कॉफी डेट
कॉफी डेट
*कॉफी डेट*
^^^^^^^^^^^^^^
आजही ते दिवस आठवले की मन हळवं होतं. किती साधी माणसे होतो आपण! आपल्या गरजा ही तितक्याच मोजक्या आणि अगदी मामुली. पण आमच्या सारख्या साध्या माणसांचे ध्येय मात्र फार मोठं होते.
मुंबई विद्यापीठाच्या एका नामवंत कॉलेज "पार्ले कॉलेज" मध्ये प्रवेश मिळणे ही अतिशय वाखाणण्याची गोष्ट! सुदैवाने एस.एस.सी ला उत्तम गुण प्राप्त झाल्यामुळे प्रवेश मिळाला होता. तेवढीच एक जमेची आमची बाजू होती.
मी स्वप्ना,आणि तो स्वप्नील. मी गावाहून आलेली खेडवळ बुजरी मुलगी आणि स्वप्नील मुंबईचाच पण गरीब कुटुंबातला. माझी नी स्वप्नील ची ओळख ही लायब्ररीत, ती ही कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी झाली.
माझा कॉलेज फर्स्ट ईयर ला तर सगळा गोंधळच गोंधळ व्हायचा पण अभ्यासात हुशार असल्याने भाव खाऊन गेले. इंटरचे वर्ष हे अतिशय महत्त्वाचे, त्यातून कला शाखा! काही विचारायची सोय नाही. पण अभ्यासूवृत्ती मुळे लायब्ररी खूप जवळची होती.
सहसा लेक्चर फ्री असले की बरीच मुले कॉलेज कॅन्टीन मध्ये असतात. पण आमच्या सारखे पुस्तकी किडे फ्री लेक्चरमध्ये हमखास लायब्ररीत आढळत आणि त्यामुळेच अभ्यासू मुला-मुलींशी माझ्या ओळखी खूप झाल्या होत्या.
माझा इंटर आर्ट्सचा अभ्यास होता तेव्हा स्वप्नील बी. ए. फायनलला होता, त्यामुळे लायब्ररीत जास्त वेळ अभ्यास करत होतो.
कधी कधी रात्री नऊ पर्यंत म्हणजे लायब्ररी बंद होई पर्यंत थांबत होते, कारण महत्त्वाचे एकच रेफरन्स बुक असले की लायब्रेरियन ते रात्री घरी न्यायला देत असत आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी लायब्ररी उघडते तेव्हा परत द्यायचे असे. तेव्हा कॉलेज ते स्टेशन स्वप्नील ची सोबत असायची. अशा रितीने लायब्ररीतल्या अभ्यासाने आमची मैत्री वाढली होती.
माझी एक मैत्रीण होती. ती श्रीमंत होती. कधी कधी लायब्ररीत यायची व थोड्या वेळाने "चल कॅन्टीन में जाकर कॉफी पिकर आयेंगे " असे म्हणून मला घेऊन जायची. तिथे वेज कटलेट व फक्कड कॉफी पिऊन आल्यावर पुन्हा जोमाने अभ्यास व्हायचा. कॅन्टीनची कॉफी खरंच खूपच छान पण महागडी असायची. कधी तरी ठीक, पण रोज रोज परवडण्यासारखी नव्हती. पॉकेट मनी असायचे, पण खर्च करायला मन मानत नव्हते. मैत्रिण देते म्हणून रोज फुकट घेणेही मनाला पटत नव्हते. आपण ही कधी तरी द्यायला लागायचे.
पार्लेच्या नेहरू रोडवर एक भले मोठे 'कॉफी हाऊस' होते. जाता येता ते मला सारखे नजरेत भरत होते. तिथे हॉट व कोल्ड कॉफी मिळत असे पण अतिशय महागडी. काचेच्या तावदानातून आतले दृष्य दिसायचे पण चार वर्षांत कधी त्यात शिरलो नाही. स्वप्नील म्हणायचा, "एकदा कोल्ड कॉफी प्यायला जायला पाहिजे. आपण जाऊया हं."
"हो, नक्की जाऊया रिझल्ट लागल्यावर."
"स्वप्ना, तुला फर्स्ट क्लास मिळाला तर मी तुला कॉफी हाऊसमध्ये पार्टी देईन."
"आणि तुझा फर्स्ट आला तर मी देईन."
"आणि आपल्या दोघांना मिळाला तर आपण एकमेकांना देऊ."
वरील वाक्य आम्ही दोघांनी एकत्र म्हटले आणि खो खो हसत सुटलो होतो.
परीक्षेच्या काळजीने अभ्यासात एवढे मग्न होतो की, 'कॉफी हाऊस', एकमेकांना भेटणे जमलेच नाही. त्याकाळी आता सारखे मोबाईल फोन ही नव्हते. लॅन्डलाईन फोन सुद्धा कमीच होते. पण पत्र व्यवहार चालायचे. पण, अभ्यासामुळे तेवढाही आम्हाला वेळ नव्हता. त्या काळी कॉलेज रिझल्ट 'टाइम्स ऑफ इंडिया' व बाकीच्या वृत्तपत्रात जाहीर व्हायचा. सीट नंबर माहीत असेल त्यालाच रिझल्ट कळत असे. सहसा आम्ही कुणाला सीट नंबर देत नव्हतो. सकाळी पेपर आला रे आला की भरभर पाने चाळून निकाल आला का बघत होतो. नंबर दिसला की किती हायसे व्हायचे! त्यात फर्स्ट, सेकेंण्ड क्लास मिळाल्यावर तर हात गगनाला लागायचे. मग घरातल्या सगळ्यांना निकाल सांगत होतो. खरंच किती छान होते ते दिवस! इंटरचा निकाल खूप कठीण लागत होता. त्यात पास होणाऱ्यास आकाश ठेंगणे वाटायचे. सुटृटीत टायपिंग शॉर्ट -हॅण्डचे क्लास ही करत होतो. 'अर्न अॅन्ड लर्न ' ह्या करता ते खूप फायद्याचे होते.
माझे व स्वप्नील ची नंतर काही भेट झालीच नाही. आम्हाला एकमेकांचा निकाल ही कळला नाही आणि मी पुन्हा माझ्या बी. ए. च्या अभ्यासाला लागले. मनातून लायब्ररीत आठवण व्हायची पण फोन नंबर नव्हता म्हणून विचारपूस करायचीही सोय नव्हती. मी बी.ए. बी.एड केले व चांगल्या शाळेत शिक्षिकेची नोकरी ही करू लागले.
माझे आईबाबा माझ्याकरता स्थळे पाहत होते. पत्रिका फोटो पाठवायचे. पत्रिका जुळली की पाहण्याचा कार्यक्रम. एके दिवशी आईने सांगितले, "उद्या रविवार आहे, आम्हाला एके ठिकाणी तुला दाखवायला घेऊन जायचे आहे". त्याकाळी परिस्थिती ही तशीच असायची. आई बाबा सांगतात ते ऐकायचे.
आई, बाबा, भाऊ, वहिनी मिळून आम्ही टॅक्सीतून दादरला गेलो.
आम्ही कुणाकडे जात आहोत? मुलगा काय करतो? काहीच कल्पना नव्हती. आई वडिलांवर मात्र विश्वास होता. आई बाबा आपले बरेच करतील ह्याची खात्री होती.
आमची टॅक्सी पोर्तुगीज चर्च समोर थांबली. 'विश्रांती' इमारत कोठे विचारल्या बरोबर "अहो डावीकडे दिसते तीच आहे." असे सांगितल्यावर टॅक्सी डावीकडे वळून 'विश्रांती' समोर थांबली. पहिल्या माळ्यावरून एका वयस्कर माणसाने हात दाखवून वरती कसे यायचे ते सांगितले.
माझ्या छातीची धडधड वाढत होती. पेपरात निकाल बघताना धडधड व्हायची तशीच. सगळे आत गेले. शेवटी मी व माझी वहिनी घरात शिरलो.
