स्वावलंबी भाग तीन
स्वावलंबी भाग तीन
*स्वावलंबी*
(भाग तीन)
घरी येऊन गणप्याने शाळेतली गोष्ट रखमाला सांगितली. तिला ही खूप बरे वाटले. त्याच संध्याकाळी गणप्या, रखमा व मुले मिळून तिथल्या वस्तीत जाऊन शेवंता व दत्तू शाळेत जातात, तिथे जेवण मिळतं, मुलींना महिन्याला पैसे मिळतात हे सांगायला लागली.
"तुम्ही भी तुमच्या पोरांसनी शाळेत घाला. त्यांना शिकशन मिळेल व पैका भी. नंतर शाळेचा शिपाई येईल पोरांची नावं घ्यायला. मग येतो परत उद्याला." असे गणप्याचे कुटुंब प्रत्येक घरात जिथं शिक्षण्या लायक मुलं होती तिथे जाऊन शिक्षणाचा प्रचार करून बऱ्याच उशीरा घरी परतली.
रोजच्या सारखी शेतातली व बाहेरची कामे करून रखमा व गणप्या वस्तीतल्या बाकीच्या घरात जाऊन शाळेतल्या मोठ्या साहेबानी सांगितलेली गोष्ट सांगून मुलांना शिकायला तयार करा असे घरा घरांत जाऊन सांगत होती. दत्तू व शेवंता मात्र घरी त्यांचा अभ्यास व घरातली कामे करत होती. कधी कधी दत्तू रात्रीचा भात सुद्धा चढवायचा. ते बघून रखमाला दत्तूचे खूप कौतुक वाटायचे. गरिबाच्या घरात एकमेकाला मदत करणे शिकवावे लागत नाही. समजूतदार मुलं ते आपसुकच करायला लगतात. ह्यालाच संस्कार म्हणावे असे वाटते.
संपूर्ण आठवडाभर रखमा व गणप्या पोरं गोळा करायच्या कामाला लागली. एक दिवस जाऊन माहिती द्यायची व दुसऱ्या दिवशी किती जण तयार आहोत हे जाणून घ्यायचे. रखमा प्रत्येक घराच्या मुलांचा हिशेब कागदाच्या चिटोऱ्यावर लिहून ठेवायची. असे दोघं नवरा बायको आस्तेने करत होती. तसेच तिथे लोकांचा ही चांगला प्रतिसाद मिळत होता.
आठवड्याच्या शेवटी मुख्याध्यापकांनी सांगितल्या प्रमाणे शाळेचा शिपाई शेवंता व दत्तू बरोबर शनिवारी संध्याकाळी वस्तीवर आला. त्यांच्या बरोबर एक शिक्षिकाही होत्या.
रखमा व गणप्याने त्यांचे खूप छान स्वागत केले. रखमाने चहा बिस्कीट त्यांच्या समोर ठेऊन त्यांना आग्रहाने खायला व प्यायला लावले. बाईना रखमाचे आदरातिथ्य खूप आवडले. गरिबा घरी असे कोणी आले की ते देवासमान त्यांचा मान सन्मान करतात. "अतिथी देवो भव:"चा प्रत्यय बाईंना रखमाच्या घरी आला.
"चला, आता घरा घरात जाऊन नोंद घेऊया ना मॅडम."असे शिपाई त्यांच्या बरोबर आलेल्या बाईना म्हणाला.
"साब मी आकडा घेतलाय. प्रत्येक घराच्या बाहेर दरवाज्यावर लिहिलेला नंबर व तिथे शिकायला येणारी संख्या मी लिहून घेतलीय या कागदावर. आता एकदा जाऊन पुन्हा तपासणी करा." असे म्हणून रखमाने आपल्याकडचा कागद बाईच्या हाती सोपवला. बाई जरा चकीतच झाल्या.
"ही यादी कुणी तयार केली?" असं त्यांनी गणप्याला विचारले.
"माझ्या कारभारनीने."
"शिकलेल्या आहेत त्या?"
"फार नाही बाईसाहेब, फक्त दोन बुकं शिकली म्या."
"अरे वाह! पण ताई तुम्ही व्यवस्थीत, नीट सगळी नोंद केलीय. माझं काम तुम्हीच तर केलयं!" असं बाई बोलल्यावर गणप्या म्हणाला, "त्यासनी थोडं कळतं नव्ह."
"वाह, ताई आता मुलांबरोबर तुम्हीही शिका. छान होईल मग." असं बाईनी म्हटल्यावर रखमा त्यांच्या पाया पडायला वाकली. तेव्हा बाईंनी रखमाचा हात पकडून अभिनंदन केले.
नंतर रखमा, बाई व शिपाई यांनी मिळून सगळ्यांच्या घरी जाऊन नक्की शिकायला येणाऱ्या मुलांची नावे घेतली. ती जवळ जवळ वीस पंचवीस होती. बाई खुश झाल्या.
"रखमा तुझ्या कामाची शिफारस मी नक्की सरांशी करीन. तुझ्यामुळे आमचे काम खूप सोपे झाले."असे म्हणून बाई व शिपाई आप आपल्या घरी गेले व रखमा ही स्वतःच्या घरी आली.
चार पाच दिवसांनी मुख्याध्यापकांनी दत्तूकडे रखमासाठी निरोप पाठवला.
"आये, आमच्या मोठ्या सरांनी तुला शाळेत बोलावलंय."
"मला कशा पायी?"
"मला काय माहीत?"
"कधी बोलावलं?"
"दुपारच्या वेळेस."
"बरं, येईन मी."
रखमाने शाळेत बोलावल्याची खबर गणप्याला सांगितली. तेव्हा गणप्या तिला म्हणाला, "अगं, त्या राधाला नि त्या दिसा तिच्या संगती बोलत होत्या त्या बायकासनी भी तुझ्या सोबत घेऊन जा.
त्या बोलत होत्या न्हवं, पोरं शाळेत गेली तर आमी शेतावर कसं जायचं? बारक्या पोरांना घरी कोण बघणार? श्रीमंतावाणी आपली पोरं नाहीत, त्यांना शेतात, घरात काम कराया हवं. शिकाया गेलं तर काम कोन करणार? तिथल्या मोठ्या साहेबास कळू दे हेंची दिख्खत. मग साहेब त्यावर काही तरी तोडगा काढतील."
"हां, बरोबर हाय. त्यासनी भी घेऊन जाते."
बोलणाऱ्या बऱ्याच बायका होत्या पण रखमाने शाळेत या साहेबांना सांगुया असे म्हटले तेव्हा कुणी यायला तयार होईना. पण रखमाने जबरदस्ती केल्यावर दोन बायका यायला तयार झाल्या.
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी रखमा त्या दोन बायकांना घेऊन दुपारी शाळेत गेली. त्यांना शिपायाने बाहेर बसायला सांगितले. मुख्याध्यापकाच्या खोलीत तालुक्यातले अधिकारी आले होते. त्यांच्या बऱ्याच वेळेपासून गप्पा चालल्या होत्या. शिपायाने ह्या बायका आल्याची वर्दी दिल्या नंतर पुढच्या दहा मिनिटांनी सर्वांना आत बोलावले. सगळीच घाबरली होती, फक्त रखमा मात्र शांत होती.
मुख्याध्यापकांनी तालुक्यातल्या साहेबांना रखमाचा परिचय करून दिला. त्या साहेबांनी सर्वांना निरखून पाहिले व त्यांनी रखमाला विचारले, "तुमच्या मुलांनी शिकावं असं तुम्हाला खरंच वाटतं का?"
"माझी दोन्ही मुलं ह्याच शाळेत शिकत आहेत साहेब. ह्या मोठ्या साहेबांनी कृपा केली आमच्यावर."
"आणि तुमची मुलं काय करतात हो?" साहेबांनी बाकीच्या बायकांना विचारलं.
"आमची पोरं आमच्या संगती शेतात कामं करत्यात. आमच्या धाकट्या पोरांस भी साभांळतात. तेव्हाच आमी शेतावर नदीवर जातो नव्हं?"
"तुमच्या मुलांनी शिकावं असं वाटत नाही तुम्हाला?"
"वाटतं साहेब, पण आमच्याकडे पैका नाय. आनी शेतात त्या त्या वकताला कामं असतात, ती केली नाय तर खानार काय? आमची पोरं लई मदत करतात आमच्या कामामधी.
"वस्तीवर किती मुलं आहेत."
"वीसा वरंच आहेत साहेब." रखमा बोलली व तिच्या म्हणण्याला मुख्याध्यापकांनी दुजोरा दिला.
"तुमची वस्ती किती दूर आहे?"
"म्हंजे बगा साहेब, दीड तासा परीस जास्त वखत लागतो तिथून इथं शाळेत यायला."
"म्हणजे मुलांना जास्त वेळ लागेल!"
त्या साहेबांनी रखमा व बाकीच्या बायकांना बाहेर जायला सांगितले आणि नंतर ते बराच वेळ मुख्याध्यापकांशी बोलत होते.
अधिकाऱ्याने मग शेतकऱ्यांच्या वस्तीतला प्रस्ताव त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांशी बोलून एक ठराव पास करून घेतला.
वस्तीतली मुले एवढ्या दूरच्या शाळेत येणे कठीणच होते. तसेच तिथल्या मुलांना अक्षर ओळखही नसल्याने दत्तूच्या वयाच्या मुलांना वरच्या वर्गात बसवणे हे सुद्धा बरोबर झाले नसते. म्हणून त्या वस्तीतच शाळा उघडायची व सगळ्या वयाच्या मुलांना एकत्र बसवून शिकवायचेअसे ठरवले. त्याकरता शाळा बांधणे काही लगेच होणार नव्हते. म्हणून वस्तीतल्या लक्ष्मीदेवीच्या देवळाचा मंडप तिकडच्या पंचांकडून मिळवायचे काम त्यांनी रखमा व गणप्यावर सोपवले. पंचांनी ही त्यांना परवानगी दिली.
*क्रमशः*
*शोभा वागळे*
मुंबई.
