स्वावलंबी (भाग दोन)
स्वावलंबी (भाग दोन)
*स्वावलंबी*
शेवंताला घरी आणायच्या वेळी गणप्या दत्तूला पण शाळेत घेऊन गेला. तिथे त्याने त्या शिपायाला सांगितले "ह्याला भी शाळेत घालणार हाय."
"वाह! वाह! छानच. तुझं नाव काय रे पोरा?"
"मी दत्तू हाय"
"बरं, उद्या शेवंता बरोबर ये. मी साहेबांना सांगून ठेवतो."
गणप्या व दत्तूने शिपायाला नमस्कार केला. शेवंताला घेऊन ते घरी परतले. वाटेत शेवंताची एकसारखी बडबड चालली होती.
आज शेवंताचा शाळेतला पहिला दिवस आनंदात गेला म्हणून गणप्याने वाटेत टपरीवरून भजी व दोन लाडू विकत घेतले. घरी आल्यावर रखमाला चहा करायला सांगून तो परसात झाडांना पाणी घालायला गेला. शेवंता तिच्या शाळेतल्या सगळ्या गमती जमती मोठ्या उत्साहाने सांगत होती. ते ऐकून लेकीला शाळा आवडली म्हणून तिही खूप खूश झाली. चहा झाल्यावर सगळे कुटुंब एकत्र बसून गप्पा गोष्टी करत तिखट भजी, गोड लाडू व चहा घेऊन आप आपल्या कामाला लागली.
शाळेत काय काय केलं ते दत्तूला शेवंता सांगू लागली. दत्तूलाही ते खूप आवडले.
"तुझे मास्तर मला घेतील का शाळेत?"
"घेतील दादा. बापूला सांगितलं ना त्या शिपाई काकांनी."
"पण मला घालाया कपडे कुठे आहेत?"
"बापू आणील ना. बापू, ऐ बापू" असे म्हणून शेवंताने बापूला हाक मारली.
बापू नि रखमा परसदारी झाडांची काटछाट करत होती व त्याच बरोबर उद्या दत्तूला शाळेत पाठवायचे तर त्याला नवीन कपडे लागणार ह्याचा पण विचार करत होती. आताच नवीन कापड घेणे काही शक्य नव्हते, तेव्हा रखमा म्हणाली, "त्याच्या मावशीच्या लग्नात त्याच्या आजोबांनी नातवाला दिला होता तोच शर्ट घालायला सांगू. नंतर घेऊ मग. उद्याची नड तरी भागेल ना."
रखमाचे हे बोलणे शेवंताने ऐकले व तशीच ती धावत जाऊन दादाला म्हणाली, "दादा मावशीने लग्नात दिलेले कापड घालायचे तू असं आई बापूला सांगत व्हती. मी आता त्यांना बोलताना ऐकलं."
"लई झाक झालं बघ!" असं म्हणून दोघं ऐकमेकांचे हात धरून नाचू लागली.
ठरल्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी दत्तू व शेवंताला घेऊन गणप्या शाळेत गेला. शेवंताचा दाखला भरला होता तसाच दत्तूचा पण भरला व मोठे मास्तर व शिपायाला नमस्कार करून सरळ तो आपल्या शेतावर गेला. तेव्हा तिथे रखमा पण काम करत होती.
आज दोघांनी शेतात जास्त काम करायचे ठरवले होते. त्याप्रमाणे रखमा जेवण ही घेऊन आली होती. आजू बाजूच्या बायका त्यांच्याकडे बघून काही कुजबूज करत होती. त्यांचे काही शब्द रखमाच्या कानावर पडत होते.
"शिकून काय होनार हाय?"
"आता पोरांना शाळेत घातलं मग दोघं भी शेतात जास्त राबतील!"
"काय सांगू नग. पैका खूप हाय नव्ह त्यांच्याकडे, तुला भी कामावर ठेवतील!" असं म्हणून बायका आप आपसात हसत होत्या. गणप्याने ही ते ऐकले होते. त्यांने रखमाला म्हटले, "तिकडं नको बघू. तूझं काम करत रहा."
दोघंही झपाझप निंदणीचे काम करत होती. सूर्य डोक्यावर आला तसे दोघे पण हात पाय धुवून जेवायला बसली.
"दत्तूला भी जेवन देनार ना तिथं?"
"व्हय तर, दोघांनाभी मिलणार. फक्त शेवंता सारखा दत्तूला पैका मिलणार नाय."
"जाऊ दे. शिकाया अन् खायला मिलतं ना, बास झालं."
"हो. आपण दोघं खूप काम करू आनी पैका जमवून त्यांच शिक्षण करू."
जेवताना गणप्या आणि रखमाच्या अशा गप्पा रंगल्या होत्या.
