STORYMIRROR

Shobha Wagle

Tragedy Inspirational

3  

Shobha Wagle

Tragedy Inspirational

जिद्द

जिद्द

13 mins
287

रवि मावळतीला झुकला होता. कोवळ्या उन्हाचा प्रकाश सभोवताली पसरला होता. पिवळ्या सोनेरी सूर्य किरणांनी पश्चिमेचे नभांगण केशरी प्रकाशाने भरले होते व त्याचे प्रतिबिंब खाडीच्या पाण्यावर तरंगत होते. बाकीच्या बायकांबरोबर सरला सुध्दा बांधावरून चालत होती. शेवटची होडी त्यांना गाठायची होती. सगळ्यांची पावले झपझप चालली होती पण सरला सृष्टी सौंदर्यात रमल्याने तिचे पाय मंदावले होते. राधिकाने ते पाहून तिला हटकले, "अगो बयो, चल की बिगी बिगी. त्या बाया होडी कडे पोचल्या की. आपन राहू मागं. चल झरझर आता. दादू नावाड्याने होडी सोडली तर बोंबलत बसावं लागंल", असे म्हणून राधिकेने सरलाचा हात धरून धावायला सुरुवात केली. किनाऱ्यावर पोचली तर दादू त्यांचीच वाट पाहत होता. तो खेकसला, "का गं तुम्ही दोघी नेहमी उशिरा येता. रोजच थांबावं लागतं. उद्यापासून मी थांबणार नाही. मग रहा दोघी रात्रभर इथेच किनाऱ्यावर."

दोघी गुपचूप होडीत बसल्या. बाकी बायकांच्या शेतातल्या कामाच्या गप्पा रंगल्या होत्या. सरलेला त्यात मुळीच रस नव्हता. त्याला कारण ही तसेच होते. सरला चौथी पर्यंत शिकलेली होती व अजून पुढे तिला शिकायचे होते. पण नशिबाचे फासे उलटे पडले व तिला सगळ्यावर पाणी सोडून गरीब शेतकऱ्याची बायको व्हावे लागले. 

सरला, तिचे बाबा व आई गरीब असले तरी सुखी कुटुंब होते. ऐकुलती एक मुलगी म्हणून आईबाबा सरलेचे खूप कोड-कौतुक करत होते. त्यांनी तिला शाळेत ही घातलं होतं. तिचे बाबा गिरणीत कामाला होते व आई चार घरी धुणीभांडी करत होती. त्यामुळे सगळं नीट चाललं होतं. पण दैवगती वा नशीब म्हणा, चार दिवस साधा ताप तिच्या आईने अंगावर काढला व त्यातच ती दगावली. कुटुंबावर आभाळ कोसळले. 

सरलाची मावशी बिन लग्नाची होती. तिचे लग्नच होत नव्हते. तेव्हा सरलाच्या आजोबांनी मावशीलाच सरलाची आई करायची मागणी जावयांकडे केली. तिच्या वडिलांचा ही निरूपाय होता. मावशी पोरीला आईच्या मायेने वाढविल म्हणून बुडत्या संसाराला आधार म्हणून त्यांनी तिला स्विकारले. सुरुवातचे काही दिवस ती मावशी अधिक आई अशी छान वागली. पण हळूहळू सावत्र आईचे रंग ती दाखवू लागली.

सर्व प्रथम तिने मुलीला जास्त शिकून काय करायचे असे म्हणून तिची शाळा बंद केली. तिच्या वडिलांनी खूप विरोध केला पण शेवटी त्यांचा नाईलाज झाला. मावशी सुध्दा आईचे प्रेम देईल, आपल्या बायको सारखीच तीही प्रेमळ, मन मिळावू असेल असे त्यांना वाटले होते, पण अशा कजाग बाईला आपण सावत्र आई म्हणून आणून आपल्या लाडक्या मुलीला दुःखाच्या खाईत लोटले याचा त्यांना खूप मनःस्ताप झाला. सरला मावशीला मावशीच म्हणायची, पण तिने मला 'धाकटी आई' म्हणायचे असा हट्ट धरला.

तेव्हा पासून मावशी आईने सावत्र आईचा त्रास जास्त सुरू केला व सरलाला घर कामाला जुंपले. नवऱ्यासमोर ती प्रेमळ आई असल्याचा देखावा करायची व तो कामावर गेला की सावत्रपणा दाखवायची. घरातली सगळी कामे ती एवढ्याशा पोरीकडून करून घ्यायची. मावशी खोटे वागते हे तिला कळत होते. पण तिने आपल्या नव्या आईची तक्रार वडिलांकडे केली नाही.

तिने काही सांगितले नाही तरी शेजारी पाजारी होतेच की, त्यांनी सरलाच्या त्रासाबद्दल तिच्या वडिलांच्या कानावर घातले. सरलाला वडिलांनी विचारले, पण आईच्या धाकामुळे तिने काहीच सांगितले नाही. ती खोटे बोलते हे तिच्या नजरेतून त्यांना स्पष्ट दिसत होते. मग तिच्या वडिलांनी सरलाच्या आजोबांना बोलावून घेतले व त्यांच्या मुलीला, आपल्या बायकोला, चार गोष्टी समजावून सांगायला सांगितले. पण कुठचं काय. तिच्यात काही बदल झाला नाही. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी आपली चुगली केली व नवऱ्याने वडिलांना बोलावले म्हणून तिने जास्तच कांगावा केला.

"अगं, तुझ्या ताई सारखा सुखाचा संसार कर. तुझ्या स्वभावामुळे तुला कुणी पसंत करत नव्हते. ताई गेल्याने मी तुला ह्या भल्या माणसाच्या गळ्यात बांधली. अगं, तुझ्या ताईची मुलगी ती तुलाही मुलीसारखीच ना? आईची नाही तर निदान मावशी सारखी तरी थोडी माया कर", असे वडिलांनी तिला खूप समजावून सांगितले पण सगळे पालथ्या घड्यावर पाणी. जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही. त्याप्रमाणे तिच्यात काहीच बदल झाला नाही. सरलाच्या वडिलांना काय करावे काही सुचेना. मेहुणीला बायको केल्याचा त्यांना खूप पश्चाताप होत होता. आयुष्यात खूप मोठी चूक करून बसलो म्हणून ते स्वतःलाच दोष देऊ लागले. सावत्र आई अगोदर त्यांच्या समोर तरी चांगुलपणाचा देखावा करत होती पण आता ती उघड उघड त्यांच्या समोर सरलावर ओरडू लागली, मार झोड करू लागली. तिच्या अशा वागण्याने सरलाच्या वडिलांचे चित्त थाऱ्यावर राहत नसे. एक दिवस जे व्हायला नको होते तेच होऊन बसले. एक दिवस कामावरून घरी येताना, आपल्याच चिंताग्रस्त तंद्रीत चाललेल्या सरलाच्या वडिलांना एका कारने धडक दिली आणि त्यातच त्यांचा जीव गेला. सरलाच्या मायेचा पाश देवाने हिरावून घेतला. आता ती पूर्णपणे सावत्र आईच्या कचाट्यात सापडली.

नवऱ्याचे दिवस संपताच तिने मागचा पुढचा विचार न करता सरलाला विकून टाकण्याचा कट रचला. तिचा हा कट हाणून पाडण्यास सरलाच्या शेजाऱ्यांनी खूप धावपळ केली. सरलाचे वडील वारल्यामुळे तिचे शेजारी आता अतिदक्ष झाले होते. तिच्या सावत्र आईच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचे काटेकोर लक्ष होते. सरलाचे आजोबा व पोलिसांना त्यांनी ह्या कटाची पूर्वसूचना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सरलालाही सुचना दिल्या होत्या. म्हणून जेव्हा शेवटच्या बोलणीसाठी ती माणसे आली त्याच वेळी पोलिसांनी सापळा रचून त्यांना रंगे हात पकडले. पोलीस दोन वर्षांपासून ज्या टोळीच्या मागावर होते त्या टोळीचा शोध शेजाऱ्यांच्या दक्षतेमुळे असा लागल्याने त्यांनी शेजाऱ्यांचे खूप खूप आभार मानले. नंतर पोलिसांनी त्या मुली विकणाऱ्या टोळीला व सरलाच्या सावत्र आईला कोठडीची हवा खायला नेले आणि सरलाला आजोबांच्या हवाली केले.

सरलाचे आजोबा वयस्कर व थकलेले होते. त्यांच्या हयातीतच तिचे दोनाचे चार हात करावे असे त्यांना वाटले तरी काही गैर नव्हते. त्यातच सरलाला अठरावे वर्ष संपून एकोणीसावे लागणार होते म्हणून त्यांनी तिच्यासाठी वरसंशोधन सुरू केले आणि तिच्या भाग्याने शेजारच्याच गावातला एक होतकरू तरूण त्यांना सापडला.

तो मॅट्रिक झाला होता व एका कारखान्यात कामाला होता. तसेच त्याच्या आई बाबांना शेतीच्या कामातही मदत करत होता. गावात सारेच शेतकामात जुंपायचे. शेतीची कामे आटोपली की फावल्या वेळेत इतर लहान मोठी कामे करायचे.

सरलाच्या घरची माणसें खूप छान होती. आई वडिलांकडे सुखात घालवलेले दिवस तिला आठवावे एवढे छान तिचे सासू सासरे होते. सरलाला खूश बघून आजोबांना धन्य धन्य झाले. सावत्र आईचा जाच एका भयानक स्वप्नासारखा तिला भासला. वडिलांचा सहवास सोडून बाकी सारे स्वप्न पुन्हा कधी वाट्याला न येवो अशी तिने देवाकडे प्रार्थना केली. पण तिच्या सुखाला कुणाची तरी दृष्ट लागली.

जुलैचा महिना होता. सरलाचा नवरा तालुक्याला कारखान्यात गेला होता. सरलाला घरातले कामे उरकायला सांगून तिचे सासू सासरे त्यांच्या शेतावर गेले होते. त्या दिवशी सकाळ पासून पाऊस कोसळत होता. दुपार सरली तरी पाऊस कमी होईना. सारखा धो धो कोसळत होता. सरला घरी स्वयंपाक करून सासू सासऱ्यांची वाट पाहत होती.

तिला सासू सासऱ्यांची काळजी वाटली. शेतावरच्या खोपटात ते कसे बरे राहणार? आपण जावं का शोधायला म्हणून दार उघडून ती बाहेर जाणार एवढ्यात पाण्याचा भला मोठा लोट घरात घुसला व घर पाण्याने भरून गेले. घरातली भांडी कुंडी, कपडे- लत्ते पाण्यावर तरंगू लागले. सरलाची भितीने बोबडी वळली. तरी घरातली शिडी घेऊन ती घराच्या छपरापर्यंत पोचली. हाताने कशीबशी कौले बाजूला सारून ती छप्परावर चढली. वरून बघितले तर सगळीकडे हाहाकार माजला होता. सगळी कडे पाणीच पाणी साठले होते. नदीचे पाणी गावात शिरले होते आणि ते वाढतच होते. आता जगणं कठीण आणि मरण मात्र निश्चित असे तिला वाटू लागले. सासू सासऱ्यांचे काय झाले असेल या चिंतेने तिला ग्रासले. सगळीकडे बोंबाबोंब होत होती. अख्खा गाव पाण्यात बुडाला होता. फक्त घरांची कौले पाण्यावर दिसत होती. पाण्याच्या प्रवाहा बरोबर गुरे ढोरे वाहत होती. वरून सरलाने ते पाहताच ती वर कौलांवर चक्कर येऊन पडली.

मध्यरात्री तिला जाग आली. तेव्हा पाऊस थांबला होता. अगोदर तिला काही कळलेच नाही. पावसाची सारखी रिपरिप, अंगावरचे ओले चिंब कपडे हे सगळे बघितल्यावर तिला दुपारचा प्रसंग आठवला.

"अरे देवा, नदीला पूर आला? दोन दिवसाच्या पावसाने नदीला पूर? कसं शक्य आहे?" ती मनात विचार करू लागली. पूर येणार असेल तर तशी बातमी देऊन लोकांना सतर्क करतात, मग हे असं कसं झालं. पूर येण्या सारखा काही पाऊस नव्हता!" 

