Sujit Falke

Abstract Tragedy

1.5  

Sujit Falke

Abstract Tragedy

अस्वस्थ शिक्षक लोपलेले शिक्षण

अस्वस्थ शिक्षक लोपलेले शिक्षण

7 mins
67


          शिक्षण या शब्दाची फोड केली तर समजून येईल की क्षणा क्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण. जीवनातील एकही क्षण असा नाही ज्यातून आपण शिकत नाही. मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो असे म्हणतात. आणि हे सत्य देखील आहे. जसे जसे आपले वय वाढत जाते आपण अनुभवातून खुप काही शिकतो. त्याला जोड असते अध्ययन अनुभवांची हे अध्ययन अनुभव पुरवतात आणि आपल्या समोर उभे करतात शिक्षकजन. त्यांना त्या अनुभवाना जिवंत रुप देण्यासाठी महत प्रयत्न करावे लागतात. आपली मुल शिकावी मोठी व्हावी त्यांची जगात किर्ती वाढावी अशीच भावना सर्व शिक्षकांची विद्यार्थीप्रती असते.

            पुर्वी गुरूगृही शिक्षा दिली जायची गुरु सांगतील ती पुर्व दिशा अन ते बोलतील ते देव वचन असायचे,त्याला राजा असो वा रंक कोणीही प्रतीप्रश्न विचारत नव्हते किंवा मनात शंका घ्यायला ही वाव नव्हता. नंतर नगरे वसली शहरे झाली शिक्षा आश्रमातून नगरात आली अन तीचे बाजारीकरण व्हायला सुरुवात झाली. जो धनवान त्यालाच शिक्षा किंवा उच्चभ्रू समाज शिकणार बाकी गुलाम अशी ती अवस्था. पुढे राज पध्दतीत शिक्षेला महत्त्व प्राप्त झाले आचार्य ,कुलाचार्य अशी पदे शिक्षक समाजला महत्त्व प्राप्त करून देउ लागली नक्कीच त्यामुळे न्याय, निती, मती आणि आसक्ती सर्व काही विद्येच्या जोरावर धैर्यवान आणि बलशाली झाले. कोठेही अहंकार आणि सत्तेचा वारा तीला स्पर्श करत नव्हता.

         दिवस बदलले काळ बदलला गुलामीच्या संक्रमातुन जाताना गुरूजन समाजला दुर्मीळ झाले . क्वचित एखादा शिकलेला समाजाला पुढे न्यायचे काम करत होता. तोच गावाचा हितकारक आणि सर्व गाव संभाळणारा होता. सुख ,दु:ख,आजार ,भांडणे, तंटे यासाठी ती शिकलेली एकमेव व्यक्ती गावाच्या कामला यायची. तिच व्यक्ती पुढे येउन गावातील लहान मुलांना शिकवायला लागली पुढील पिढी शिकावी, शहाणी व्हावी यासाठी त्याची धडपड. पुन्हा काळाचे संक्रमण. स्वातंत्र्य मिळाले. गुरुजी स्वतंत्र झाले. आली शैक्षणिक धोरणे आणि गुरुजी धोरणाचे पाईक झाले. स्वातंत्र्य मिळालेल्या जनतेला शिकवण्यासाठी पुन्हा गुरुजी लोकांची धडपड सुरु झाली.नवीन ध्येयधोरणे राबवत राबवत शिक्षण चालुच होते.समाज शिकतच होता. सक्षम साक्षर होत होता. भारतीय समाज स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकत होता यात गुरुजी लोकांचा वाटा मोलाचा होता. मोठे मोठे पदाधिकारी गुरुजीच्या तालमीत तयार झालेले संस्कार आणि नितिमत्ता माणुसकी यांचे बाळकडु त्याना गुरुजीनी दिले. त्यामुळे सर्व छान सुंदर व्यवस्थित चालु होत. त्यात वाढही होत होती. पण आपण म्हणतो ना स्वतःच ठेवायचे झाकून अन मोठ्यांचे पहायचे वाकून असच काही घडत गेल. प्रगत राष्ट्राना पहायच्या नादात आपणही तसेच होऊ या आशेवर शिक्षण व्यवस्थेवर नवनवीन प्रयोग करत करत शिक्षण प्रणाली जटील स्थितीत आली. जंगल,शहर,ए सी आणि शिक्षकतज्ञ असा प्रवास करत वाढली बहरली आणि तीचा फापटपसारा इतका वाढला कि राजकीय व्यवस्थेला हा पांढरा हत्ती पोसण्यात काही स्वारस्य राहिले नाही.