गणप्या नि रखमा त्यांच्या शेतात काम करत होतीच त्याच बरोबर पैसे कमवण्यासाठी आणखी दुसरी वरची कामे ही करत होती. बस थांब्यावर गणप्या संध्याकाळी हमालीचे कामे करू लागला. रखमा चार घरची धुणी भांड्याचीही कामे करू लागली आणि हे सगळे त्यांच्या शेतीचे काम करूनच, फावल्या वेळेत.
अशी कामं करून दोघं ही खूप थकत होती. पण मुलांच्या भविष्यासाठी झटत होती. दत्तू व शेवंता दोघं बरोबर जायची व यायची म्हणजे शेवंताला नेण्याचा व आणण्याचा वेळ वाचत होता. दत्तू सुध्दा घरी आल्यावर घरातली लहान मोठी कामे करत होता. खरंच एक आदर्श सुखी कुटुंबच म्हणायचे.
एक दिवस शाळेतून आल्या आल्या दत्तूने मुख्याध्यापकांचा संदेश गणप्याला दिला. "बापू तुमास्नी सरांनी उद्या संध्याकाळी शाळेत बोलावलयं."
"कशापायी? काय केलं तू?"
"मी काय भी केलं नाय."
"शेवंता, इथं ये. आज शाळेत दादाने काही गडबड केली का?"
"कुणी बापू? मला तर काय खबर नाय." असे शेवंताने सांगितले.
"बापू, आज शाळेत वरचे मोठे साहेब आले होते. त्यावेळेस मुख्याध्यापकांनी मला त्यांच्या त्या साहेबांना भेटवलं. तेव्हा आपले मुख्याध्यापक आणि साहेब माझ्याकडे पाहून काही बोलत व्हते. मला समजलं नाय. नंतर मला तुम्हाला उद्याला शाळेत या असा निरोप द्यायला सांगितला. तेच तुम्हासनी म्या सांगितलं." असे दत्तूने सांगितले. हे ऐकल्यावर गणप्याचा जीव भांड्यात पडला. म्हणजे पोरान काय भी केलं नाय तर असं त्याला समजलं.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शाळा सुटायच्या वेळेला गणप्या शाळेत गेला. तो पोचला तेव्हा शाळा सुटली होती. दत्तू व शेवंता पण बापू येणार म्हणून वाट पाहत होती.
गणप्या आलेला बघून शाळेचा शिपाई त्याला बोलला, "तुम्ही थांबा इथं. साहेबांना सांगून येतो." असं म्हणून तो मुख्याध्यापकांच्या खोलीत गेला. तसे लगेच येऊन त्याने गणप्याला साहेबांच्या खोलीत जायला सांगितले.
गणप्या थोडा घाबरतच आत गेला व साहेबांसमोर हात जोडून उभा राहिला.
"या गणपत, आम्ही तुम्हाला इथं बोलावलं त्याचं कारण म्हणजे तुमच्याकडून आम्हाला थोडी माहिती हवी होती. तुमच्या वस्तीत शिकण्यासाठी लहान मुले किती असतील? ह्याचा अंदाज तुम्ही देवू शकाल का? म्हणजे बघा, तुमची शेवंता आणि दत्तू शाळेत शिकतात हे तुमच्या वस्तीतल्या लोकांना एव्हाना कळलेच असेल. त्यांनाही त्यांची मुले शाळेत शिकावी असे वाटते का? तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत घातलं ते किती चांगलं झालं. इथं जेवण मिळतं व मुलींना प्रत्येक महिन्याला पैसे पण मिळतात हे त्यांना सांगा. त्यांना त्यांच्या मुलांना शिकावायला प्रोत्साहित करा. नंतर त्या मुलांचा आकडा आम्हाला कळवा."
"बघतो, त्यासनी विचारतो आनी आकडा कळवतो."
"आणि हे बघा, हे काम एका आठवड्यात व्हायला पाहिजे. तुम्हाला थोडी मदत करायला आम्ही आमचा एक शिपाईही देतो. तो शिपाई मुलांच्या नावाची लिस्ट बनवील. म्हणजे सरकारने दिलेल्या कामाला लवकर सुरूवात होईल."
"सरकारचं कसलं काम साब?"
"ते तुम्हाला आम्ही नंतर सांगतो. जे काही करतो ते तुमच्या मुलांच्या भल्यासाठीच असेल. उद्या शाळा सुटल्यावर तुमच्या मुलांबरोबर शिपाई ही येईल. त्याला घेऊन तुम्ही वस्तीवाल्यांना मुलांना शिकावायला तयार करा. जी शिकायला तयार असतील त्यांची नावे शिपाई लिहून घेतील. कळलं ना? आता चला तुम्ही घरी आणि कामाला लागा."
गणप्याने मानेनच होकार दिला व आपल्या मुलांना घेऊन तो घरी परतला.
*क्रमशः*
शोभा वागळे
मुंबई