त्या रात्री ती वरती कौलावरच राहिली त्या शिवाय काही उपायच नव्हता. सासू सासऱ्यांचे काय झाले असेल?, तिला काळजी वाटली. "देवा, त्यांना माझ्यासारखं सुखरूप ठेव. माझा नवरा कोठे असेल? माझं कुंकू साभांळ रे देवा" असा देवाचा धावा करत तिने रात्र घालवली.

सरकारची मदत करणारी माणसे आली होती. कौलांवर पडलेली सरला कोणाला दिसली नव्हती. ती जेव्हा उठून बसली तेव्हा लोकांना तिची खबर मिळाली. त्यांनी तिला तिथेच थांबायला सांगितले. तिच्या करता खाण्याचे पाकीट व पाण्याची बाटली पोचवली. बांध फुटल्याने नदीचे पाणी गावात शिरले होते. "आता बांधाची दुरुस्ती झालीये. आता फक्त पाणी ओसरायला हवे. ते झाले की, सगळ्यांची शोधाशोध घेऊ. काळजी करू नका." असे तिला सांगण्यात आले.

आता पाऊस पूर्ण थांबला होता. पाणीही ओसरले होते आणि गावाची झालेली नासधूस नजरेत येत होती. पशू-पक्षी, झाडे-झुडपे, गुरे-ढोरे व काही माणसे सुध्दा चिखलात मरणावस्थेत रुतलेली होती. हे भयांनक दृष्य मनाला विचलीत करणारे होते. सरलाला रडू आवरेनासे झाले. तिने कौलांवरून खाली घरात पाहिले. घरातले पाणी ही कमी झाले होते. तिने खाली हात घालून शिडी हाताला लागते का बघितले. दैव योगाने शिडीचे टोक तिच्या हाताला लागले. तिने चाचपडून शिडी घट्ट आहे ना हे पाहून घेतले व हळू हळू शिडीवरून ती खाली घरात उतरली. देवघरातल्या देवाला नमस्कार करून ती घरातले पाणी आणि गाळ बाहेर टाकू लागली. सासू सासऱ्यांची काही चांगली खबर मिळावी म्हणून देवाचा धावा करत ती घराच्या साफ सफाईला लागली. मदत करणारी माणसे ही तिला मदत करू लागली. तो पर्यंत तिचा नवरा ही तालुक्याहून सुखरूप घरी आला. आईबाबा शेतावर होते हे कळताच त्याच्या छातीत धस्स झाले. कारण पाण्याचा फटका नदीच्या जवळपास असणाऱ्या शेतांना जबरदस्त बसला होता. त्यांची आशा ठेवणे निरर्थक होते. तरी उसन्या आशेने त्याने शेताकडे धाव घेतली. त्याच्या मागोमाग सरला ही चिखला पाण्यातून शेताकडे धावली. तिथे जाऊन बघतो तर काय! सारे शेत पाण्याखाली गेले होते. शेतातल्या त्यांच्या खोपटाचा व आई बाबांचा ही कुठे मागमूस नव्हता. खोपूट होते तिथे झाडा झुडपात, पाण्यात हात घालून दोघं नवरा बायको आईबाबांचा शोध घेऊ लागली. शोधताना अश्रूच्या धारा घळाघळा वाहत होत्या. दुःख अनावर झाले होते. दोघंही मनात समजून चुकली होती. तरी पिसाटल्या सारखी त्यांची शोधाशोध चालली होती.

शेवटी कोलमंडलेल्या आंब्याच्या झाडाखाली हाताची पकड घट्ट धरलेल्या स्थितीत दोघे मायबाप त्यांना सापडले. सरला आणि तिचा नवरा धाय मोकळून रडू लागले. आजूबाजूला आपल्या माणसांची शोध घेणारी माणसे ही त्यांच्या जवळ आली. त्यांनी त्यांना सावरले. 

ही एकमेव घटना नव्हती, तर गावची बरीच माणसे बेपत्ता झाली होती व त्यांची शोधाशोध चालली होती. पोलीस, जवान आणि गावकरीही मदतीला धाऊन आले होते. सरकारने ही सगळं सुरळीत होईपर्यंत सर्वांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था केली होती. गावचे लोक ही आपल्या घरा-दाराची साफसफाई व डागडुजी करत होते. सरला व तिच्या नवऱ्याने ही आईबाबांचे विधी करून पुन्हा त्यांच्या संसाराची घडी सावरायला सुरुवात केली.

गावात असा अचानक पूर आल्याने गावच्या लोकांची वाताहत झाली होती. घर-दार, शेती-वाडी सगळे दैवाने नेले होते. प्रत्येकाला शुन्यातून संसार उभा करायचा होता. पण गावचे लोक धैर्यवान आणि अतिशय कष्टाळू होते. पुरामुळे होत्याचे नव्हते झाले होते पण त्यांनी हार मानली नाही. आलेल्या संकटांना तोंड द्यायला ते तयार झाले व पुन्हा नेटाने कामाला लागले. सगळे सावरण्यास वेळ लागला, पण दोन एक महिन्यांनी सारे पूर्ववत सुरू झाले होते.

सरला आणि तिचा नवरा रामू सुध्दा त्या आघातातून सावरले होते. त्याच्या शेताचा लहानसाच तुकडा होता. रामूची तालुक्याला गिरणीतली नोकरी होती. आई बाबा असताना ते शेतातले काम पहायचे व सरला घर व अधून मधून शेतातली कामे करत होती. आता आईबाबा नसल्याने शेत कोण बघणार? सरलाला एकटीला ते सगळे हातळणे कठीण होते. म्हणून त्याने ते सावकाराला विकून टाकले व त्याचे पैसै बेंकेत फिक्स डिपोजीट मध्ये ठेवले. रामू आता तालुक्याला रोज ये जा करत होता. तो सकाळी सायकल घेऊन जायचा व रात्री उशीरा परतायचा. सरलाच्या शेजारणी तिच्याकडे येऊन गप्पा मारायच्या. गप्पा गप्पात विषय निघाला की सरला दिवसभर वेळ कसा घालवते. पोर ना बाळ, दिवस कसा सरणार? तिची एक खास मैत्रिण होती राघिका, तिने तिला सल्ला दिला. "पलिकडच्या गावात बायकांना शेतीची कामे करायला बोलावतात. बऱ्याच जणी जातात. मी सुध्दा जाते." तिने सरलाला गळ घातली "एकटीच घरी झुरत राहण्या परीस आमच्या संग चल. वेळ बी जाईल नी पैका बी मिळंल"

"यांच्याशी बोलून काय ते सांगते." असे तिने राघिकाला सांगितले. पण मनातून तिला ते आवडले नव्हते. मनात ती विचार करू लागली, 'वेळ घालवायचा तर मी माझं राहिलेले शिक्षण का पूरं करू नये?' अशा विचारात ती दिवसभर व्यस्त होती. रात्री नवरा आल्यावर, जेवण खाण झाल्यावर तिने राघिकाचा विषय मांडला. तेव्हा रामू म्हणाला, "हो, तुला आवडत असेल तर जा की आणि तुझा वेळ ही छान जाईल. एकटी असली की नको नको ते विचार करत बसणार. त्यापेक्षा बायकांबरोबर गेलेली बरी."

"आणखी एक बोलायचे होते"

"काय ते बोल लवकर"

"माझ्यासाठी थोडी पुस्तके आणाल का?"

"कसली पुस्तके? आणि काय करणार तू त्या पुस्तकांचे?"

"माझं चौथी पर्यंत शिक्षण झालंय. मला वरच्या वर्गाची मराठी आणि गणिताची पुस्तकं दिली तर त्यात थोडा वेळ घालविन म्हणते."

"अगं मग आणीन की. तुला शिकायचे असेल तर शाळेत बी घालीन"

"हे हो काय? माझी मस्करी करता काय?"

"नाही गं, जर तुझी शिकायची इच्छा असेल तर तुला मी नक्की शिकविन"

नवऱ्याच्या ह्या उत्तराने ती खूप आनंदीत झाली. नंतर बऱ्याच गप्पा मारून ती झोपी गेली.

आता सरलाचा नवा दिनक्रम सुरू झाला. नवरा कामावर गेला की तिही आपला डबा घेऊन राधिका व बाकीच्या बायांबरोबर पलिकडच्या गावच्या शेतावर काम करायला जायची. तिथे जाण्याकरता त्यांना होडीने नदी पार करायला लागायची. होडीची जाण्या येण्याची वेळ ठरलेली असायची. सकाळी नऊ वाजता या गावातून जायची व संध्याकाळी सहा वाजता परत यायची. नदी कडचा परिसर अतिशय सुंदर होता. सर्वांनाच आवडावे असे सृष्टीचे मनोहर दृष्य होते आणि घरी परतण्याच्या वेळी बांधावरून चालताना सरलाचे ते दृष्य पाहताना भान हरपायचे. कधी कधी त्या दृष्यावर ती आपल्या तुटक्या मोडक्या शब्दांनी काव्य रचायची व गुणगुणायची सुध्दा.

सरलाला शिकायची आवड आहे हे पाहून रामूला आनंद झाला. त्यांने लगेच दुसऱ्या दिवशी मराठी व गणिताची पाचवी व सहावीची पुस्तके, पाटी, पेन, वह्या वगैरे सरलासाठी आणले होते.

"घे सरला, हवा तेवढा अभ्यास कर. तुला जमतील तशी सगळी गणिते तू वहीत सोडव. मग मी रात्री बघेन. तुला काही अडचण येत असेल तर मला सांग, मी समजावीन तुला." आपल्या नवऱ्याने एवढा आधार दिल्यावर सरलाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिच्या अंगात उत्साह संचारला. रात्री जागून तिने 'मराठी वाचन पाठ' यातले चार पाच धडे वाचून काढले.

दुसऱ्या दिवशी सगळं काम आटोपून ती राधिका बरोबर शेतात गेली. जेवायच्या वेळेला तिने आपल्या नवऱ्याने पुस्तके आणल्याची गोष्ट राधिकाला सांगितली. राधिका ते ऐकून चकीत झाली.

"मंजे, तुला वाचता लिवता येतं? मग तू शेतात मजुरीचे काम कशापाई करते? ऑपीसमधे जा की तुझ्या धन्यावानी"

"अगं तसं नाही. ऑफिसमध्ये काम करायला खूप शिकावं लागतं. मला कुठे तेवढं येतं. मला कंटाळा येतो म्हणून पुस्तके वाचायला आणली एव्हढच."

"शिक बाय, आणि मला बी लिवायला वाचायला शिकव."

"हो गं. उद्या आपल्याला शेतावर यायचं नाही ना, तर तू ये माझ्याकडे. मी वाचीन आणि तुला सांगेन."

असेच दिवस जात होते. सरलाचा सर्व कामांबरोबर अभ्यास ही जोरात चालला होता. तिचा नवराही रात्री तिचा अभ्यास घ्यायचा. रात्री झोपते वेळी रामू तिला मराठी वाचन पाठातले धडे जोराने वाचायला सांगायचा आणि सरलाही आज्ञाधारक विद्यार्थिनी सारखी ते वाचायची. मध्ये काही चुकत असेल तर तो तिला सुधारायचा.

एक दोन महिन्यात दोन्ही पुस्तकांचा अभ्यास झाला. तेव्हा रामू स्वतःहून सातवीच्या वर्गाची गणित, मराठी व इंग्रजीची पुस्तके घेऊन आला आणि सरलाला सांगितले,

"हे बघ सरला, सातवीचा अभ्यास अवघड असतो. सातवीच्या मुलांची एक वेगळी परीक्षा असते. त्याला 'व्हर्नाक्युलर फायनल' परीक्षा म्हणतात. ती परीक्षा तालुक्याला जाऊन द्यायची असते. मी तुझा रोज एक तास अभ्यास घेईन. तुला खूप अभ्यास करावा लागेल. तुला वेळ हवा त्यासाठी. मग आता तू शेतावर जाण्याचे सोडून दे आणि सगळा वेळ अभ्यासाला दे. तू खूप हुशार आहेस. तुला सहज शक्य होईल. तुला इंग्रजी शिकवायला मी माझ्याच शाळेतल्या बाईंना विनंती करेन. तू फक्त आता शिकायचे व तुझे स्वप्न पूर्ण करायचे."

नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे सरला अभ्यास करू लागली. मराठी, गणित व इंग्रजीचा अभ्यास उत्तम होत होता. बाकीच्या विषयांची ही पुस्तके आणली व त्यांचा ही सरला अभ्यास करू लागली. 

रामूच्या मनात एक विचार आला. आपण तालुक्यालाच एक भाड्याचे घर घेतले तर! सरलाला परिक्षेच्या वेळी ये जा करायला नको आणि माझी ही सायकल रपेट वाचेल. सगळा मागचा पुढचा विचार करून त्याने सरलाला आपल्या विचाराबद्दल सांगितले. तिला ही ते पटले. मग परीक्षे अगोदर एक महिना तालुक्याला भाड्याच्या घरात जाऊन रहायचे असे ठरले. सरला ही अभ्यासाबरोबर नवीन बिऱ्हाड थाटण्याची तयारी करू लागली आणि हे सगळे करण्यास तिची मैत्रीण राधिका ही तिला मदद करू लागली. 

परिक्षेला बसायची, फॉर्म वगैरे भरायची सगळी जय्यत तयारी झाली. परिक्षेच्या काळात सरलाला थोडी मदत व्हावी म्हणून राधिका दोन-चार दिवस तिच्याकडे येऊन राहिली. सरलची परिक्षा उत्तम रितीने पार पडली. काही दिवसांनी निकाल ही लागला आणि त्यात सरलाने भरघोस यश प्राप्त केले. वर्तमान पत्रात तिचा फोटोही छापून आला. लग्नानंतर संसाराची जबाबदारी पेलून आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण केले, स्व बळावर यश मिळवले या सगळ्यासाठी तिचे खूप कौतुक झाले. रामू, राधिका, तिच्या इंग्रजी शिक्षिका आणि अख्या गावाला आनंद झाला. सरलाचा आत्मविश्वास वाढला.

तिने लगेच रामूच्या मदतीने डी.एड करायचे ठरवले. वर्षभरात त्यात ही ती पहिल्या क्रमांकाने पास झाली व ज्या शाळेतून तिने सातवीची परीक्षा दिली होती त्याच शाळेत तिला प्राथमिक शिक्षिकेची नोकरी लागली. रामू व सरलाला स्वर्ग दोन बोटांवर भासला. रामूला आपल्या बायकोचा अभिमान वाटला आणि त्याने तिला एक छान साडी व गजरा देऊन तो व्यक्त ही केला.

सरला हुशार होतीच, तशीच ती चांगली शिक्षिका ही झाली. तिचे मुलांमध्ये समरस होऊन शिकवणे मुलांना व पालकांना खूप आवडू लागले. फावल्या वेळेत ती लेख-कविता लिहू लागली व आपल्या शाळेतल्या सहकाऱ्यांना वाचून दाखवू लागली. त्यांच्या कडून वाह वाह मिळाल्यावर ती आपले लेखनकार्य जास्त जोमाने करू लागली. तिच्याच शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिचे लेखन वर्तमान पत्रांच्या संपादकांना पाठवले व त्यामुळे तिच्या लेखनाला प्रसिद्धी लाभली व ती शिक्षिकेसोबतच एक लेखिका व कवयित्री म्हणून ही ओळखली जाऊ लागली.

राधिकाने मागे एकदा "मला बी लिवायला वाचायला शिकव" म्हटलेले तिला आठवले आणि त्या करता सुट्टीच्या दिवशी ती आपल्या गावच्या घरी येऊन तिच्या शेतमजूर मैत्रिणींना शिकवू लागली. ते पाहून हळू हळू गावच्या प्रौढ आयाबायांची ही शिकायची इच्छा झाली. मग सरलाचा शिकवणीचा वर्ग गावदेवीच्या मंदिराच्या मंडपात होऊ लागला. सरलाने स्वतः बरोबरच गावाचे ही भले केले आणि हे सगळे शक्य झाले फक्त तिच्या नवऱ्याच्या प्रोत्साहनामुळे आणि पाठबळामुळे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हणतात, पण इथे सरलाच्या यशामागे तिचा पती रामू होता.

# समाप्त#


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy