गौरव मराठी भाषेचा
गौरव मराठी भाषेचा
माझ्या मराठीची बोलु कौतुके
परि अमृतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके मेळविन......
अशा शब्दात संत ज्ञानेश्वरानी मराठी भाषेचे वर्णन केले आहे.अनेक श्रेष्ठ महान संत , महंत, विभूती , कवी,लेखक आणि रचनाकार या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मले आणि या सर्वांनी मराठी भाषेला सर्वोच्च मानावर नेउन ठेवले.ज्यानी मराठी भाषा समृद्ध केली त्यापैकी एक श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो.
मराठी भाषा लाघवी आणि सर्वगुण संपन्न भाषा आहे. ऱसिकता, अलंकारिकता, मोहकता आणि आपलेपणा इतर कोणत्याही भाषेपेक्षा मराठी भाषेत अधिकच आहे हे आपल्याला मान्य करावेच लागेल. जगाच्या पाठीवर क्वचितच असा एखादा देश असेल कि जिथे मराठी माणूस पोहचला नसेल आणि एक राज्य महाराष्ट्र आणि त्यात एक राज्य भाषा मराठी त्याच महाराष्ट्रात राज्यात कोसा कोसावर बोलीभाषा बदलते आणि ती ही इतकी जलद जस पाण्याने नदिकडे वाहताना आपला रंग बदलावा आणि आकारही.नगरी,कोकणी,वऱ्हाडी,अहिराणी,राजपुतानी,पावरी अशा अनेक कित्येक भाषा आपल्या महाराष्ट्र राज्यात नांदत आहे. आणि त्या भागातील कवी ,लेखक त्या भाषेला नवीन स्तरावर नेण्याचा प्रयत्न करतात.
महाराष्ट्रात सुमारे साठ हुन अधिक बोलीभाषा बोलल्या जातात.त्यातील सुमारे वीस बोली भाषा या मराठी आणि तीच्या विविध रुपाशी संबंधित आहेत.तर इतर चाळीस बोलीभाषा या भटके, विमुक्त, आणि आदिवासी व इतर समाजाशी संबंधित आहेत.असे निरीक्षण अलिकडे ' पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया ' ने केलेल्या पहाणीत नोंदवले आहे. यावरून आपल्या लक्षात येते कि मराठी भाषा किती समृद्ध आहे. पुणे शहराला आपण मराठी प्रमाणभाषेसाठी मानक शहर मानतो. प्रत्येक जिल्ह्यात देखील त्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य असणारी लकब, उच्चार आणि चढउतार आपण महाराष्ट्र दर्शन करताना अनुभवु शकतो. मराठी म्हणून आपल्याला आपल्या भाषेचा नक्कीच अभिमान आहे आणि प्रत्येक मराठी बांधवाची जबाबदारी आहे कि तिचे रक्षण आणि संरक्षण करणे.
मराठी भाषेतील पद्य साहित्य आणि गद्य साहित्य हे भाषेच्या शास्त्रशुद्ध व्याकरणामुळे साकार झाले. आधुनिक काळातील महात्मा फुले यांचा 'शेतकर्यांचा आसूड' हा ग्रंथ इंग्रजांच्या काळातील नवीन बदल दाखवतो. यामध्ये इंग्रजी सत्तेमुळे शेतकऱ्याचेझालेले हाल, नवीन शैलीने रेखाटले आहे. तदनंतर वि. वा. शिरवाडकर, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी, कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर, ना. सि. फडके यांसारख्या साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा मराठी मनामनातून जागृत ठेवली. आज सामाजिकशास्त्रे, तत्त्वज्ञान, चित्रकला, साहित्य, संगीत, नाटक यासारख्या कलांचे समीक्षा-विचार मराठीत मूळ धरू लागले आहेत. तर एकीकडे इंग्रजीच्या वाढत्या वापरामुळे मूळ मराठी भाषा बदलत आहे. दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचे संवर्धन करणे, मराठीचे सौंर्दय, खानदानीपणा टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे.
मराठी पाऊल पडती पुढे असे म्हणत मराठी बाणा जागवत अनेक विभुतीनी आपल्या कलेच्या , कौशल्याच्या जोरावर जगात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.कितीतरी मराठी कादंबऱ्या इतर भाषेत प्रकाशित झाल्या आहेत.मागील महिण्यात आपण पाहिले कि रनजितसिन्ह दिसले सरानी सर्वोच्च मानाचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवत हे सिध्द केले कि आम्ही आमच्या भाषेत शिक्षण घेउन देखील जगाच्या पाठीवर एक छाप सोडु शकतो. नटसम्राट, नटरंग, तानाजी अशा कितीतरी कोटीच्या घरात कमाई केलेले चित्रपट मराठी भाषेने आपल्याला दिले आहेत.नक्कीच मराठी भाषा कालही श्रेष्ठ होती आजही आहे आणि उद्याही राहील.
मराठी प्रमाणभाषा जितकी महत्त्वाची तशीच तिच्या उपभाषा असणाऱ्या बोलीभाषा ही तितक्याच महत्त्वाच्या आहे त्या भाषांनीच मराठी बोली समृद्ध, संपन्न आणि विकसित झाली आहे बहुदा तिचा दर्जा दिवसागणिक वाढतच. संत साहित्य पाहिले तर कितीतरी बोलीभाषा असणारे अभंग,ओव्या, भारूड आणि भजने आहेत कि ग्रामीण भागातील लोकांना सहज, सोपी करून सांगता येइल अशीच इशभक्ती या संत महात्म्यानी आपल्या अफलातून रचनातुन मांडणी आहे.परंतु हे साहित्य समजुन घेताना कोणतीही भाषेची अडचण येत नाही कि बिकट वाटत नाही. ग्रामीण भागातील कवी, कथाकार, कादंबरीकार यांच्या लिखाणात बोलीभाषा नेहमी पुढे असतात बहुदा त्याच्या शिवाय एक अपूर्णता त्याना जाणवते. ग्रामीण लेखक आपली वास्तविकता दाखविण्यासाठी आपली बोलीभाषा प्राधान्य मानून लिखाण करत असतो आणि प्रत्येक साहित्यिकाला आपल्या बोलीभाषेचा तितकाच अभिमान आहे जितका मराठी भाषेचा.
पुढच्या पिढीनेही आपल्या बोलीभाषांचा हा अमुल्य ठेवा असाच जपून ठेवावा बहुदा वृध्दिंगत करावा अशीच माफक अपेक्षा एक मराठी हृदयस्पर्शी माणूस मनात बाळगून असतो. प्रत्येक भाषेचे आता वेगवेगळ्या पातळीवर सन्मेलन होत असते आणि तिचा विकास त्या भाषेतील साहित्यिकांचा सन्मानही केला जातो. भावी पिढी साठी आदर्श निर्माण करून दिला जातो आहे हि एक खुप चांगली गोष्ट आज घडत आहे. तर चला सर्व सज्ज होऊन मराठी भाषा तिचे साहित्य जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहचवुया आणि आपल्या परिने मराठीला सर्वोच्च स्थान प्रदान करुया आणि हाच मराठी भाषा दिना निमित्त आपला संकल्प असेल.
मनामनात मराठी
घराघरात मराठी
पोहचु जगभरात मराठी