बाहेरचा दिवाणखाना छानच होता. घरातले सगळे दिवाणखान्यात जमले होते. सगळ्यांची तीक्ष्ण नजर माझ्यावर खिळली होती. मी ही सर्वांना नमस्कार करत नवरा मुलगा शोधत होते. सगळी वयस्कर व लहान मुले, नवरा मुलगा कुठे दिसत नव्हता. एवढ्यात ते वयस्कर म्हणाले, "आमच्या स्वप्नीलला बाहेर जावं लागलं, येईल इतक्यातच."
स्वप्नील, नाव ऐकून मी जरा दचकलेच होते. माझा लायब्ररी फ्रेंड मला आठवला. तरी मनास समजावले, हा कोण स्वप्नील बघुया!
मोठ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. आमच्या समोर सरबताचे ग्लास व वेगवेगळे खाद्यपदार्थ ठेवले होते.
तेवढ्यात एक मुलगी माझ्या जवळ आली. "आमचं घर नाही बघणार तुम्ही?" असे म्हणून माझा हात तिने धरला. मला उठावच लागलं. मनात म्हटले, मुलाचा पत्ता नाही, घर बघून काय करू?
तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजला. त्याबरोबर ती मुलगी दादा आला, दादा आला" म्हणून बाल्कनीतून खाली बघू लागली. तेव्हा मी ही माझी नजर खाली टाकली. मला तो लायब्ररीतला स्वप्नील वाटला, तरी म्हटले एक सारखा विचार करते म्हणून वाटत असेल. वरती येईल तेव्हा बघू कोण ते? असे मनात विचार करून वळले मात्र की माझ्या समोर तोच स्वप्नील बघून मी जोरात ओरडले "अरे! तूच का?"
स्वप्नील ही बोलला, "किती छान योगायोग आहे स्वप्ना, चल आत" असे म्हणून तो माझा हात धरून मला आत घेऊन गेला. तिथे स्वप्नील ने आमची जुनी ओळख सर्वांना सांगितली. आम्हा दोघांच्या घरच्यांना खूप आनंद झाला.
स्वप्नील एका मोठ्या कंपनीत बॉसच्या हुद्द्यावर होता. " सगळे
तुम्ही ठरवा, तुम्हाला काय हवे ते. मी आणि स्वप्ना मात्र आज कॉफी डेटला जाणार" असे सांगून मला दादर जवळच्या कॉफी हाऊस मध्ये घेऊन गेला.
कॉफीचे वेगवेगळे प्रकार! ती प्यायची एक विशिष्ट पद्धत! एक ग्लास कॉफी आणि तासन् तास तिथे बसून गप्पा मारणारे लोक. शांत मधूर संगीत, मंद प्रकाश, कुजबुजत सोफ्टली बोलणारे कस्टमर्स. पार्ल्याचे कॉफी हाऊस जे मी काचेच्या तावदानातून पाहत होते ते प्रत्यक्षात तशा कॉफी हाऊसमध्ये बसून आम्ही दोघे कोल्ड कॉफीचा स्वाद घेत गप्पा मारत बसलो. नंतर मला स्वप्नीलनेच घरी सोडले.
लगेच पुढच्या महिन्यात लग्नाचा मुहूर्त काढला. एकमेकांच्या समजुतीने थोडक्यात पारंपारिक पद्धतीने लग्नसोहळा संपन्न झाला. दोन्ही कुटूंबांनी एकमेकांना समजून छान समारंभ पार पाडला.
आज आमच्या लग्नाला चाळीस वर्षे झाली. आमची दोन्ही मुले अमेरिकेत स्थायिक आहेत. आम्ही सुद्धा अधून मधून अमेरिकेला जातच असतो. तसच मुले ही सुट्टीत येत असतात.
आमचा दर महिन्यात एक कार्यक्रम मात्र नक्की असतो, तो म्हणजे कॉफी हाऊस मधे जाऊन कॉफी डेट सेलिब्रेट करणे!
#₹##################₹#
शोभा वागळे
मुंबई.
8850466717

