Sujit Falke

Abstract Tragedy Others

3  

Sujit Falke

Abstract Tragedy Others

माझे पेन

माझे पेन

5 mins
195


खापराची पाटी आणि पेन्सिल यांची जोडी इयत्ता ४ थी पर्यंत सोबत होती. गणित असो वा प्रश्नोत्तरे पाटीच्या दोन्ही बाजुनी लिहले जायचे. पाचवीला आल्यावर खरी पेनांची ओळख व्हायला सुरुवात झाली.नाहीतर सरांच्या खिशाला एक निळा आणि एक लाल असेच दोन पेन असायचे. आमच्या भावविश्वातील हेच लेखणीचे राम लक्ष्मण. आम्ही वयाच्या १० व्या वर्षांपर्यत एवढेच दोन पेन सतत पाहिले. एकदा केंद्रशाळेच्या गावी केंद्रीय क्रिडास्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. जेमतेम हस्ताक्षर म्हणून श्री. अडसुळ गुरुजीनी मला स्पर्धेत बसवल पण पंचायत होती पेनाची माझ्याकडे पेन नव्हता. मी पाटीवर पेन्सिलने लिहिल तेवढेच. सर जवळ आले आणि त्यांनी मला त्यांच्या खिशाला असणार गेली चार वर्ष मी फक्त त्या पेनाला पाहिले होते, तो त्यांनी माझ्या हातात दिला आणि मोठ्या आनंदाने कागद घेउन स्पर्धेच्या ठिकाणी बसवले. एक तासाची वेळ दिलेला मजकूर जसाच्यातसा उतरावयाचा होता. मी काहीही विचार न करता सरांनी दिलेल्या पेनला माझी पाटीची पेन्सिल समजून सुंदर हस्ताक्षर काढले. त्यावेळी पहिल्यांदा पेन मी हातात पकडला. स्पर्धा झाल्यावर लगोलग सरांचा अतिप्रिय पेन मी सरांना दिला. कारण सर त्या पेनाला किती जपत हे मी जवळून पाहिले होते.त्याकाळी आमच्या केंद्रातील १४ शाळांमध्ये हस्ताक्षर स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक आला. किती आनंद झाला मला आणि सरांना. बक्षीस मिळाले एक गडु , एक प्याला, एक कंपास, एक पेन. वा काय आनंद झाला, येवढे बक्षीस मला प्रथम मिळाले होते आणि विशेष आकर्षण होते मला मिळालेल्या शाईच्या पेनाचे.सगळ्या वस्तीवर मी माझे बक्षीस घेऊन नुसता दिवसभर फिरत होतो. सगळ्याना माझे कौतुक वाटले.आई बाबांना खुपच आनंद वाटला.

                पुढे पाचवीला मुल शाळेत खुप विविध प्रकारचे पेन घेऊन यायचे. मी आपला रासायनिक खताच्या गोणीच्या शिवलेल्या दप्तरात आपला एक साधा बक्षीस मिळालेला शाईचा पेन घेऊन जात होतो. पुढे दोन तीन वर्ष त्याने निभावली. आजूनही बॉलपेन बाजारात उपलब्ध नव्हते. शाईच्या पेनाची जादुच निराळी होती. माझी मोठी ताई तर असे अक्षर काढे की जणु मोत्याची माळ गुंफावी अशीच. मी ही तीला पाहूनच अक्षर गिरवायला शिकलो. पुढे सहावीला माझ्याच आगावुपणामुळे सुरपारंबीचा खेळ खेळताना अपघात घडला आणि माझा सुंदर अक्षर काढणारा हात दोन ठिकाणी मोडला. आता माझ मन खट्टु झाल. आपण खेळाच्या नादात हे काय केल? याचा पश्चात्ताप झाला पण काय करणार उनाड वय घडली घटना. सहा महिने माझ्या उजव्या हातानी पेन धरला नाही. प्लास्टर लावले गेले.माझ्या आगाऊपणाची शिक्षा हाताला मिळाली याचे खुप दु:ख वाटले. पण मी ही खुप जिद्दी आणि हट्टी होतो. मी माझा बक्षीसाचा पेन घेतला आणि केला सराव सुरु डाव्या हाताने कारण वार्षिक परीक्षा जवळ आली होती. वर्गशिक्षक श्री. क्षीरसागर सर म्हणायचे सुजित आता मीच पुन्हा तुझा वर्गशिक्षक राहणार कारण तुझे पेपर होणार नाही हातामुळे. अरे बापरे सगळे जोडीदार आपल्याला सोडून पुढील वर्गात जाणार या भावनेने मला झोप लागली नाही. मी आता रडत न बसता कसून सरावाला सुरुवात केली. अवघड होत पण अशक्य अस नव्हत. आता हद्द अशी होती कि पुन्हा उलट आकाराने वळण काढायचा मला सराव करावा लागे. वहीची पान खराब होत होती पण मी मागे पाहिले नाही. अवघ्या दोन आठवड्यात मी सर्व वर्णमाला गिरवली आणि शुद्धलेखन लिहायला सुरुवात केली. त्यात डॉक्टरानी सांगितले आता आपण बुधवारी प्लास्टर काढून टाकु आणि एक्सरे काढून पुढे ठरवु काय करायचे. म्हणजे उजव्या हाताची तशीही परीक्षेसाठी शाश्वती नव्हती कारण लगेचच तो लिखाण करेन म्हणून मी तो विचार सोडुन डाव्या हाताच्या सरावावर लक्ष दिले. पंचायत अशी की मराठी विषयाचा पेपर सोमवारी होता आणि माझा हात सुटणार होता बुधवारी. डॉक्टर त्यांच्या इलाजावर पक्के होते. मी ठरवल की काहीही होवो आपण पेपर द्यायचा. सरावही छान झाला होता. मराठीचा पेपर सुरु झाला आणि मला घाम फुटायला लागला. मुल झरझर पेपर लिहित होते आणि मी माझ्या डाव्या हाताच्या कासवगतीने लिहित होतो. गाळलेल्या जागा,जोड्या, चुक की बरोबर, एका वाक्यात उत्तरे, निबंध आणि पत्र लेखन हे मी माझ्या डाव्या हाताच्या गतीने तीन तासात लिहले. घामाने पूर्ण निथळून निघालो आता पर्यंत कधीही अमुक विषयात फेल असा शेरा घेतला नव्हता. माझ्या पेनाने मला साथ दिली तर पास होइल असा विश्वास होता पण काय करावे मराठीचे श्री. क्षीरसागर सर खूपच तीक्ष्ण नजरेचे होते. एक चुक दिसली की मार्क गेले. बाकीच्या पेपरला उजवा हात सुटला खरा पण फारच सुसाट सुटला अक्षरांचे आकार अवयव बिगडले आणि मला वाटल होत तेच झाल. माझा पहिला अक्षर सराव फौल ठरून नवीनतम आकाराचे अक्षर हस्ताक्षरात यायला लागले. मलाच माझ्या लिखाणाची लाज वाटु लागली. पेपर संपले. आजुन निकाल बाकी होता तेच एकदिवस श्री. क्षीरसागर सर वर्गात आले आणि हजेरी झाल्यावर मला जवळ बोलावून शाबासकी दिली. त्यांनी माझे कौतुक केल्यावर माझी छाती फुलून गेली. म्हणाले तुझी जिद्द खरच मोठी डाव्या हाताने पेपर लिहिला आणि मार्क सुद्धा पाडले ४०. खुप छान सुजित. असाच अभ्यासाबाबत जिद्दी राहा खुप मोठा हो. त्यांनी मला सोबत घेतले सगळ्या वर्गात नेउन सांगायचे शिकण्याची जिद्द हवी तर अशी. लिहणारा हात मोडला पण त्याने डाव्या हाताला सराव करून मराठी विषयात चांगले मार्क देखील पाडले. तुम्ही शिका यातून आपण आपल्या नकारात्मक गोष्टी बाजुला करून सकारात्मक व्हा. यश नक्कीच तुमचे आहे. माझ्या तीनही भावंडांच्या वर्गात मी माझे कौतुक ऐकून आलो मला माझाच खुप अभिमान वाटायला लागला. माझ्या पेनाची साथ किती मोलाची होती माझ्यासाठी.

       हात मोडल्यामुळे माझ्या हाताच्या भागात एक प्रकारची स्थिरता आली होती त्यामुळे अक्षर वळण घेत नव्हते. मी माझ्या बक्षिसी पेनला संभाळून ठेवून दिले. कि याने खुप छान अक्षर काढले. हातामुळे याची बदनामी नको. मी घरच्या कपाटात त्याला बंदिस्त करून ठेवले. पुढे चायनाचा पेन आला त्याचे वेड त्या काळात सर्वाना होते. हाताच्या मोडीच्या प्रादुर्भावामुळे मी आता हस्ताक्षर काय नी लेखन काय याकडे कानाडोळा करायला लागलो. माझे अक्षर माझ्यामुळेच खराब झाले म्हणून स्वतः दोष देत होतो.

       १० वीची परिक्षा झाली. मार्क चांगले मिळाले परंतु अपेक्षा प्रमाणे मिळाले नाही. अभ्यास उत्तम पण हस्ताक्षराने गल्लत केली होती.श्री व्हि के नायकवाडी सर आणि श्री. कोते सर हे दोघेही विज्ञान विषयाचे शिक्षक हस्ताक्षरा बाबत मला सुनवायचे. कारण पेपरला पैकीच्या पैकी मार्क पण अक्षर त्यांना सुंदर वाटत नव्हते. मीही हाताची अडचण सांगून मोकळा व्हायचो.आता १२ वीची परीक्षा द्यायची होती. यात ११ वीला संस्कृत विषयाचे शिक्षक होते श्री. भुजबळ सर त्यांना माझा अभ्यास खुप आवडायचा पण त्यांना अक्षराचा खुप राग यायचा. त्यांना मी समस्या सांगितली त्यांनी जवळ बोलावून सांगितले. सरावाने सर्व काही शक्य आहे तु सुद्धा हे करु शकतो तु हे करून दाखवले आहे. मी पुन्हा तयारीला लागलो.

क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract