पुरुषाला मातीत घातल असत अशीच अपराधीपणाची भावना त्याला सतावु लागली. सावित्रीने रामाला लगबगीने गावात दवाखान्यात नेल. मलमपट्टी केली आरामशीर त्याला झोपू दिल. रामाचे हातापायांचा थरकाप आणि छातीची धडधड थांबत नव्हती. इकडे सावित्रीच्या डोळ्यातल पाणी हटत नव्हत. आपण किती मोठ्या संकटातून आज वाचलो यासाठी देवाचे मनोमन ती आभार मानत होती. बा मुलांना घेऊन दवाखान्यात आला मुलांना जवळ घेऊन त्याना उराशी धरल अन रामा शांत झाला. मुलांना पाहून सर्व दु:ख तो विसरुन गेला. सर्व जखमा, चिंता ,काळजी मुलांच्या चेहऱ्यावर हात फिरवताच तो विसरून गेला. आमच कुटुंब असच सुखी समाधानी राहो हिच मनोमन कामना करून सर्वांना त्याने कवेत घेतल.
