चिंगी
चिंगी
चिंगी
"चिंगे, ऊठ बिगी बिगी, शाळेला जायचं हाय नव्हं! पानी भी गरम झालयं बघ."
रखमा भाकर थापता थापा चिंगीला उठवत होती. रात्री झोपायला उशीर झाला होता. तिचा दादला घरी आला तेव्हा बरीच रात्र झाली होती. बाहेर पावसाची रिपरिप ही चालू होती. रात्री बऱ्याच उशीरा तिला झोप लागली. तरी सकाळी ती नेहमीसारखीच उठली. पटापट सगळी कामे आटपू लागली. काल दादला उशीरा आला होता तो ही टर होऊनच म्हणजे सकाळी लवकर उठण्याची शाश्वती नव्हती. हे त्यांचे रोजचेच होते. कामधंदा काही करायचा नाही. फक्त दारू ढोसून बडबड करायचा अन् बायको नि पोरीवर ओरडायचा. कुणी मध्ये बोललं तर अंगावर धाऊन जायचा. रखमा त्यांच्या वागण्याला वैतागली होती.
तिच्या माहेरी फक्त भाऊ व वहिनी होती. भाऊ तेवढा तिची काळजी करायचा. त्याचाच तिला आधार होता. भाऊ चांगला असला तरी वहिनी जरा वेगळीच होती. तिचे तिच्या नणंदेशी, रखमाशी, काही पटत नव्हते. रखमा खूप समजुतीने घेत होती. आपलं दु:ख भावापासून लपवत होती.
चिंगी तिची खरंच गुणी मुलगी होती. पहिल्या हाकेला ती उठली नाही पण दुसरी हाक कानी पडताच उठून भरभर काम करून शाळेसाठी तयार झाली. रखमाने तिच्या पुढे भाकरीचा तुकडा ठेवला व तिने तिचे केस विंचरून तिच्या दोन वेण्या घालून वरती रिबनने घट्ट बांधून दिल्या व तिला बोलली,
"जा भरभर आता शाळेला"
लगेच चिंगेने शाळेची पिशवी घेतली, देवाला नमस्कार करून आईच्या पाया पडली, तिथे झोपलेल्या बाबाकडे पाहून ती
"आई येते गं" म्हणून निघाली.
रखमाने नंतर आपले सगळे काम पूर्ण केले. नवऱ्याला दोन वेळा हाका मारल्या.
"अहो, उठतात नव्हं. मी भाकऱ्या थापून ठेवल्यात. तुम्ही दोन कळशी पाणी भरून आणून ठेवलं तर बरं होईल. मी जाते आता शेतावर"
असे म्हणून ती जायला बाहेर पडली. तेवढ्यात समोर चिंगीला बघून ती चकित झाली.
"का गं परत आलीया? शाळेला गेली नाय?"
"अगं आये, आज शाळेला सुट्टी दिली बाईंनी."
"कशापायी सुटी हाय? कोनी मोठं माणूस मेलं की काय?"
"नाही गं आये, काल रात्री खूप पाऊस पडला होता ना, त्यामुळे आमच्या वर्गात पाणी भरलं. पाऊस थांबलाय पण वर्गात पाणी नि चिखल आहे. म्हणून बाईंनी शाळेला सुटृटी दिली."
"मग आता तू काय करणार? चल माझ्या संगती."
"अगं कशाला, मी घरी थांबते नि माझा अभ्यास करते."
"नगं नगं, तू चल माझ्या संगती. दुपारची तुझी भाकर घेते मी बरोबर." असे म्हणून आत जाऊन तिने चिंगीची भाकर पण पिशवीत घेतली आणि दोघी शेतावर निघाल्या.
"चिंगी शेतावर मी भात लावणीचे काम करणार. तिथं तू यायचं नाही. तिथे खोपटी आहे ना, त्यातल्या बाकड्यावर बसून अभ्यास करायचा. मी तिथे दुपारला भाकरी खायला येईन."
चिंगी ही आईने सांगितल्या प्रमाणे त्या खोपटात जाऊन बाकड्यावर बसली. तिथून तिला आई शेतात काम करते ते ही दिसत होते.
खरं म्हणजे, चिंगीला घरात बापासोबत ठेवायची तिला भिती वाटली. तिचा दादला असला तरी तिच्या मनात पाल चुकचुकली होती. त्याला कारण ही तसंच होतं. "आज पुरूष जात खूप वाईट झाली म्हणे. पोरी-बायांना एकटी दुकटी पाहून छेडतात, इज्जत लुटतात आणि बोभाटा होऊ नये म्हणून मारून भी टाकतात", असे काल शेतात बाया काम करताना आपसात बोलत होत्या. "आता आया- बायांना एकटं फिरणं धोक्याचं झालं म्हणे. शेजारी पाजारी ह्या सगळ्या पासून स्त्री जातीला सांभाळून राहायला हवे. बाप -भाऊ ह्यापासून भी भय आहे म्हणे." त्या बायांच्या त्या बोलण्याने तिला ही चिंगी ची काळजी वाटली.
आता कलयूग आहे म्हणे, सगळेच कली होऊन त्रास देतात.
चिंगी अजून वयात आली नव्हती. सात आठ वर्षाची, आताच तिसरीच्या वर्गात गेलेली. तिला काही सांगितले तरी काही कळणार नाही पण कधी तरी तिला समजावून सांगायला हवेच एवढे तिच्या आईला कळले होते.
तिचा तिच्या नवऱ्यावर विश्वास होता. पण दारूच्या नशेत काही विपरीत झाले तर! म्हणून रखमा मनातून घाबरत होती.
पूर्वी किती छान होते. मुलींना आता सारखा त्रास नव्हता. सगळे एकमेकांची काळजी घेत होते. प्रत्येकाला एकमेकांवर विश्वास होता. साधी भोळी माणसे पण प्रामाणिक होती. हं, चंचल वृत्तीची होती काही माणसे पण त्यांची जमात वेगळीच होती. त्यांच्यापासून गरीब आया -बायांना काही त्रास नव्हता.
रखमा शेतात भात लावणीचे काम करत होती तरी अधून मधून तिचे लक्ष चिंगी कडे जात होते. आता पाऊस ही पडता नव्हता. चिंगी खोपटाच्या बाहेर येऊन आईकडे बघत होती. तिची आई पाऊलभर पाण्यात ओणवी होऊन एक एक रोप मातीत लावत होती. सगळ्या बायका ओळीने ते काम करत होत्या, शाळेतल्या कवायत करणाऱ्या मुलांसारख्याच.
इवली इवली रोपे पाण्यावर तरंगत असल्यासारखी वाटत होती. चिंगीला तिच्या आईचा खूप अभिमान वाटला. बाप काही कामाचा नाही तरी तिची आई खंबीर होऊन सगळा संसार सांभाळत होती. वयाने लहान असली तरी नजरेने ती सगळे न्याहाळत होती. घरची परिस्थिती मुलापेक्षा मुलींना जास्त समजून घेता येते आणि त्यामुळे त्या आपसूकच शहाण्या सारख्या वागतात व आईला आधार देतात. रखमाची चिंगी ही तशीच समजूतदार होती. बाप तिच्या आईला नेहमीच त्रास देतो, भांडत असतो ते बघून तिला फार वाईट वाटत होते. आईला सुख समाधान मीच द्यायला पाहिजे हे लहान वयात चिंगीला कळत होते व त्यामुळे आई सांगेल ते ती करत होती. रखमा चिंगीचे मेतकूट छान जमले होते.
जेवायच्या वेळेला सगळ्या बायका खोपटात आल्या आणि आप आपली शिदोरी खाऊ लागल्या. रखमा व चिंगी त्यांच्या सोबत बसून खाऊ लागल्या. खाता खाता एका मावशीने चिंगीला विचारले, "चिंगे, तू पण येते का लावणीचे काम करायला."
"नाही मावशी. मला खूप शिकून बाई व्हायचे आहे. आणि मी बाई झाले की तुम्हां सर्वांना शिकविन हं. तुम्ही याल माझ्या शाळेत?"
"तू शिकविणार हाय तर आम्ही सगळीच येऊ की! मग आम्ही शेतात काम नाय करनार. खांद्याला पर्स लावून ऑपीसला जाणार" असे म्हणून सगळ्या त्या मावशा हसू लागल्या.
छोटीशी चिंगी तेव्हाच आपले स्वप्न रंगवू लागली. मनातल्या मनात सगळ्या बायका व तिची आई सुद्धा हसत होती. तिने चंग बांधला नि मनात ठरवले की, "काही झाले तरी मी शिक्षिका होईन व मावशा सारख्या बायांना शिक्षित नक्की करीन."
रखमा व चिंगीचे दिवस असेच चालले होते. रखमा शेती कामाशिवाय आणखी लोकांची घरगुती कामेही करत होती. तेवढीच तिची संसाराची नड भागत होती. चिंगीचा अभ्यास जोरात चालला होता. ती एका वर्गातून पुढच्या वर्गात शिकत होती. ती अभ्यासात ही हुशार असल्याने शिक्षकांचे तिच्यावर जातीने लक्ष होते. तिची अभ्यासातली प्रगती हीच अतिशय सुखाची व आनंदाची गोष्ट रखमाच्या आयुष्यात होती.
मध्यंतरी दारू व्यसन निवारण उपक्रम गावात घेतला होता. रखमा तिच्या नवऱ्याला घेऊन तिथे गेली होती. तिकडच्या माणसांचे बोलणे रखमाच्या नवऱ्याने मनावर घेतले होते व त्यांनी दिलेले औषध ही तो नियमित घेत होता. त्यामुळे दारूचे व्यसन हळू हळू कमी होत होते.
चिंगी आठवीच्या वर्गात असताना तिच्या शिक्षकांनी तिला स्कॉलरशिपच्या परिक्षेलाबसवले होते व शिक्षकांनीच तिची अभ्यासाची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात ती पहिली येऊन तिने शाळेचे व शिक्षकांचे नाव उंचावले होते. तिच्या सत्काराच्यावेळी तिच्या बापालाही बोलावले होते. आपल्या पोरीचे यश व लोकांनी केलेले कौतुक पाहून तो भारावून गेला आणि तेव्हा पासून त्याच्यात बरेच परिवर्तन दिसू लागले. तो काम करून पैसे आणून रखमाला देऊ लागला. दारूला शिवणे एकदम बंद झाले. रखमा, चिंगी व चिंगीच्या मामालाही खूप आनंद झाला. चिंगी मुळे रखमाच्या संसारात बदल घडू लागले.
असे दिवस व वर्षे सरू लागली. दहावीच्या परिक्षेत ही चिंगी पहिली आली व स्कॉलरशिपच्या बळावर तिने तिचे कॉलेज शिक्षण पूर्ण केले. नंतर बी.ए. बी.एड. करून ती आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने शिक्षिका झाली. मोठ्या शाळेत तिला नोकरी लागली, तरी रात्रीच्या वेळी आपल्या सर्व मावशांसाठी तिने रात्रशाळा काढून तिच्या मावशांना व गावातील बऱ्याच वयस्कर लोकांना ती शिकवू लागली, ते ही स्वप्नपूर्तीच्या आनंदाने. चिंगी मुळे तिच्या आई बाबांचे व संपूर्ण गावाचे भले झाले.
~~~~~~~~~~~~
शोभा वागळे
मुंबई.
8859466717
