सगुण गोळी
सगुण गोळी
राजू एक हुशार व अभ्यासू मुलगा होता. शाळेत त्याचा नेहमी पहिला अथवा दुसरा नंबर असायचाच. त्याच्या तल्लख बुद्धिचे शाळेतल्या सगळ्या गुरूजनांना कौतुकच होते. जुन्याकाळची एस.एस.सी. म्हणजे मॅट्रिक परिक्षा त्यांने उत्तम गुणांनी पास
केली होती व कॉलेजला त्याने सायन्स शाखा घेतली होती.
शाळेत अकरावीला असताना इंग्रजी विषयात एक रेपीड रिडर असायचे, Robert Louis Stevenson यांचे "Dr. Jekyll and Mr. Hyde". रोबर्टच्या ह्या पुस्तकात माणसातल्या अंगातले चांगले आणि वाईट असलेले गूण वेगळे केलेले दाखवलेत. एकच माणूस, पण त्याची दोन रुपे. डॉ. जेकॅलने दिवस रात्र शोध लावून चांगला म्हणजे जेकॅल व वाईट म्हणजे मिस्टर हाईड अशी दोन रूपे दर्शवणारे रसायन तयार केले. दिवसभर मिस्टर जेकॅल एक सज्जन माणूस म्हणून वावरायचा व तोच रात्री वाईट दुष्ट वृत्तीचा माणूस मिस्टर हायड व्हायचा व संपूर्ण शहरास खूप त्रास द्यायचा. अशी स्टीफनसन्सची सुंदर उत्कंठा वाढवणारे कथानक होते. त्यावर इ़ंग्रजी चित्रपट तयार झाले व त्याला अनेक पारितोषिके ही मिळाली.
अकरावीत शिकलेल्या ह्या पुस्तकाचा प्रभाव राजूवर फार पडला होता. ते वयच तसे होते. काहीतरी नवीन उचापती करण्याचे. त्यामुळे राजू मिस्टर जेकॅल प्रमाणे रसायने करायला लागला. स्टीफनसन्सच्या पात्रात एक घोट रसायन घेतले की तो मिस्टर हायड व्हायचा. तशा प्रकारचे नवीन काही शोधायचे विचार त्याच्या मनात घोळत असायचे. अधून मधून आपल्या स्टडीरूममध्ये काही तरी उद्योग करायचा.
इंटर सायन्स उत्तम गुणाने पास झाल्यावर त्याला सहज मेडीकलला प्रवेश मिळाला. त्याच्या आईवडिलांनी त्याला हॉस्टेलवर राहायला पाठवले. मेडिकलच्या अभ्यासाच्या बरोबरीने तो त्याच्या मनातले संशोधनही करायच्या. अधून मधून काही शंका आल्या की प्राध्यापकांना विचारून सुधारणा करायचा.
हळू हळू वर्षे सरू लागली. पाच वर्षे कशी सरली कळलेच नाही. एम.बी.बी.एस. झाल्यावर इंटर्नशीप करता त्याचे रूरल पोष्टींग झाले. ह्या कालावधीत त्याच्या संशोधनाला दुप्पट वेग आला. त्यामुळे रात्री बेरात्री तो रसायन करण्यात व्यस्थ राहू लागला. शेवटी इंटर्नशीप संपायच्या वेळी त्याला संशोधनात यश मिळाले.
माणूस नेहमी वाईट नसतो. प्रत्येक वाईट वाटणाऱ्या माणसात सगूण ही असतात. राजूने अशा प्रकारचे रसायन तयार केले होते की दुष्टांकडून सत्कर्म करून घेऊन आपल्या देशाला, समाजाला वाईट प्रवृत्ती पासून वाचवता यावे.
राजू जर एखाद्या वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात आला तर लगेच तो त्याने लावलेल्या शोधाची गोळी तोंडात टाकणार, आणि दुष्कृत्य करणाऱ्या माणसाच्या शरीरात शिरून त्याच्या कडून चांगले काम करून घेणार.
ज्या गावी तो इंटर्नशीप करत होता तिथे महालक्ष्मीचे सुंदर मंदिर होते. जत्रेचे दिवस होते. गावच्या देवीला सगळ्या अलंकारांनी सजवलेले होते. रात्री उशिरा पर्यंत देवीचा उत्सव व्हायचा. हा उत्सव सतत चार दिवस होत असे. तेव्हा देवीला घातलेले दागिने देवळातच ठेवत असत.
त्या दिवसातल्या एका रात्री एका चोराचा चोरी करण्याचा बेत आहे हे राजूला त्याच्या बोलण्यावरून कळले. आज आपल्या प्रयोगाची चाचणी ह्या चोरावर करायचे त्याने ठरवले. म्हणून जत्रे पर्यंत तो चोराच्या आसपासच राहिला. रात्री जत्रा संपल्यावर सगळं सामसूम झाल्यावर चोर हळूच देवळाचा मागचा दरवाजा तोडून आत घुसला. राजूने पटकन गोळी तोंडात टाकली व तो अदृश्य झाला व त्याचा आत्मा त्या चोराच्या शरिरात घुसला. चोरी करण्यासाठी आलेल्या चोराने तिथल्या तिजोरीतले सगळे दागिने काढून देवीच्या अंगावर घातले. जणू पालखीच्यावेळी देवीला दागिन्यांनी सजवतात तशाच प्रमाणे त्याने देवीला सजवले. नंतर समोर उभा राहून देवीला साष्टांग नमस्कार करून तो मागच्याच दरवाजाने बाहेर पडला व सरळ आपल्या घरी निघून गेला. राजूने आपल्या तोंडातली गोळी काढून घेतली. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण आपला आनंद आपण व्यक्त करता कामा नये असे त्याला वाटले. अशा दुष्टांपासून जर आपण लोकांना वाचवू शकलो तर फारच छान होईल .मिस्टर जेकॅल प्रमाणे आपणही ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवायचे असे त्याने ठरवले. अजून काही वेगळ्या लोकांवर आपण प्रयोग करू व नंतरच "मिस्टर इंडिया" सारखे वावरून देशाचे म्हणजेच समाजाचे चांगले करू असे त्याने ठरवले.
पहिलाच प्रयोग सफल झालेला असला तरी बरेच प्रयोग करून संपूर्ण यशाची खात्री करून घेऊ म्हणून राजू समाजातल्या त्याला न आवडणाऱ्या गोष्टींवर त्याने प्रयोग करायचे ठरवले.
राजकीय क्षेत्रातले नेते लोक गरिबांना आश्वासने देतात व खुर्ची मिळाली की ते विसरून जातात. हे असे व्हायला नको. दिलेली आश्वासने त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यायचे त्याने ठरवले व त्याकरता त्याने आपल्या प्रयोगाने त्या त्या नेत्याच्या शरीरात प्रवेश केला व समाजाच्या भल्याची सगळी कामे करून घेतली.
नंतर त्याने जिथे जिथे भ्रष्टाचार चालतो तिथे जाऊन त्या भ्रष्टाचारी लोकांची मने पालटून टाकली. लाच देणारा व घेणारा दोघांनाही सद्बुद्धी दिली. अशा तऱ्हेने राजूने आपल्या देशाचे त्याच्या सगुण गोळीने सर्वांचे कल्याण केले.