     आज पुरातन काळापासुन चालत आलेली गुरुपरंपरा नष्ट पावत चालली आहे. विद्येचे प्रचंड बाजारीकरण झालेले आहे. आमचे गुरुजी प्रचंड निराशेच्या गर्तेत अडकत चालले आहे. त्यांचे दैवत विद्यार्थी असताना त्याना बाकिच्या बाजार बुणग्यांच्या कागदीघोड्यात गुंतवले जात आहे. खडु फळा विद्यार्थी हे ज्यांचे सुत्र होते ते शाळा बाहेर कामात इतके बेजार झाले कि खडु फळा त्यानां दिसे ना झाला. गुरुजी कागदांच्या गराड्यात इतका व्यस्त झाला कि आपल्या समोर बसलेल्या चिमुरड्याना काय सांगाव? असा यक्ष प्रश्न त्यांना पडला. कामचा पाढा येवढा मोठा कि फक्त गुरुजीच त्याला न्याय देउ शकतात. अतिप्रामाणिकपणा, कामसूवृत्ती, वक्तशीरपणा, प्रत्येक कामातील प्रावीण्यता ही गुरुजीची शस्रे कधी गुरुजीच्या विरोधात देखील वापरली जातील याची पुसटशी कल्पना देखील गुरुजीला आली नाही. आज पंचनामे असो गावातील शौचालय मोजणी, मतदार        नोंदणी,जनगणना,निवडणूक अशा पारदर्शक कामात गुरुजीचा वापर खुबीने सर्व यंत्रणांनी करून घेतला. त्यांची मुळ नेमणूक कशासाठी आहे याचा विसर पंतप्रधान ते सामान्य क्लार्क याना देखील पडलेला आहे. आज परिस्थिती इतकी भयावह आहे की कोणीही याव आणि कामाच्या फैरी झाडून जाव आणि गुरुजीने गलितगात्र होऊन सर्व पाहत राहव आणि यांच्या पगारामुळे मिंदे होऊन सर्व स्विकाराव काय भयानकता आहे ? सरकारी सर्व खाती कामासाठी विस्फारलेल्या नजरेने शिक्षकाना पाहतात आणि ती चिमुकली चातक नजरेतून गुरुजीला पाहतात कि आजतरी गुरुजी कागदातुन डोके वर काढून शिकवतील. काय सांगाव त्याना आम्ही कशाने दबलेलो आहोत. अस काय आहे ज्याने आम्ही काहीही करु शकत नाही. हि व्यवस्था प्रामाणिकपणाची, स्वच्छ प्रतिमा असणाऱ्याची, नितिमत्तेने चालणाऱ्याची अशीच अवहेलना करते म्हणून. ऑनलाईन कामाचा बकासुर तर आम्हाला खाऊनच टाकेल अशीच परिस्थिती आहे. दिवसागणिक कितीतरी कामे ऑनलाईन करावी लागतात ती पण अती तत्काळ असेच आहे. ऑनलाईनचे शिक्षक समाजला फायदे कमी नुकसानच जास्त आहे. कागदातुन डोके काढून ते मोबाईलच्या स्क्रिनवर टेकवायचे. कामाचा सपाटा कमी व्ह्यायच नाव नाही. असे करत करत शैक्षणिक सत्र कधी संपुर्ण होते हेच कळत नाही. आणि राहुन जातो तो एक भलामोठा शुन्य. आणि आम्ही पाहत राहतो त्या शुन्यात स्वतः त्यात.

         नोकर म्हणून नव्हे तर एक व्रत म्हणून आम्ही कामला सुरुवात केली होती. पगाराची अपेक्षा कधीच जास्त नव्हती आजही नाही. आपल्या हातून सुसंस्कृत पिढी घडावी हाच उद्देश ठेवून. मोठ्या निर्मळ मनाने आमचा शिक्षक वर्ग काम करत असतो. तो देश महान ज्याचे शिक्षक उच्च कोटीचे असतील तेथील शिक्षण व्यवस्था इतकी बळकट कि आण्विकशस्त्रे न वापरता ते आपल्या शत्रूला मात देउ शकतात. प्रगतीच्या वाटा इतक्या भक्कम की त्याला लागलेल्या शिक्षणरुपी वास्तू थोडेही स्वतः पासुन ढळु देत नाहीत. इथे भारतात उलट परिस्थिती आहे इथे देश चालविण्यासाठी शिक्षणात बदल करत नाही त्याचे सार्वत्रिकिकरण करत नाही. इथे यंत्रणा उभारल्या जातात. पोलीस बळ, नोकर वर्ग, आधिकारी वर्गाची फौज, न्यायालयांच्या मोठ्या मोठ्या इमारती, कारागृह, भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून यंत्रणा, ED,CBI, SIT अशा कित्येक संस्था उभारल्या जातात. आणि त्यातून साध्य काय तर शुन्य. जिथे शिक्षण भक्कम पायावर उभे राहिल्यावर जिथे नैतिक मुल्यांची पायाभरणी सरस असल्यावर जिथे नितीमत्तेची घागर ओतपोत भरलेली असताना का व्हावा इतका ऱ्हास हे शक्य आहे तर नाही. जिथे शिक्षण उत्तम ते राष्ट्र नक्कीच प्रचंड ताकदीने उभे रहायला शिकत नव्हे इतरांना प्रेरणा देत. इथ जे शिक्षणाचे आधार स्तंभ आहेत त्यालाच सुरुंग लावलाय ह्या दळभद्री शासनाने. येथील ह्या भ्रष्टाचाराच्या असुराने सर्व काही पोखरुन टाकल आहे त्यात एकच प्रामाणिक राहिला तो म्हणजे शिक्षक. तर तो असा शरण येत नाही म्हणून वेगवेगळ्या कामात त्याला गुंतवुन त्याला बेजार करून बदनाम करुन षडयंत्र करून त्याला संपवायच अन मुळातच उभा राहिलेल्या या व्यवस्थेला नेस्तनाबुत करायच असाच काही डाव आहे.

           भावी पिढीचे शिल्पकार आम्ही पण आम्हाला काडीची किंमत आता उरली नाही. पैशाचा लोभी समाज अशीच भावना समाजाची आमच्याकडे पाहण्याची आहे. कारण आमचा पगार त्याच गावच्या बॅकेत जमा होतो जिथे पालकांची खाती आहेत. बाकी नोकरदार शहरात आरामात राहत. कुटुंबात रममाण होतात आणि आमचा वाडी वस्तीचा शिक्षक गरिबांच्या मुलांसाठी वाडी वस्तीवर राहतो आता असच आहे अती परिचयात अवज्ञा. पगार फक्त शिक्षकाचा माहिती आहे बाकि नोकरदारांची नावे सुद्धा लोकांना माहिती नाही पगार तर खुप दुरची गोष्ट. अमवस्या पोर्णिमाला उगवणारे काही नोकरदार कधीही आले तरी चालते कारण यांचे हात गुंतलेले असतात साहेबाकडे त्यामुळे त्यांची भाषा प्रेमळ मृदु स्वभावाची असते त्या नोकरदाराला. शिक्षकापाशी कुठे काय आर्थिक महसुली हिसाब आहे आपला घरचा शिक्षक काहीही म्हणा.अशीच माणसिकता वाढत चालली आहे. आपला पाल्य त्याच्याकडे पिढीचे शिक्षण घेतो हे मात्र हे लोक विसरून जातात. गेलेला पैसा, जमीन,घरदार ,नोकरचाकर परत कमवता येते परंतु गेलेला शिक्षणाचा काळ संस्कार, संस्कृती परत कशी आणणार हे त्याना समजायला आजुन उशीर लागेल काय ?

           मनातील खदखद खुप मोठी आहे परंतु आपण म्हणतो ना आपलेच दात अन आपलेच ओठ. काय बोलणार आपल्याच व्यवस्थेच्या चिंद्या बाजारात विकल्या सारखा प्रकार आहे.पण हो हे कुठेतरी थांबल पाहिजे नाहीतर तर हा शिक्षक वर्ग एक दिवस समाजातून नष्ट होइल आणि आपण पुन्हा एकदा गुलामगिरीच्या छायेत येउन उभे राहु. गरज आहे समाजला एकरूप करून हे शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्याची. गरज आहे सुरुवात करण्याची आज हा समाज सुशिक्षित, सुसंस्कारित म्हणून ओळखला जातो पण असेच चालु राहिले तर वेळ निघून जाईल संस्कार ,संस्कृती जागेवर राहिल अन उरतील फक्त कथा, कविता आणि व्यथा शिक्षक समाजाच्या.

        अशैक्षणिक कामे, गावकामे, महसूल विभागाची कामे , आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पशुसंवर्धन, वनविभाग, जनगणना,निवडणुक विभाग असे किती तरी विभाग शिक्षकांचा अक्षरश: पीठ पाडत आहे वरवर हसराचेहरा करून राहणारा आमचा शिक्षक प्रचंड ताणतणावातुन जात आहे. शाळेतील कामे, ऑनलाईन कामे ,प्रशिक्षण ,अहवाल, नोंदणी, सर्वेक्षण अशी काय आणि किती कामे ज्यांची गणती न केलेलीच बरी. देव सुद्धा म्हणत असेल बस कर पगले अब क्या रुलायेगा पण शासनाला मात्र आमची दया येत नाही. कित्येक शिक्षक या ताणवातुन जाताना गेले. स्वर्गलोकी गेले तरी देखील प्रशासन शासन निर्ढवलेल्या अजगरा सारख पाहतच राहते. आणखी किती जीव घेउन हे अजगर शांत होइल कि पूर्ण शिक्षण व्यवस्थाच गिळंकृत करेल अशी शंका आहे.

           आता काय म्हणे कंत्राटी भरती करणार रोजगाराने शिक्षण देणार, शाळा दत्तक देउन तिचा विकास करणार आता सांगा आज पर्यंत कोणाला समजल नव्हत का हे परंतु याना गोरगरिबाना शिकवून मोठ होऊ द्यायच नाही हे सत्य आहे. मला तर वाटत कि फक्त काळ बदलला आहे दिशा आणि दशा आजुनही तशीच आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या आम्हाला बाजरात बसलेल्या दुकानदाराप्रमाणे आमच्या कडे सर्व काही मिळेल शिक्षण सोडुन अशाच परिस्थितीत आणून सोडतील तेव्हा कळेल परंतु वेळ निघून गेलेली असेल. कालचीच बातमी पाहा एका दारू बनविणाऱ्या कंपनीने पैसे पुरवून एक शाळा दत्तक घेतली दिवसभर जिथे विद्यादानाचे पवित्र कार्य केले गेले तेथे रात्री बेधुंद अवस्थेत तरुणाई थिरकत होती. अरे कुठे चाललो आहोत आहोत कुठे जायचे आहे आपल्याला काय करतय शासन आणि प्रशासन लाजिरवाणी आणि केविलवाणी अवस्था झाली आहे शिक्षण व्यवस्थेची. एक शिक्षक म्हणून खुप खुप कळकळ वाटते की पूर्वीच्या ऋषीमुनींच्या परंपरेचे आपण पाईक आणि आपल्या डोळ्यांना हे पहायला लागत आहे. खरच त्यांच्या सारख्या शक्ती आम्हा जवळ असत्या तर सर्व काही भस्म केल असत आणि उगवणारी नवीन पहाट तेजोमय झाली असती.

      असो आतापर्यंत झाले ते सर्व ठिक आहे म्हणत हा शिक्षक समाज शांत होता परंतु आता प्रश्न गोरगरीबांच्या भविष्याचा आहे आता आपल्याला वज्रमुठ बांधावीच लागेल आणि असा प्रखर पहार व्यवस्थेवर करावा लागेल कि जेणेकरून ही व्यवस्था खडबडून जागी होइल. आणि धोरणी निर्णय घेउन एक सशक्त शिक्षण व्यवस्था स्थापिली जाईल. पुन्हा एकदा शिक्षणाचा सुवर्णमृग चौफेर जाईल आणि प्रकाशित करेल अखंड जनमाणसांना. त्याच्या तेजाने जळुन जातील ही जातीभेद, वंशभेद, गरीब श्रीमंताची दरी, भ्रष्टाचाराचा असुर सैरभैर पळत सुटेल, पुन्हा एकदा माणुसकी धर्माची पताका राष्ट्रभर मानाने डौलेल. नितीमत्ता आपल्याला चौका चौकात उत्सव साजरा करेल. पुन्हा एकदा शिक्षणाची परलोकी गंगा इहलोकात अशी वाहील कि बस सगळे शिक्षक भगीरथ धन्य धन्य पावतील,आणि म्हणतील याच साठी केला होता अट्टहास असा हा दिवस गोड व्हावा.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract