Sujit Falke

Tragedy Inspirational Others

3  

Sujit Falke

Tragedy Inspirational Others

ध्येयवेडा

ध्येयवेडा

10 mins
218


  शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर अस सुमधुर आवाजात निसर्गरम्य शांत वातावरणात स्पिकरवर गाण चालु होत. शाळा अशी सजवण्यात आली होती, जस काय आज शाळेचे उद्घाटनच आहे. मुलांचा उत्साह सोबत वस्तीतले गावकरी ,खूपच नयनरम्य दिसत होती शाळा.आण्णा, तात्या , बापु, दादासाहेब अशी सर्वच मंडळी आपआपल्या कामात मग्न दिसत होती. अंगणवाडी ताई,वस्तीवरील महिला सजावटीच्या कामात मग्न होत्या. माजी विद्यार्थी खास करून आजच्या कार्यक्रमाला आले होते. सर्वांचा उत्साह नेहमी प्रमाणे पण त्यात वेगळा भाव सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आज वस्तीवर सर्व काही होत परंतु एक खंत सर्वांच्या मनात होती. श्री. इंगळे सरांची धावपळ सर्व पाहत होते. नवी नोकरी नवी जागा नवी जबाबदारी याचा ताण स्पष्ट दिसत होता त्यांच्या चेहऱ्यावर.परंतु ते सर्वांना आपल्या जबाबदाऱ्या समजावत होते.

              एका ठिकाणी शांत खुर्चीत बसलेले देवरे गुरुजी कमालीचे अशांत दिसत होते. त्यांच्या मनाची चलविचल त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. कारण ही तसच होत आज त्यांचा या वस्तीवरचा शेवटचा दिवस होता. त्यांची जिल्हा बदली त्यांच्या स्व जिल्ह्यात नगरला झाली होती. गाव जवळ केल्याच्या सुखापेक्षा निमचौकी वस्ती सोडण्याचे दु:ख त्यांना जास्त होते. त्यांना मागील १२ वर्षाचा जीवन प्रवास आठवला. दत्ता देवरेचा देवरे गुरुजी झाल्याचा प्रवास आणि डोळे आपसूक पाणावले.एक एक प्रसंग, किती किती घटना, किती किती गमतीदार किस्से सगळे त्यांच्या समोर एखाद्या चित्रपटासारखे उभे राहिले. सर्व मंडळींची ही धावपळ पाहून खुप गहीवरल्या सारख वाटल त्यांना. एकटक सर्व धावपळ पाहत धीरगंभीर झाले.

              आठवला तो दिवस जेव्हा दत्ता देवरे या वस्तीवरील शाळेवर रुजु झाले. जिल्ह्यातील सर्वात अवघड वस्तीशाळा म्हणून असलेल्या निमचौकी वस्तीवर हजर होताना वाटलेही नव्हते कि पुण्यात आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्याला अस अडगळीत नोकरीसाठी जाव लागेल. बनोटी केंद्रातील साहेबांनी हसतमुखाने स्वागत केल. स्मितहास्याला सुटकेचा श्वास ही सोबत होता. देवरे सरांना शाळा पहायची घाई झालेली. साहेबांनी एका शिक्षकाला सराना शाळा दाखवायला पाठवले. हातात बॅग आणि डब्बा घेउन सर आणि ते शिक्षक गप्पागोष्टी करत मोटारसायकल निघाले. दोन तीन गाव मागे सुटल्यावर डोंगररांग भाग सुरु झाला, नोकरी मिळाली याचा उत्साह होताच परंतु डोंगर पाहिल्यावर देवरे सर हादरले. "आणखी किती दुर?" सर म्हणाले. "दोन बरडीचे डोंगर संपले कि येइल शाळा " त्या सरांच उत्तर. आता मात्र सर पुरते हाबकले. पुण्याच्या शासकीय अध्यापक विद्यालयात शिकलेला तरुण अशा दुर्गम शाळेत हे सत्य मानायला सर तयार नव्हते.

दोन डोंगरातून रस्ता काढत दोन तीन ओढे ओलांडून सर शाळेत पोहचले. शाळेची अवस्था पाहून तर सरांचे डोके गरगरायला लागले. शाळेच्या मैदानावर शेणसडा पडलेला जणू काही दुभती जनावरे पाणी पिल्यावर विश्रांती घेत असावीत,ओट्यावर बकऱ्या बांधलेल्या, किचनशेड मध्ये सरपण भरलेले, शाळेच्या खोल्यांत मका अन कापूस बाजूला खताच्या गोण्या, शाळेच्या इमारतीवर वेल चढलेले , बंद पडलेली शाळाच म्हणा,दोन खोल्या, एक ऑफिस, एक किचनशेड हे सर्व पावसाळ्यात गळते. शाळेत उपस्थित एकही विद्यार्थी नाही. दूर दुर पर्यंत वस्ती नाही. शाळेच्या चारही बाजुला जंगल आणि फक्त जंगल. शाळेच्या पायरीवर बसून सर आपला हुंदका आवरण्याचा प्रयत्न करत होते. परंतु अपेक्षांचा भंग इतका विदारक होता कि मनाला आवर घालणे त्याना जमले नाही. २२ वर्षांचा उमदा तरुण एखाद्या लहान मुलाप्रमाणे हंबरडा फोडून रडु लागला. सोबतचे शिक्षक सोडून कोणीही आवाज ऐकायला नाही. पाटील सरांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु आपला झालेला हिरमोड सर पचवु शकत नव्हते. शाळा पाहुण रडक्या चेहऱ्याने सर तेथून १५ किमी दुर बनोटी गावात आले. पाटील सरांनी त्यांना चहा पाजला सर्व ठिक होइल मी देखील तुम्हाला मदत करेन बाकी केंद्रातील शिक्षक मदत करतील असे आश्वासन दिले. साहेबांनी देखील आश्वासन दिले. सरांचे मन हळूहळू सावरत होते. स्वतःची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते.

           बनोटी गावात खोली शोधली. वस्तीवरती सर्वांची घरे कुडाची, मातीची त्यांचेच राहण्याचे वांदे सराना खोली कोठून देनार. खाणावळ लावली. दुसऱ्या दिवशी पुन्हा पाटील सरा सोबत सर गाडीवर मजल दरमजल करत शाळेत पोहोचले. खिन्न मनाने ते शाळेत उतरले. पाटील सर आपल्या शाळेत गेले. शाळेच्या एका खोलीत भिंतीला पाठ लावून विचार मग्न सर. आपल्याच नशिबी अशी शाळा का ? हे आदिवासी लोक मला आपल समजतील का? मी इथ नोकरी करु शकेल का? अशा कितीतरी प्रश्नांनी डोक्यात काहूर माजल. पण उत्तर एकच हिच तुझी शाळा, हिच तुझी कर्मभुमी.

             रात्रभर खुप विचार करून सर पहाटे उठले आणि ध्येय निश्चित केल आता काही होऊ देत आपल्याला हि शाळा उभी करायचीच. अन नुसती उभी नाहीतर नावारूपाला देखील आणायची. शिक्षणगंगा या वस्तीवर आणण्यासाठी आपल्यालाच भगीरथ व्हावे लागेल हे ओळखून बसले.प्रयत्न हाच देव हे प्रमाण मानून सर आता चांगलेच लागले कामाला.गावकऱ्यांना समजल होत की नवा उमदा शिक्षक आला आहे. त्यामुळे आपसूकच शाळेत मुलांपेक्षा गावकरी जास्त येत. सरांशी चर्चा करत. भाषा समस्या होतीच. पण मन जुळल्यावर भाषा अडचण ठरत नाही. हळूहळू सर गावकऱ्यांशी एकरूप झाले. सुखात दु:खात त्यांना भेटू लागले. आता शिवधनुष्य उचलायच होत मुले शाळेत आणण्याचे पालक संपर्कात होते परंतु मुलांना मोकळ्या जंगलात फिरायची सवय. त्यांना शाळेचे वळण अंगी बानायला वेळ लागेल याची सराना जाणीव होती. त्यांनी पहिला प्रयोग केला माळरानावरील शाळेचा.बजरंग, भैरव, कैलास, भानुदास ही बालके सकाळीच रानात बकऱ्या अन ढोर चारायला जात त्याच्या सोबत सर्वच यायचे म्हणून सरांनी पहिले मोहरके हेरले अन त्यांना कस प्रवाहत आणता येइल याचा विचार करु लागले. ते सकाळी लवकर वस्तीवर येत अन मुलांबरोबर जंगलात जात नेहमीच्या जागेत मुले आली का सर त्यांना गोष्टी सांगु लागत मुलांना त्यांच्या गप्पा,गोष्टी,गाणी खुप खुप आवडायचे. मुले गुणगुणतच घरी जात. मुलांना अन पालकांना हे सर्व नवीन होत. रानात स्वछंद विहरणारी हि पाखर आता शहानी सुरती वागु लागली. त्यांच्या वागण्यात बदल होतोय हे पालक वर्गाला जानवल. पाटी, पेंसिल, पुस्तके अशी शाळा माळरानावर भरयला लागली. ?मुल आपल्याला नवीन नवीन काहीतरी शिकवल जात म्हणून खुश असायची. फिरता फिरता तात्या म्हणजे वस्तीचा मुख्यपुरुष तिथ आला त्यांने सरांना शिकवताना पाहिल. त्यांनी सरांना शाळा आपल्या बांधलेल्या इमारतीत भरवा असे म्हटले तेव्हा सरांनी सगळ्या अडचणी सांगितल्या. तेव्हा तात्यानी तातडीने सर्व वस्तीची बैठक बोलावली सरांची मेहनत सांगितली."मुलांना आपल्या घरच्या कामातून मुक्त करून शाळेत पाठवा" असे ठणकावुण तात्यानी सांगितले. "सर यांच भल व्हाव म्हणून रानात शाळा भरवत आहे त्यामुळे तुम्हीही समजदार व्हा. आपल्याला असा देवमाणूस भेटला हे भाग्य माना आणि मुलांना शाळेत पाठवा." तात्यांच्या एका पणतीने अनेक ज्योती पेटल्या सरांनी तात्यांचे खुप खुप आभार मानले. एकमेका मध्ये चर्चा करून आम्ही तयार आहोत असा एकच आवाज आला. सरांची स्वप्नपूर्ती कडील वाटचाल खऱ्या अर्थाने सुरु झाली. शिक्षणाच बी वस्तीवर आता पडल होत आता त्याचा वटवृक्ष कस करायच हे सरांनी आगोदरच ठरवल होत. एक विशीतला तरुण आपल्या ध्येयाने भारावून काम करत होता.

         दुसऱ्या दिवशी सकाळीच सर वस्तीवर पोहचले. घरोघरी जाऊन मुलांना गोळा केले. १ ली ते५ वी पर्यंतचे १५ विद्यार्थी शाळेच्या दिशेने, जी कि जंगलात दुरवर होती तिकडे त्यांच्या द्रोणाचार्यच्या मागे निघाले. आजचा आनंद गगनात मावेना सरांचा सरांनी शाळेत पोहचताच मुलांना मीठाई वाटली. बालचमु एकदम खुश झाला. सरांनी प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली. "आपल्याला आपली शाळा छान ,सुंदर ,सुबक बनवायची आहे. आणि अभ्यास पण असा करायचा आहे कि सगळे आपल्याला ओळखतील खुप हुशार बनायच आहे आपल्याला." सर पोटतिडकिने सांगत होते मुल ऐकत होती. शाळा मुलांनी गजबजुन गेली. अबोल पक्षांचा चिवचिवाट सुरु झाला. शाळा स्वच्छ झाली. पालकांनी गुरढोर बांधण सोडून दिल. सर्व कस स्वच्छ स्वच्छ झाल,एकदम निर्मळ झऱ्या सारखा. गावकऱ्यांनी ही मैदान सपाटीकरण, मैदान निर्मळ करणे अशा कामात मदत केली. शाळा वेळेत भरायला लागली सर्व मुले आवडीने शिकु लागली. सरांची शिकवण्याची हातोटी होतीच मुले दुप्पट गतीने शिकत होती. बजरंग आणि गौरी पाचवीत होते दोघेही हुशार तल्लख आपले सर दुरवरुन येतात यामुळे आपण सर्व कामे सर यायच्या आतच करायची हा त्यांचा नियम. आता शाळेतच आहार मिळत असल्याने कोणतीही चिंता पालक व बालक याना नव्हती अन सरांवरचा विश्वास दृढ होत होता. बजरंग आणि गौरी इतर मुलांना शिकण्यात मदत करत होती ,एकदम धनलक्ष्मी मिळावी अशीच देवी सरस्वती वस्तीवर असीम कृपादृष्टीने पाहत होती.

          पावसाळ्याचे दिवस होते एक दिवस सर बऱ्याच वेळ झाला तरी आले नव्हते. मुलांना माहिती होत ज्या दिवशी सर येत नाही तेव्हा तस सांगतात. बजरंगच्या मनात शंकेची पाल चुकचुकली त्याने तात्याकडे तडक धाव घेतली. तात्याही संभ्रमात पडले काय कराव? आण्णाला हाक मारली. अन दोघेही उलटवाटेने सरांच्या शोधात निघाले. पहताय तर काय ओढ्यात सर विव्हळत पडलेले. तात्यानी सराना घडलेला प्रकार विचारला तर एका विषारी सापाने सरांना दंश केला होता.तडक दोघांनी बैलगाडी करून बनोटीच्या सरकारी दवाखान्यात सराना आणले. तोपर्यंत सर बेशुद्ध पडले होते. डॉक्टरानी शर्थीचे प्रयत्न केले अन सरांचा जीव वाचला. सर्व गावकऱ्यांनी देवाचे आभार मानले. वस्तीवरील लोक देव पाण्यात ठेउन बसले होते या भल्या माणसासाठी.आठ दिवसांचा आराम करून सर पुन्हा कामावर हजर झाले. जसे काही घडलेच नाही. सराना खुप दिवसांनी पाहुन मुलांना कमालीचा आनंद झाला. बजरंग म्हणाला, "सर तुम्ही नव्हते आम्हाला खुप वाईट वाटल पण आम्ही एकही दिवस शाळा बंद ठेवली नाही गौरी अन मी दररोज शाळा भरवली अन मुलांना शिकवले सुद्धा." गौरी अन बजरंगला जवळ घेत दोघांना मिठीच मारली. मुलांना सर गहिवरले हे समजून चुकले. सरांनी आता स्वतःची मोटारसायकल घेतली पावसामुळे शाळेत नेता येत नव्हती रस्त्यावरील घरापाशी गाडीलावून पुढे पायी जावे लागे परंतु इतर वेळेला शाळेत अडथळ्यांची शर्यत खेळत जाता येत होत. मुलांनी शाळेच्या मैदानावरच आपल्या सरांच्या गाडीवर बसण्याचा आनंद लुटला निरागस मुल पार हरकुन गेली होती.

              शाळेपासून गौरीचे घर दुरच होते. एकदम डोंगराच्या पोटाशी तिला शाळेत यायला तिला दोन ओढे ओलांडून यावे लागे. बाकीच्या बऱ्याच मुलांना त्या ओढ्यातुन यावे लागे. एकदा जोराचा पाऊस झाला. ओढ्याला पुर आला गौरी ओढा ओलांडून जाताना पाय घसरून पडली. हात मोडला अन वाहून जायला लागली ओढ्यातुन. तिथल्या मेंढपालाने पाहिले अन तिला बाहेर काढले.मुलांनी सर्व हकिकत सरांला सांगितली.सर तडक आभार मानायला मेंढपालाकडे गेले हात जोडून त्यांचे आभार मानले. रात्री घरी आल्यावर ,हा ओढा मोठा आहे हा त्रास कायमचा मिटवायला हवा. मुलीचा हात तुटला उद्या दुसऱ्याला त्रास होऊ शकतो काहीतरी उपाय केला पाहिजे. रात्रभर विचार करून सकाळीच दादासाहेबाच घर गाठल आणि आपला बेत सांगितला त्यालाही आवडला अन दोघेही कामला लागले. बेत होता ओढ्यावर लाकडी सांकव तयार करायचा, मुलांबरोबर गावकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार होता. जिवितहानी टळणार होती. सर अन दादा शेतात गेले मुलांना शाळेत अभ्यास सांगून सर परत शेतातील बांबु तोडु लागले. हे काही एकट्याचे काम नव्हते ,परंतु तुमची इच्छा असेल तर मार्ग मिळतोच. दादासाहेब, भाऊ , तान्या अशी मंडळी सोबतीला देवासारखी धावून आली अन सलग चार दिवस राबुन राबून सरांनी आपल्या मुलांसाठी सांकव तयार केला भर पावसात सांकव स्थापित केला मोठ्या मजबुतीने तो तयार केल्याने चार पाच माणसे सहज ये जा करु शकत होती. मुलांच्या शिक्षणातील खुप मोठा अडथळा दुर झाला. सरांना आनंद झाला. गावकऱ्यांनी देखील सरांच्या हुशारीला दाद दिली. इतकी दिवस इथे राहिलो पण आम्हालाही हे जमले नाही. ते ह्या नवख्या शहरातील मुलाने करून दाखविले. अशातच साहेब शाळेवर आले त्यांनी शाळेची गुणवत्ता, शाळा परिसर, सांकव पाहिला त्यांनी सरांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. नंतरच्या दोनच दिवसांनी मुख्य कार्यकारी अधिकारी औरंगाबाद यांचे डिजाईन फोर चेंज या उपक्रम तपासणीचे पथक शाळेत धडकले. देवरे सरांची शाळा पाहून हरकुन गेले. येवढ्या दुर्गम भागात गुणवत्तापूर्ण शाळा आणि इतके वेगवेगळे उपक्रम, गावकरी देखील एवढे उत्साही हे सगळ पाहून त्यांनी देवरे सरांच्या शाळेची निवड केली. वस्तीवरील शाळा एक आदर्श शाळा म्हणून नावारूपाला आली आणि खऱ्या अर्थाने देवरे सर देवरे गुरुजी झाले. सर्व जिल्हा देवरे गुरुजीना आदर्श शिक्षक,उपक्रमशील शिक्षक,सांकव फेम गुरुजी म्हणून ओळखायला लागला. वस्तीची शाळा आता देवरे गुरुजींच्या नावाने ओळखली जाऊ लागली.गुरुजी मोठ्या मनाचे हे श्रेय सर्व वस्तीवरील गावकऱ्याचे म्हणून सर्व गावकऱ्यांना पुरस्कार घेण्यासाठी औरंगाबाद येथे घेउन गेले. स्वतः सीईओ साहेबांनी गुरुजींचे अभिनंदन केले."दुर्गम भागात असे काम होत असेल तर मला सार्थ अभिमान आहे माझ्या शिक्षकांचा." साहेबांनी सरांचे कौतुक केले. गावकऱ्यांचा उर अभिमानाने भरून गेला.

         एका सर्वसाधारण भागातील शाळेला लाजवेल अशी प्रगती या दुर्गम भागातील शाळेने केली याचा सार्थ अभिमान वस्ती वरील लोकांना आहे. गुरुजींच्या कृपेने एक भगीरथ एक मसिहा या लोकांना भेटला. दुर्लक्षित राहिलेला हा भाग आज जिल्ह्यातील सर्वांना माहिती झाला आणि मुलांना रुजु होतानाच गुरुजी म्हटले होते कि आपल्याला इतक नाव कमवायच आहे कि आपल्याला स्वतःची ओळख सांगण्याची गरज पडता कामा नये. आज गुरुजींचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले होते. गुरुजीना स्वर्ग हातभर दुर राहिला.शाळेतील मुले गणित ,भाषा ,इंग्रजी या विषयात निपुण तर झालीच परंतु संस्कारक्षम देखील झाली. दूरदुरचे विद्यार्थी येथे प्रवेश घेण्यासाठी येतात आपल्या शैक्षणिक विकासाबरोबरच व्यावसायिक शिक्षणाला जोड देण्याचे काम गुरुजींनी केले. शाळेची सुशोभित बाग आपल मन आकर्षीत करते. परसबाग सात्विकता प्रदान करते. नवोदय विद्यालयात निवड झालेली गौरी आज मितिस MBBS करते आहे. बजरंग PSI होऊन पोलिस दलात आपले कर्तव्य बजावत आहे. माजी विद्यार्थी धडपडत आहे काहीतरी बनण्यासाठी आणि आजुनही ते गुरुजींच मार्गदर्शन घेतात. त्यांची प्रेरणा गुरुजी आहेत. ते स्वतः भाग्यवान समजत आहेत कि आपल्याला गुरुजी भेटले नाहीतर उनाड अवखळ पाण्यासारखे आपणही दिशाहीन भटकत राहिलो असतो. अन हरवून गेलो असतो. स्वत: मध्ये स्वतःला. भाग्यवान असतात जे शहरात जन्मतात, भाग्यवान असतात ज्यांचे आईवडील श्रीमंत असतात, अन भाग्यवान असतात जे सर्व सुख पायाखाली घेउन जन्माला येतात. कुठला कोण दत्ता देवरे येतो अन या मुलांच्या नशिबाला सोन्याचा मुलामा चढवतो. अन अस काही भाग्य बदलवतो की जणू काही यांच्यासाठी प्रत्यक्ष ब्रम्हदेव. सरांची गुरुजी झाल्याचा प्रवास सर्व वस्तीने जवळून पाहिला आणि अनुभवला.

एक तपाच्या सेवे नंतर सरकारी हुकुमावरून गुरुजींची बदली होतेय. सर्व गाव तयारीत गुंग आहे अन गुरुजी आपल्या विचार चक्रात. पाहता पाहता भाषणे संपली. गौरी अन बजरंगने गुरूला मागे सोडून वक्तृत्व गाजवल सर्वांचे डोळे डबडबले. गटशिक्षणाधिकारी भरभरून बोलले. गुरुजी बोलायला उठले अन सर्वांचे हात आपसूक त्याच्यापुढे जोडले गेले. ही कमवलेली दैवी संपदा फक्त अन फक्त अशा देवमाणसालाच लाभते. 'परिस्थिती कशीही असो जिद्दीचे शस्त्र नेहमी सोबत ठेवा बाळानो विजय आपलाच आहे. कोणतीही गोष्ट प्रयत्न प्रमाण वापरून केली तर यशस्वी होण्यापासून कोणीही आपल्याला थांबवु शकत नाही'. हे यशाचे बाळकडु मुलांनी सराकडुन घेतले. अन ही रानातली पाखर आज यशस्वी झाली. हे भगीरथ बोलत होते अन गावकरी आसव ढाळत होते. माणसं येतात अन जातात पण मनात मायेचा ओलावा तयार करतात. सरांच कुटुंब हे सर्व पाहून खुप व्याकुळ झाल.मंचावरून उतरून सरांनी शाळेच्या मैदानाची माती भाळी लावली. सर्व कौतुकाने पाहत होते. शाळेच्या कुंपणापासुन सर्व गाव सराबरोबर चालत कितीतरी दुर गेला. सगळ्यांच्या गळाभेटी घेत घेत सर

हात करून सर्वांचा निरोप घेत होते. लहान मुल तर सरांना सोडायला तयार नव्हते.मी परत येईल अस म्हणून सर निघून गेले. सगळा गाव पाठमोऱ्या सरांकडे एकटक पाहत कितीतरी वेळ तसाच स्तब्ध उभा होता. पुन्हा एका ध्येयवेड्या गुरुजींच्या प्रतीक्षेत.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy