Shobha Wagle

Tragedy Classics Inspirational

3  

Shobha Wagle

Tragedy Classics Inspirational

विश्वास

विश्वास

8 mins
193


सकाळपासून घरात गडबड गोंधळ चालला होता आणि त्याला कारण ही खासच होते. आज शरयूला बघायला मुलगा येणार होता. राधाबाई व गणपतला तीन मुले. दोन मुलां नंतर झालेली मुलगी शरयू सर्वांची लाडकी ताईत बनली होती. तिनही भावंडात ती जास्त शिकून सवरून डॉक्टरी पास झाली.

तिचे दोन्ही भाऊ, रमेश व सुरेश वडिलांच्या 'स्पेयर पार्टच्या' कंपनीत वडिलां बरोबर व्यवहार बघत होते. कुटुंब तसे समृद्ध होते. मुलांपेक्षा मुलगी हुशार व तिला शिक्षणाची आवड म्हणून खूप शिकवले. मुलगी शरयू ही नाकी डोळी नीटस व रंग रुपाने ही छान होती. अभ्यासू वृत्तीमूळे शिक्षण एके शिक्षण असा ध्यास घेतला. आपण बरं आपलं काम भलं अशी तिची वृत्ती होती. तिच्या करता स्थळं चालून येत होती. पण वडीलांना, गणपतला, ती आवडत नव्हती. प्रत्येक बापाल आपल्या पेक्षा जास्त श्रीमंत असलेल्या घरात मुलगी द्यावी असे वाटणे सहाजीकच होते. म्हणच आहे ना 'लेक द्यावी श्रीमंताकडे व सून आणावी गरिबा घरची".

आणि त्याच्या मतानुसार आजचं स्थळ पाहिलं तर सुसंपन्न होतं. फोटो एकमेकांना पसंत होते आता प्रत्यक्ष भेटीत काय ते ठरणार होते.

शरयूला तयार करायला तिच्या दोन मेत्रिणीही आल्या होत्या. त्या दोघीही तिच्या सारख्याच डॉक्टर होत्या. मीना आणि नीता. मीनाने स्वतः लग्न जमवले होते व तिचे लग्न पुढच्या सीजनमध्ये होणार होते. नीताचे घरचे मात्र तिच्यासाठी स्थळ बघत होते. ती स्वभावाने साधी आणि साधारण कुटुंबातील होती. पण मुलीचे लग्न म्हणजे बापाच्या जीवाला घोरच असायचा.

शरयूच्या मैत्रिणी तिची केशरचना मेकअप वगैरे करत होत्या. तिच्या मनात मात्र वेगळेच विचार चालले होते.

"आज मी शिकून डॉक्टर झालेयं. पण, माझ्यात व माझ्या आईत काय फरक आहे. आई जास्त शिकली नव्हती. तिचे ही माझ्या सारखे कांदे पोहे करूनच बाबांशी लग्न ठरवले. माझ्या दोन्ही आजी सुध्दा ह्याच प्रकारे बोहल्यावर चढल्या. आज स्त्री शिक्षित झाली, प्रगती झाली. पण लग्नाच्या बाजारत दावणीलाच बांधली आहे. माझ्या शिक्षणाचा लग्नाच्या बाजारात काही उपयोग नाही. हं, प्रेम विवाह असता तर थोडा फरक पडला असता. पण प्रेम करता येत नाही. ते आपसूकच होत असतं. ही माझी तिसरी वेळ आहे. मागं दोन्हीही वेळी मुलाकडच्यांना मी पसंत होते. पण बाबांना नंतर ते आमच्या तोला मोलाचे वाटले नाही. हुंडा देणे घेणे कायद्द्याने बरोबर नाही म्हणतात तरी ह्या ना त्या स्वरुपाने तो मुलीकडून घेतलाच जातो. मी आता बाबांचे काही ऐकणार नाही. बस झाले दाखवण्याचे सोहळे. आजचा मुलगा जर मला आवडला तर मी लग्न करीन नाहीतर माझ्या डॉक्टरी व्यवसायात झोकून देईन."

"अगं शरयू, बघ किती सुंदर दिसते तू! मी मुलगा असते तर तुझ्या प्रेमातच पडले असते," नीता म्हणाली.

'खरंच गं, आम्हाला तू एवढी छान वाटली मग त्या जिजूचं काही खरं नाही," मीना म्हणाली.

"पूरे गं कौतुक माझे आता. बस झाली तयारी."

तेवढ्यात खालून शरयूच्या आईची हाक आली. "शरयू, झालं का तुझं? ये खाली."

"हो आई, येते गं."

एवढी डॉक्टर मुलगी तरी पाहण्याच्या कार्यक्रमात सगळ्या सारखीच तिची गत झाली होती. छाती धडधडत होती.

