उषा अनिरुद्ध विवाह
उषा अनिरुद्ध विवाह
उषा व अनिरुद्ध यांच्या विवाहाची ही पौराणिक कथाआहे. उषा ही बलीचा पुत्र बाणासूर ह्याची कन्यका. बाणासुर शिवाचा अस्सीम भक्त होता. त्यांने घोर तपश्चर्या करून शंकराकडून सहस्त्र हात मागून घेतले. भोळ्या शंकरांने त्याची इच्छा लगेच पूर्ण ही केली. पण काही काळा नंतर त्या सहस्त्र हातांचा त्याला त्रास होऊ लागला. मग पुन्हा त्याने शंकराची आराधना केली तसे शंकर प्रसन्न झाले व त्याची इच्छा विचारली.
बाणासुर म्हणाला,"देवा ह्या सहस्त्र हातांचा मला त्रास होत आहे तेव्हा ते छाटून टाका."
शंकर ही त्याची इच्छा ऐकुन चकीत झाले तरी बाणासुरांची इच्छा पूर्ण करावीच लागणार होती. तेव्हा शंकर म्हणाले, "त्यासाठी तुला युद्ध करावे लागेल व ते युद्ध सुद्धा तुझ्याच जावई अनिरुद्ध यांच्याशी होणार."
शंकराच्या या वरदानाने बाणासुर चिंताग्रस्त झाला. त्याने आपल्या राजकन्येस महालात डांबून ठेवले. असा बराच कालावधी झाला. उषा वयात आली. तिला ही जीवनसाथी असावा असे वाटले पण नाईलाज होता. तिने तिची मैत्रीण चित्रलेखा हिच्याशी मन मोकळे केले. उषा ही पार्वती देवीची निस्सीम भक्त होती. तिने ही घोर तपश्चर्येने देवी पार्वतीला प्रसन्न करून घेतले. पार्वती प्रसन्न झाली व तिने तिला सांगितले, "येत्या द्वादशीला पहाटेच्या स्वप्नात तुला तुझा प्रियकर भेटेल" असे सांगून देवी अतःधान पावली. देवीवर विश्वास ठेऊन उषा रोज रात्री स्वप्नाच्या दुनियेत रंगू लागली.
आणि बरोबर द्वादशीच्या पहाटेला तो राजकुमार तिच्या स्वप्नात आला. ती गोष्ट तिच्या मैत्रिणीला तिने सांगितली. त्या राजकुमाराला शोधण्याची जबाबदारी चित्रलेखेने घेतली. तिने असंख्य चित्रे काढून तिला दाखवली व शेवटी तिच्या स्वप्नातला राजकुमाराचे चित्र लाभले व महा प्रयत्नाने त्या राजकुमाराचा तिला शोध लागला.
तो तरूण म्हणजे श्रीकृष्णाचा नातू, मदनाचा मुलगा, यादववीर अनिरूद्ध, द्वारकेला असतो हे चित्रलेखेला समजले.
अनिरुद्ध ला सुद्धा पहाटेला स्वप्नात राजकन्या उषा दिसली होती. तो ही तिच्या प्रेमात व शोधात होता. चित्रलेखा जेव्हा त्याला भेटली त्याला सगळं कळलं. मग मोठ्या युक्तीने महा कुशलतेने तिने अनिरुद्धला उषेच्या महालात आणून गुपचूप गांर्धव विवाह लावून दिला व दोन प्रेमिकांचे मिलन केले.
तिच्या विवाहाची बातमी बाणासुराला कळल्यावर तो खूप संतापला व त्याने आपले सैन्य उषेच्या महालावर पाठवले. घनघोर लढाई झाली. शेवटी बाणासुर स्वतः चाल करून उषेच्या महालावर आला.
ह्या लढाईची बातमी द्वारकेला नारदाने पोचवली. श्रीकृष्णाला हे कळल्यावर श्रीकृष्ण, बलराम, प्रद्युम्न सैन्यासह बाणासुराच्या नगरीत पोचले. बाणासुर व यादवात घनघोर लढाई झाली. शेवटी श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राने बाणासुराचे सहस्त्र हात तुटून पडले. त्याने वर मागून घेतल्या प्रमाणे घडल्यावर त्याचा भ्रम दूर झाला. नंतर तो श्रीकृष्णाला शरण गेला व श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे तो कैलासावर गेला व श्री शंकराची सेवा करू लागला.
नंतर श्रीकृष्णाने उषा व अनिरूद्धचा तिथे थाटामाटात लग्न सोहळा पार पाडला व सैन्य घेऊन माघारी द्वारकेला निघाला.
अशा रितीने उषा व अनिरुद्ध चा विवाह पार पडला.

