पावसाळी एक संध्याकाळ
पावसाळी एक संध्याकाळ
बस कंडक्टरने घंटी वाजवून आरोळी ठोखली "चला उतरा पोष्ट-ऑफिस स्टॉप आला. उतरा पटापट." माझा स्टॉप पोष्ट-ऑफिसच होता. खांद्याला पर्स लावून मी वरती ठेवलेली बॅग काढून घेतली आणि बस मधून उतरले. माझा अंदाज होता मला कुणीतरी घ्यायला येईल. पण कुणीच आले नव्हते. म्हटले आपली बस लवकर आली असेल येईल कुणीतरी. तो पर्यंत स्टॉपच्या बाकड्यावर बसू म्हणून मी तिथे असलेल्या मोडक्या बाकड्यावर बसले. माझ्या बरोबर आणखीही प्रवासी उतरले होते. मी मात्र सावकाश शेवटी उतरले होते. माझी शोधक भिरभिरती नजर इकडे तिकडे जाई पर्यंत सगळे प्रवासी कुठच्या कुठे गेले काही कळलेच नाही. आता त्या थांब्यावर मी एकटीच होते. दिवस ही ढळत चालला होता. फोन लावून बघू म्हणून मी पर्स मधून फोन काढला तर फोन चार्ज नसल्याने बंद पडला होता. आता झाली पंचाईत! मी कोणत्या बसने येणार, बस नंबर वगैरे सगळे कळवले होते. तरी एवढी निष्काळजी या लोकांची! खरं पाहिलं तर मला त्यांचा राग व चीढ ही आली होती. उगीच आलो या मैत्रिणीच्या लग्नाला. असे ओसाड गाव असेल असे कळले असते तर आलेच नसते.
क्षमा, आमची मैत्रीण ही येणार होती. पण तिच्या आईच्या अचानक आजारपणामुळे तिचं येणं कॅन्सल झाले. मी ही जात नाही म्हटल होते, तेव्हा क्षमानेच आग्रह केला. "आईला बरं वाटलं की मी येईन लग्नाला. तू तरी मेंहदी, हळदीच्या कार्यक्रमाला जा," असे म्हणून मला जबरदस्ती पाठवले. अशा रितीने मी आड गावात येऊन पडले. काय करावे मला काही कळेना. मनातून मला भिती ही वाटू लागली. मला न्यायला कोणी नाही आलं तर! मी मनातल्या मनात स्वामींचा जप सुरू केला.
एक दोन मिनिटे झाली असतील एवढ्यात एक बाईकवाला स्टॉपवर आला. त्याने बाईकचा वेग कमी केला आणि मला विचारले, "मॅडम, कुठं जायच आहे?" आता इथे कोणतीच बस येणार नाही. तुम्ही घरी जा." त्याच्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरे द्यायच्या अगोदर मी माझ्या मैत्रिणीचे नाव व तिच्या लग्नाला आले आहे हे सांगितले. "अच्छा, या तर मग. मी ही तिकडेच चाललोयं," तो म्हणाला.
माझ्या मनात जाऊ की नको असे विचार यायच्या अगोदर मी पटकन जायला तयार झाले. आता तिन्हीसांजेला इथे एकटं राहण्यापेक्षा कुणाच्या सोबत असलेले बरं म्हणून मी त्यांच्या बरोबर जायला तयार झाले.
बाईकस्वाराने आपले नाव हेमंत देसाई असे सांगितले व ते माझ्या मैत्रिणीच्या भावाचे मित्र असून त्यांच्याकडेच चाललेत हे सांगितले. तेव्हा माझा जीव भांड्यात पडला.
बाईकवरचा माझा प्रवास सुरू झाला. एवढ्यात टपटप पावसाचे थेंब पडू लागले. विजा ही चकाकू लागल्या व ढगांचा गडगडाट ही सुरू झाला व पावसाचा जोर ही वाढला. हेमंत म्हणाला, समोर दिसणाऱ्या देवळात आपण थांबू आणि पाऊस कमी झाल्यावर जाऊ."
"किती दूर आहे लिनाचे घर"?
"जवळच आहे. दहा मिनिटात पोचू आपण. पाऊस कमी होऊ दे थोडा."
"बरं चालेल," मी म्हणाले. बाईक पार्क करून आम्ही देवळाचा आडोसा घेतला.
त्या देवळाच्या एका कोनाड्यात दोन माणसे आपापसात बोलत होती. त्यांचे काही शब्द माझ्या कानावर पडू लागले. त्यात माझ्या नावाचा उल्लेख केलेला माझ्या कानावर आला. मी कान टवकारले व नीट लक्ष देऊन त्याच्या गप्पा ऐकू लागले.
"अरे, लिनाबायच्या दोन मैत्रिणी शहरातून आज येणार म्हणून त्यांना आणायला सदा रिक्षा घेऊन निघालेला. पण नाक्यावर अचानक एक पाडसू त्याच्या रिक्षा समोर आलं. त्याला वाचवायला सदाने रिक्षा फिरवली ती एकदम उलटलीच की हो. जबर मार लागला सदाला. त्याला दवाखान्यात नेलं. दवापाणी केलं. शुध्दीवर आल्यावर त्याने पाहुण्याना आणायचे असल्याचे सांगितले. म्हणून मी बस स्टॉपवर चाललो होतो, पण अचानक पाऊस आल्याने थांबावे लागले. गण्याकडे जाऊन त्याची रिक्षा घेऊन जायच आहे. शहरातले पाहूणे वैतागले असतील!"
माझ्या बरोबर असलेल्या हेमंतने ही त्यांचे बोलणे ऐकले होते. त्याने त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. ह्या तुमच्या मालकाच्या पाहुणीला मी घेऊन जातो. आता गणूच्या रिक्षाची गरज नाही आणि तुम्ही ही परत चला." असे हेमंतने त्यांना सांगितले. पाऊस कमी झाल्यावर आम्ही बाईकवरून लिनाच्या घरी निघालो.
पाऊस कमी झाला होता. पाण्यामुळे लाल मातीच्या रस्त्यावर चिखल झाल्यामुळे हेमंत बाईक सावकाश चालवत होता.
त्या दहा मिनिटात, रिमझिम पावसात हेमंत व माझी ओळख झाली. आपापसात आम्ही त्या दहा मिनिटात बरच काही बोलून एकमेकांची माहिती मिळवली. हेमंत सॉफ्टवेअर इंजीनियर होता. मुंबईत चांगल्या कंपनीत मॅनेजरच्या पोस्टवर काम करत होता. त्याच घर ही लिनाच्या घरा शेजारीच होते. त्याच्या घरी त्याचे आई, बाबा, एक मोठा भाऊ, वहिनी व त्यांचा चार वर्षाचा एक गोड मुलगा होते. लिनाच्या घरी त्यांचा छान घरोबा होता. मी ही हेमंतला माझ्याबद्दल सगळे सांगितले. त्या बाईकवरच्या दहा मिनिटाच्या प्रवासात आमची छान मैत्री जमली. मगाशी चिंतेने ग्रासलेले माझे मन हलके फुलके झाले होते आणि हेमंत सारखा मित्र लाभल्याने मन मोर नाचत होता.
आम्ही लिनाकडे पोचलो तेव्हा पाऊस थांबला होता. लिना मला एकसारखी फोन लावत होती. मी एकटीच येतेय व त्यात पाऊस म्हणून ती व तिच्या घरचे काळजी करत होते. सदाच्या अपघाताची बातमी ही त्यांना कळली होती. घरातली एक दोन माणसे त्याची खबर घ्यायला हॉस्पिटलमध्ये गेले होते व दोघांना दुसरी रिक्षा घेऊन मला आणायला पाठवले होते. मला हेमंत बरोबर आलेली पाहून सगळ्यांनाच आनंद झाला. लिनाची आई तर म्हणाली, "खरा देवदूता सारखा धाऊन आलास रे बाळा हेमंता!"
"हो काकू, देवदूतच म्हणावे लागेल. माझा फोन ही बंद असल्याने मी खूप घाबरले होते. स्वामींचे नामस्मरण करत होते. तेवढ्यात हेमंत आल्याने सुखरूप पोचले. एकटी त्या सामसूम
थांब्यावर पावसाळ्यात थांबले असते तर माझं काही खरं नव्हतं!
पावसाने मला पूर्ण भिजवले होते. मी हातपाय धुवून कपडे बदलून येई पर्यंत गरम चहाचे कप व भरपूर खायलाही ठेवले होते. मलाही जाम भूक लागली होती. गप्पा मारता मारत मी माझा पोटोबा उरकून घेतला. हेमंत ही चहा झाल्यावर येतो सांगून आपल्या घरी गेला. जाताना ज्या दृष्टीने त्याने माझ्याकडे पाहिले त्यावरून लिनाने मला चिढवायचे सोडले नाही.
"चल गं, रुखवत दाखवते ना मला. बघू दे तरी बाईसाहेब काय काय घेऊन चाललीय ते!'
"हो ,चल वर माडीवरच जाऊ" असे सांगून माझा हात पकडून ती मला दगडाच्या जिन्यावरून माडीवर घेऊन आली.
"आता अंधार आहे. उद्या सगळं घर दाखवते मी तुला.
मेंहदी लावायलाही बाई उद्या येणार आहे दुपारी. दक्षा येते म्हणाली ना गं. तिच्या आईला बरं वाटू दे बाई."
"हो गं, मी देवाकडे हेच मागते. चल तिला अगोदर फोन लावू .ती ही माझी काळजी करत असेल" असे म्हणून आम्ही दक्षाला फोन लावला. तिच्या आईलाही आता बरं वाटतयं असं ती म्हणाली. त्यामुळे आम्हा दोघीना छान वाटले. नंतर आम्ही उशीरा पर्यंत तिच्या रुखवतच्या वस्तू पाहत बसलो. तिच्या मामी - मावशा, आत्या- काकू या ही रुखवत बघत होत्या व आम्हा सर्वांच्या गप्पा ही छान रंगत होत्या. लिनाच्या घरात मला पाहूण्या सारखे वाटलेच नाही. फार जुनी ओळख असल्यासारखे सगळेच वागत होते. खूप बरं वाटलं मला तिच्या घरी.
लग्नघरात गडबड गोंधळ, पाहुण्यांची सारखी वरदळ चालूच होती. कालचा पाऊस आज मुळीच नव्हता. प्रसन्न असे वातावरण होते. लिनाला घेऊन सगळे देव दर्शनाला जवळच्या देवळात निघाले. लिनाचा भाऊ उदय व त्याचा मित्र हेमंत ही बरोबर होते. देवाला सांगणे घालण्यासाठी वयस्कर चार माणसे ही बरोबर होती व लिना बरोबर मी ही होते. देवाला नारळ ठेवला. पुरोहिताने मंत्रपुष्पांजली म्हणून सर्वांना प्रसाद दिला. पंधरा मिनिटात काम आटोपले.आम्ही घरी यायला निघालो. तेवढ्यात हेमंत व उदय आम्ही जरा वरती टेकडीवर जाऊन येतो म्हणून दुसऱ्या बाजूने निघाले. तेव्हा लिना उदयला म्हणाली "अरे उदय, नीताला पण घेऊन चला. टेकडीवरून दिसणारा गावचा नजारा तिला ही बघता येईल." मी नको म्हणाले पण सर्वांनीच मला जायचा आग्रह केला. लिना म्हणाली, "आज येणार नाही गं पाऊस. जा तू, आणि हेमंत आहे ना बरोबर, मग जाच" आणि तिने डोळे मिचकावले. मी जरा रागावले तर तिने मला ढकलले. "चल गं, आणि ये लगेच तुला पण मेंहदी काढायची आहे ना!" मग माझा ही नाईलाज झाला. मी त्या दोघांबरोबर निघाले.
टेकडीचा चढाव जरा ओबडधोबड होता. एक दोन वेळा माझा पाय घसरला पण उदय व हेमंतने मला सावरले. खरंच टेकडीवरून संपूर्ण गावचे दृष्य विलोभनीय दिसत होते. सगळीकडे हिरवी गार शेती. छोट्या नदीचे पात्र नागमोडी वळणाने दूर समुद्राकडे जाणारे. लाल मातीचे रस्ते त्यांच्या दोन्ही बाजुला हिरवाई व मध्ये विखूरलेली गावची टुमदार घरे. आताच भेट दिलेले मंदिर ही वरून किती सुंदर दिसत होते. टेकडीवर उभे राहून सभोवतालचे दृष्य मी डोळे भरून पाहून घेतले. हेमंतकडे कॅमेरा होता. त्याने ती दृष्ये कॅमेऱ्यामध्ये टिपून घेतली. तिथून हलूच नये असे वाटत होते. संध्याकाळचा वारा ही छान वाहत होता. अशा निसर्गाच्या सन्निध्यातले सौख्य काय असते ते शहरी माणसांना काय माहीत! मी निसर्गाचा मन मुराद आनंद घेत होते. तेवढ्यात उदय म्हणाला, "चला जाऊया घरी. काळे ढग जमायला लागलेत. टेकडीवर उजेड दिसतो पण खाली उतरे पर्यंत अंधार होईल. पावसाची चिन्हे दिसतात. चला उतरुया." तरी हेमंतने एक दोन अजून फोटो काढलेच.
कालच्या सारखाच पाऊस येणार असे नभाकडे पाहून वाटत होते. तेवढ्यात विजा चमकू लागल्या व ढगांचा गडगडाट ही सुरू झाला. आम्ही झपाझप खाली उतरू लागलो. त्या दोघांना सवय होती पण मी नवखी असल्याने गडबडू लागले. उतार असल्यामुळे तर जास्तच भिती वाटू लागली. एका बाजूला हेमंत तर दुसऱ्या बाजुला उदय असे आम्ही उतरू लागलो. दोघेही माझी काळजी घेत होते. पायाखालची जमीन ही बरोबर दिसत नव्हती. नभाने ढगांचे छत्र धरल्यामुळे जास्तच अंधार दाटला होता. मी सावकाश चालत होते तरी एका दगडाची ठोकर मला लागलीच. मी "आई गं" करून किंचाळले आणि पाय धरून बसले. माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्यातून भळाभळा रक्त वाहत होते. ते पाहून मला रडायलाच येऊ लागले. एवढ्यात हेमंतने बाजूच्या रोपट्याची पाने कुसकरली व तळहातावर गोल गोल फिरवून त्याची गोळी केली व त्याचा चोथा माझ्या अंगठ्यावर आपल्या दोन्ही हातानी दाबून धरला. जादू झाल्यागत माझ्या वेदना व रक्त वाहणे ही थांबले. नंतर हेमंतने आपल्या खिशातल्या रुमालाने माझ्या अंगठ्याला छान बॅण्डेज केले. एव्हाना पाऊस ही सुरू झाला होता. उतरत्या टेकडीवर फक्त झाडांचा आडोसा होता. तिथे आम्ही थोडावेळ थांबलो. आमच्या जुजबी गप्पा चालल्या होत्या. तेव्हा हेमंत म्हणाला, "मला वाटतं जिथे नीता तिथे पाऊस",आणि उदयने ही त्याला दुजोरा दिला. "ह्या पावसाची वेळ ठरलेलीच आहे वाटतं. काल पण असाच कोसळत होता" मी म्हटले तेव्हा उदय म्हणाला, हो तर, शहरातल्या पाहुणीला भिजवायला त्याला आवडत असावं!" थोड्या वेळानं पाऊस थांबला व आम्ही घरी परतलो. घरात सगळ्या बायका एकमेकांच्या हातावर मेंदी काढत होत्या. मी ही त्याच्यात सामील झाले.
लिनाच्या लग्नाचे चार दिवस खूप मजेत आणि आनंदात गेले. क्षमा काही आली नाहीच पण तिची उणीव हेमंत व उदयने भरून काढली. गावच्या लग्नाचे सोहाळे वेगळेच म्हणजे खरोखरंच अर्थपूर्ण वाटले. सगळं पारंपारिक पद्धतीने, अगदी विधीपूर्वक, घाई गडबड न करता, आरामशीर केले गेले. नाहीतर आपली शहरातली लग्नं आणि त्यांचे हॉलवर एका दिवसात गुंडाळून टाकलेले विधी! मी तेव्हाच ठरवलं माझं लग्न सुद्धा असच गावी व्हायला पाहिजे.
दुसऱ्या दिवसाचे माझे परतीचे तिकीट होते. मी बॅग भरली. बस थांब्यावर पोचवायला उदय येणार होता. सर्वांनी मला अजून दोन दिवस थांबायचा आग्रह केला, पण मला मुंबईला पोचायलाच हवे होते. सकाळी आठची बस होती. वेळेपुर्वीच आम्ही थांब्यावर पोचलो. बस वेळेवर आली. मला उदयने बसमध्ये येऊन माझी बॅग वगैरे वर ठेऊन दिली व मला टाटा करून तो उतरला. मी जड अंतःकरणाने त्याला परत टाटा बाय केले. "हॅपी र्जनी. हॅव अ गुड कंपानी" असे हसून तो बोलला आणि एवढ्यात बस सुटली. माझ्या सीटवर बसलेल्या माणसावर माझे लक्ष गेले व मी आनंदाने ओरडले "अरे हेमंत, तू पण ह्या बस मध्ये! मला काही बोललाच नाहीस तू?"
"हो, तुला आनंदाचा धक्काच द्यायचा असे उदयने सांगितले होते. मी आणखी दोन दिवसांनी निघणार होतो, म्हणून तर लिनाच्या घरचे तुला दोन दिवस राहायला सांगत होते. पण तू आजच जायचा हट्ट धरलास, मग ! तुला एकटी नको सोडायला म्हणून दोन्ही घरच्यांनी मला आज तुझ्या बरोबर जायला सांगितले."
"छान केलं. प्रवासात सोबत असली तर तो कंटाळवाणा होत नसतो. त्यातून तुझी सोबत, मग तर विचारायलाच नको!
"तसं तर मी तुला आयुष्यभर सोबत द्यायला तयार आहे. पण तुझी व तुझ्या घरच्यांची अनुमती असेल, तर? मला तू आवडली होतीच. माझ्या घरच्यांना पण तू खूप आवडलीस. आता निर्णय सर्वस्वी तुझा."
त्याच्या ह्या बोलण्यावर मी काय बोलावे मला कळेना. माझा आनंद गगनात मावत नव्हता. त्या रिमझिम पावसात बाईकवरून जाताना मनात प्रीत उमलली होती. एक संध्याकाळ ओल्या पावसाची, खरंच ही पावसाळी संध्याकाळ माझा जीवनपट बदलायला, मला हवं हवं असं आयुष्य जगायला प्रोत्साहित करत होती! तिला नाही कसं म्हणायचे? लिना मस्करी करत होतीच व मी लटके रागवत ही होते, पण मनातून मला ते आवडत होते. माझी पसंती माझ्या आई बाबांनाही आवडेल ह्याची मला खात्री होतीच. शिकलेला सवरलेला, घरंदाज घराण्याचा, उत्तम हुद्याची शहरात नोकरी करणारा व गावी शेतीवाडी अन् एकत्र कुटुंबातल्या मुलाला नाही म्हणणे अशक्यच होते.
मी लाजले अन् प्रेमाने हेमंतचा हात धरला नि म्हटले, "नक्कीच, मिसेस हेमंत व्हायला आवडेलच मला."
आमच्या गप्पा रंगल्या आणि भावी आयुष्याची सुखी स्वप्ने पाहत मी हेमंतच्या खाद्यांवर डोके विसावून कधी झोपी गेले ते मला कळलेच नाही.
(समाप्त)