आज आईने तिला साडी नेसायची जबरदस्ती केली होती. नीता आणि मीना ही तिच्या बरोबर खाली आल्या. तिघी बैठकीच्या खोलीत आल्या आणि त्याच्या बैठकीत सामील झाल्या. शरयूच्या वडिलांनी आपल्या मुलीची व तिच्या मैत्रिणींची ओळख पाहुण्यांना करून दिली व नवऱ्यामुलाची व त्याच्या आईवडिलांची ओळख पाळख करून दिली. जुजबी गप्पा गोष्टी झाल्या. चहा पाणी ही घेऊन झाले. वडिलांनी मग शरयूला सागरला, म्हणजे नवऱ्या मुलाला, घर दाखवायला सांगितले. म्हणजे त्या दोघांना मोकळेपणाने बोलता यावे.

शरयू सागरला घेऊन घरा समोर असलेल्या त्यांच्या बागेत गेली.

"नीता, मीना, तुम्ही पण या गं."

तेव्हा सागरही म्हणाले " या ताई दोघी तुम्ही. आपण एकत्रच बोलू."

मीना, नीता बोलल्या " कबाब में हड्डियाँ! नही बाबा, तुम्हीच चला. "

पण शरयू आणि सागर ने हट्टच केल्याने त्या दोघी पण त्यांच्या बरोबर बागेत गेल्या. बागेत गप्पा करत, फेरफटका मारून तिथेच असलेल्या मोठ्या झोपाळ्यावर बसून झोके घेत चौघांच्या गप्पा छान रंगल्या.

गप्पा एवढ्या रंगल्या की शरयू व सागर आपण एकमेकांना पंसत करायला भेटलोय हे विसरूनच गेले.

नीता, मीना ही "कबाब में हड्डी क्यों?" म्हणत होत्या, त्या पण "आजचा समाज व त्यात युवकांचे कार्य" ह्या चर्चेत छान रमली. जणू शाळा - कॉलेजमधल्या मित्र मैत्रिणीच.

बराच वेळ झाला शरयू सागर आले नाहीत म्हणून शरयूची आई त्यांना बोलवायला बागेत आल्या. त्या इकडे तिकडे बघत होत्या एवढ्यात त्या चौघांचा जोर जोराने हसण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. आवाजाच्या दिशेने त्या पुढे सरकल्या. तर त्यांनी पाहिले की सागर त्या तिघींना काही तरी विनोदी बोलून हसवत होता. त्या चकितच झाल्या. तेवढ्यात सागरचे लक्ष त्यांच्या कडे गेले आणि त्याने इशाऱ्याने मुलींना सांगितले. तेव्हा त्या ही भानावर आल्या.

मीना शरयू व सागरला म्हणाली," अरे बापरे, तुम्ही पंसती बद्दल काही बोललांच नाहीत! आता काकू मला आणि नीताला ओरडणार."

तेव्हा शरयू म्हणाली, "अरे, तुम्ही पण मला कुठे सांगितले तुम्हाला जिजू आवडला की नाही ते?"

"म्हणजे तुझ्या, सॉरी, तुमच्या मैत्रिणी माझे परीक्षण करणार होत्या. बापरे! वाट लागली माझी." सागर म्हणाला.

"खरं सांगू का, मला असले सोहळे मूळीच पंसत नाहीत. आज पर्यंत एकही मुलगी मी बघायला गेलो नाही. माझे आईबाबाच मुलीचे फोटो बघायचे, निवडायचे व स्वतःच मुलीकडे जाऊन ती त्यांच्या आवडी प्रमाणे आहे का बघायचे. मला वाटते तुमच्याकडे सुध्दा ते येऊन गेले असतीलच. मगाशी आपल्या दोघांचे आई बाबा जुनी ओळख असल्या सारखे वागत होते.

"जाऊ दे, माझं मत सांगतो शरयू. तू मला पाहता क्षणीच आवडलीस. आता तुझी पसंती मी मीना आणि नीताला विचारतो. काय शरयूच्या खास मैत्रिणींनो मी तुमचा जिजू होण्या लायक आहे का?"

"चला, आई इकडेच येतात. तुम्ही चार दिवसांनी कळवलं तरी चालेल हं," आणि हसून सागर तिथून निसटला.

मीना व नीताने सुध्दा शरयूचा चेहरा बघून तिला सागर आवडलाय हे जाणले तरी तिला चिढवायच्या हेतूने त्या दोघी बोलल्या "चल, काकूना सांगुया, शरयूला मुलगा पसंत नाही म्हणून," असे बोलून दोघी काकूच्या दिसेने निघाल्या.

त्यांच्या मागे धावत जाऊन शरयूने त्या दोघींना रोखले. "अगं वेड्यांनो, तुम्ही मला विचारले तरी का?"

दोघी म्हणाल्या, "तुला कशाला विचारायचं?आम्हालाच आवडला नाही बाई सागर. किती बडबड करत होता!"

"आणि आम्ही पण बडबडलो ना त्यांच्या बरोबर! मग त्यांनाच का दोष द्यायचा?"

"असं होय. बर. काकू, सागर पसंत आहे तुमच्या लेकीला." असं बोलून दोघी काकूकडे धाऊन गेल्या व त्यांना ही वार्ता सांगितली. शरयूच्या आईने प्रेमाने मुलीला जवळ घेतले. डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या,'शरयू, आम्हाला ही सागर पसंत होते. चल घरात जाऊन ही गोष्ट सांगुया" असे बोलून सगळी घरात आली.

आनंद वार्ता ऐकून घरातले सगळे आनंदित झाले. पुन्हा एकदा सर्वांनी मस्त चहा घेतला. साखरपुड्याच्या गप्पा ही रंगू लागल्या.

सागर, शरयू आणि तिच्या मैत्रिणी एकाच फील्ड मधले होते. त्यामुळे चोघांच्या गप्पा ही छान रंगल्या होत्या. दुसऱ्या दिवशी शरयू व सागरने परत भेटायचे ठरवले. तेव्हा सागर तिच्या मैत्रिणींना म्हणाला, "येताय ना, कबाब में हड्डी!" त्या बरोबर सगळेच हसायला लागले.

शरयू पेक्षा सागर जास्त शिकला होता व तो वडिलांच्याच हॉस्पिटलमध्ये त्याच्या डॉक्टर वडिलांच्या हाताखाली मेडिकलचे धडे गिरवत होता.

शरयू व तिच्या मैत्रिणी आताच एम.बी बी. एस. झालेल्या असल्याने त्यांची इनटर्नशीप वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये लागली ह्याती. सागरला शरयूने त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये इनटर्नशीप करावी असे वाटत होते. पण त्याच्या वडिलांनी त्याला नकार दिला. ते म्हणाले," अरे शरयूला नंतर आपल्याच हॉस्पिटलमध्ये काम करावे लागणार, मग आता तिला दुसरीकडचा वेगळा अनुभव घेऊ दे."

"हो बाबा. तुमचे म्हणणे पटले मला."

असे म्हणून त्याने वडिलांचे म्हणणे मान्य केले.

ठरल्या प्रमाणे सागर आणि शरयू दुसऱ्या दिवशी भेटले. खूप गप्पा-टप्पा झाल्या. नंतर सागर शरयूला त्यांचे हॉस्पिटल दाखवायला घेऊन गेला. तिथला स्टाफ, ओ.टी आणि वेगवेगळे वॉर्ड बघून व पेशंटशी बोलून तिला खूप बरे वाटले.

पुढच्या महिन्यात त्यांचा साखरपुडा ठरवला आणि तो ही नीट पार पडला. अधून मधून कामातून जसा वेळ मिळेल तसा, तिच्या मैत्रिणी सकट सागर बरोबर बैठका व्हायच्या. व्यवसायाने डॉक्टर असल्याने चौघेही कर्तव्याला जागत होते. त्यामुळे भेटणे कमीच व्हायचे पण फोनवर बोलणं व्हायचं.

त्यांच्या लग्नाची तारीख ही ठरली होती. सगळे छान सुरळीत चालले होते. लग्नाची खरेदी सुद्धा जोरात चालली होती. नवरा नवरी व तिच्या मैत्रिणी मात्र त्यांच्या कामात दंग होत्या. वडिलधाऱ्यांच्या पसंतीने सगळी लग्नाची तयारी चालली होती.

एके संध्याकाळी नेहमीप्रमाणे सागर हॉस्पिटलमधून बाईकवरून घरी निघाला होता. समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर लाईटमुळे त्याची गडबड झाली आणि काय होतयं हे कळायच्या अगोदरच समोरच्या कारने त्याला धडक दिली. तो दूर फेकला गेला व त्याची शुद्ध हरपली.

अपघाताची गोष्ट कळताच सगळ्यांची धावपळ उडाली. सागरला जवळ असलेल्या त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये लोक घेऊन गेले. आपल्या मुलाला ह्या अवस्थेत बघून एका पित्याचे काय झाले असेल! पण त्यांच्यातला डॉक्टर लगेच जागा झाला आणि पेशंटवर त्यांनी उपचार सुरू केले. दुसऱ्या मोठ्या डॉक्टरांनाही मदतीला बोलावले. एक ऑपरेशन ही त्याच्यावर केले. चोवीस तासात त्याला शुद्ध यायला हवी नाहीतर कोमात जाण्याची शक्यता वाढते असे मोठ्या डॉक्टरांनी सांगितले. शरयू, तिच्या घरचे व सागरची घरची मंडळी सगळे देवाचा धावा करू लागले.

पण काही उपयोग झला नाही. सागर कोमात गेला. शरयूवर दुःखाचा डोंगर कोसळला. सागरला शुद्ध कधी येईल ह्याचा अंदाज नव्हता. कमी जास्त वेळ लागू शकतो असे डॉक्टर

म्हणाले.

शरयूच्या घरचे तिचे लग्न मोडायला निघाले होते पण शरयूने त्या गोष्टीला साफ नकार दिला. तिने आपली इनटर्नशीप सागरच्याच हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करून घेतली. देवधर्म करण्या एवजी ती हॉस्पिटलमधल्या सागरची व बाकी रोग्यांची सेवा करू लागली. सगरला कधी शुद्ध येईल की येणारच नाही काही भरवसा नव्हता. तिचा मात्र पूर्ण विश्वास होता. सागर शिवाय ती कुणाचाच विचार करू शकत नव्हती. तिच्या घरच्यांनी तसेच मीना व नीतानेही तिला खूप समजावले पण ती आपल्या विचारांवर ठाम होती. सागरच्या आईवडिलांनी ही तिला समजावले तेव्हा तिने सांगितले.

"पप्पा, आपण सकारात्मक विचार करायला नको का? आपणच आशा सोडली तर सागर कसा उठेल?"

"माझा ठाम विश्वास आहे सागर शुध्दीवर येईलच व त्याला उशीर लागत असेल तर मी वाट बघायला तयार आहे."

तिच्या ह्या निश्चयामुळे तिची आणखी कुणी मनधरणी करायचा प्रयत्न केला नाही.

दिवसा मागून दिवस व महिने सरू लागले. नीताचेही लग्न जूळले. मीना, नीता आप आपल्या संसारात रमल्या. शरयू मात्र सागरच्या सेवेत तत्पर होती. सागरचे आईवडील ही तिचे आगळे वेगळे प्रेम पाहून देवाकडे धावा करत होते. शरयूला ते स्वतःच्या मुलीप्रमाणेच वागवत होते.

सागरमध्येही थोडा बदल डॉक्टरांना जाणवत होता. त्यांनाही आशेचा किरण दिसत होता.

असे बरेच महिने झाले. शरयूच्या घरच्यांनी आता आशा सोडली होती. तिचे आई-वडील स्वतःलाच दोषी समजत होते.

तिच्या दोन्ही भावांचे ही लग्नाचे वय उलटून गेले होते. पण त्यांच्या लाडक्या ताईची स्थिती बघून त्यांना संसारात पडावे असे वाटत नव्हते. असं म्हटलं जातं

"भगवान के घर देर है लेकीन अंधेर नही है।"

तसाच चमत्कार सागरच्या बाबतीत झाला. नेहमी सारखे सागरचे स्पंजिंग करून झाले. त्यांची नेहमीची औषधे सलाईन बोटलमध्ये घातली व सागरचा हात हाती घेऊन ती कुरवाळत होती. तेवढ्यात तिला त्याच्या बोटाची हालचाल जाणवली. तिला आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात ती "सागर सागर" ओरडली. नर्स धावत आत आली. तिने मोठ्या डॉक्टरना बोलावले. त्यांनी तपासले. शुध्दीवर येण्याची लक्षणे पटली आणि स्वप्नात असल्यासारखा सागर हळू हळू हालचाल व अस्पष्ट बोलू लागला. नंतर त्याने शांतपणे डोळे उघडले. समोर शरयूला बघून त्याने गोड स्मीत केले.

शरयूचा विश्वास आणि सकारात्मक वृत्तीने ती आज जिंकली होती. सागर शुद्धीवर आल्याची बातमी कळताच सगळ्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता.

सागरचे वडील शरयूला म्हणाले "शरयू बाळ, तुझी पुण्याई थोर आहे. तुझी आणि सागरची ताटातूट कुणीच करू शकत नाही. देवालाही तू हार मानायला लावली."

सागरला फक्त समोरून ब्रायट लाईटची गाडी आठवत होती. एक वर्षभर झोपलेल्या सागरला ती कालचीच गोष्ट वाटत होती. शेवटी शरयूचा विश्वास जिंकला. तिच्या विचारावरून पटले माणसाने कोणत्याही कठीण परिस्थितीत सकारात्मकच विचार बाळगायला हवेत.


     समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy