एका लग्नाची गोष्ट
एका लग्नाची गोष्ट


लग्नगाठ स्वर्गात बांधली जाते असं म्हणतात. आपण मात्र इथे स्थळ शोधत फिरत असतो. जे चांगले वाटते, सुंदर दिसते ते स्थळ पसंत करत असतो. स्वर्गातली जोडी इथे जमली नाही तर ती टिकत नाही. काही तरी कारणाने फिसकटते. असाच काहीसा अनुभव रुक्मिणीच्या आयुष्यात आला.
जामखेडच्या बाबुरावांची एकुलती एक मुलगी रुक्मिणी. एक लहान भाऊ, आई वडील यांच्या सोबत रहात होती. लाडक्या मुलीला बाबुरावांनी शाळेतही घातले होते. शिक्षण घेतांनाच रुक्मिणी आईच्या हाताखाली घरकामही शिकत होती. वाढत्या वयाबरोबर रुक्मिणी आता स्वयंपाकही चांगला करू लागली होती. दहावी पास झाल्यावर तिचे शिक्षण बंद झाले. पुढचे शिक्षण घ्यायला बाहेर गावी जावे लागत होते. त्याकाळी ( म्हणजेच साधारणतः १९८० च्या जवळपासचा काळ होता तो ) वाहन व्यवस्था फारशी नसायची. शिक्षण व्यवस्थाही फार कमी होती त्यामुळे मुलींचे शिक्षणाचे प्रमाण फारच कमी होते. रुक्मिणी वडिलांची लाडकी म्हणून तरी दहावीपर्यंत शिकू शकली होती. म्हणजे त्याकाळी खूप शिकली होती.
शिक्षण थांबल्यानंतर रुक्मिणीने घरातली, शेतातली सर्व कामे आईकडून शिकून घेतली. या कामात ती आता चांगली तरबेज झाली होती. रितिरिवाजा प्रमाणे तिचे लग्न करणे क्रमप्राप्त होते. बाबुराव आपल्या शिकलेल्या मुली साठी चांगला मुलगा शोधत होते. बऱ्याच संशोधनानंतर सावखेड्याचे एक स्थळ सापडले. मुलगा सुंदर होता. बारावी पास झालेला होता. पुढे अजून शिक्षण सुरू होते. त्याला मुलगी पसंत पडली होती. चार पै पाहुणे जमवून रितिभाती नुसार लग्नाची बोलणी झाली. पाच हजार रुपये हुंडा, सोन्याचे लॉकेट आणि लग्न चांगल्या पद्धतीने करून द्यायचे ठरले. लग्नाचा मुहूर्त ठरला. दोन्हीकडची मंडळी कामाला लागली. दागिन्यांची खरेदी झाली. बस्ताही झाला. पैशाच्या अडचणी मुळे हुंड्याची काही रक्कम नंतर देण्याचे ठरले. लाकडे फोडणे,डाळी, तांदूळ, गहू निवडणे, कुरडया, पापड इत्यादि कामांची धामधूम सुरू झाली.
बघता बघता लग्नाचा मुहूर्त जवळ आला. ठरल्याप्रमाणे नवरा मुलगा हळदीसाठी आदल्या दिवशीच जामखेडला आलेला होता. हळदीचा कार्यक्रम पार पडला. लग्नाचा दिवस उगवला स्वयंपाक तयार झाला. वऱ्हाडी मंडळींची प्रतीक्षा सुरू झाली. वऱ्हाड आले, जवळपास वीस पंचवीस बैलगाड्या खचाखच भरून वऱ्हाडी आले होते. शहरातून चारपाच मोटार सायकली वर नवरदेवाचे मित्रही आलेले होते. भेटीगाठीचा कार्यक्रम पार पडला. वाङ्निश्चय झाला. पुढच्या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली.
वरपित्याला हुंड्याच्या रकमेची आठवण झाली. तो पारावर नवऱ्या मुलाकडे गेला. त्याला एकांतात बोलावून हुंड्याच्या रकमेबाबत विचारले. वास्तविक हुंड्याच्या रकमेविषयी नवऱ्या मुलाला माहिती असण्याचे काहीच कारण नव्हते. त्याबद्दलचे बोलणे वरपिता आणि वधुपिता यांच्यातच झाले होते. त्यामुळे त्या मुलाने वडिलांना, "तुमचे काय काय ठरले आहे ते तुम्हालाच माहीत. मला कसे विचारता? तुमचे तुम्ही बघून घ्या." असे सांगितले. वरपिता थोडीफार नशा करून आलेला होता. त्यामुळे त्याला राग आला. मुलगा आत्ताच सासऱ्याची बाजू घेऊन उलटून बोलतोय असे त्याला वाटले. दोघांमध्ये वादावादी झाली. शब्दाने शब्द वाढत गेला. नवऱ्या मुलाला चांगलाच राग आला होता. वडील निघून गेल्यावर त्याने मित्रांना बोलावले आणि पारावर गावातले कुणी हजर नसताना सर्वजण मोटार सायकलवर बसून निघून गेले.
इकडे जेवणाची तयारी झाली, तशी "आता पंगती बसवा." कुणीतरी बोलले. गल्लीमध्ये खराटे घेऊन गावकरी स्वच्छता करायला लागले. त्यातच कुणीतरी सीमंत पूजनाची आठवण केली. "नवरदेवाचे कपडे आणा. त्यांची एकदा मिरवणूक निघाली की मग पंगती बसवा. म्हणजे मित्रांना मोकळा वेळ मिळेल नाचायला, कुदायला." कुणी तरी सुचवले. सिमंत पूजनाचे कपडे आणि भटजी बुवाला घेऊन दोघे जण पारावर गेले. इकडे पंगत बसवून वाढायला सुरुवात झाली. पारावर नवरदेव दिसला नाही. तेव्हा, लघुशंकेला गेला असेल असे समजून ते दोघे वाट पाहात थांबले. अर्धा- पाऊण तास झाला तरी नवरदेवाचा पत्ता नाही, म्हणून त्यांनी विचारपूस केली तेव्हा ते सारे जण मोटर सायकलींवर बसून कुठे तरी गेले असल्याचे एका लहान मुलाने सांगितले. ते दोघे वरपित्याकडे गेले आणि त्याला विचारले. वरपिता गडबडला. नक्की काय झाले असावे ते त्याला समजले. झटक्यात त्याची नशा उतरली. गावातली एक मोटार सायकल घेऊन त्याने त्याच्या भावाला शोध घेण्यासाठी पाठवले. 'मित्रांबरोबर गेला असेल कुठे थम्सप वगैरे घ्यायला.' असे सांगून वेळ मारून न्यायचा केविलवाणा प्रयत्न तो करू लागला. पण बोभाटा झालाच.
नवरा मुलगा पळून गेल्याची वार्ता वधुमाता, वधुपिता यांच्यासाहित रिक्मिणीला कळली. रडारड सुरू झाली. सूर्य मावळतीला निघाला होता. नवरदेव सापडला नाही. आता काय करायचे? मोठा प्रश्न उभा राहिला होता. 'हळद लागलेली मुलगी तशी कशी ठेवायची?' हा प्रश्न आता एकट्या बाबुरावचा राहिला नव्हता, तर तो अख्ख्या जमखेडवासीयांचा झाला होता. सर्वजण विचार करू लागले. कुणीतरी दामाजी पंतांकडे जायचा सल्ला दिला. लगेच दोघेजण एक बैलगाडी घेऊन दामाजीपंतांकडे रवाना झाले.
सज्जनपूरचे दामाजीपंत पंचक्रोशीत गाजलेली आसामी. आजूबाजूच्या पाच पंचवीस खेड्यांमध्ये त्यांच्या शब्दाला एक नैतिक वजन होते. कुठल्याही विवादाचा, घरगुती कलहाचा, सामाजिक, धार्मिक भेदाचा न्यायनिवाडा त्यांनी अगदी रामशास्त्री बाण्याने केला होता. त्यामुळे साहजिकच कुठलीही समस्या निर्माण झाल्यास लोक त्यांच्याकडे साल घ्यायला येत असत.
सायंकाळची वेळ, दामाजी पंत देवदर्शन करून नेमकेच बैठकीत आसनस्थ झाले. तेवढ्यात बाहेर बैलाच्या घुंगुरमाळेचा आवाज आला. दारापुढं बैलगाडी सुटली. दोघेजण बैठकीत आले.
"रामराम!" ते दोघे.
"रामराम पावणं! बोला कुठणं आलात?" पंतांनी विचारलं. आणि प्यायला पाणी मागवले.
"आबा, आम्ही जामखेडचे. आमच्या बाबुरावच्या मुलीचे लग्न होते आज."
"आरं, हाव का? ते आज व्हतं का? आवो म्या इसरलोच की.मला बी पत्रिका व्हती ना ती." पंतांनी दिलगिरी व्यक्त केली.
"ते ठिकाय, पर एक घोटाळा झालता म्हून आलो व्हतो तुमच्याकडं." अस म्हणून त्यांनी रडत रडत सारी घटना कथन केली.
"हात्त्येच्या! त्यात काय रडायचं यव्हडं? त्यो गेला म्हून काय झालं? त्यो नाही तं त्याचा बाप दुसरा. पोऱ्हायला काय दुस्काळ लागून ग्येला काय? जा रं आपल्या त्या भगाला घिऊन या. लवकर ये म्हणावं" पंतांनी पावण्यांना शांत केलं आणि आपल्या गड्याला आदेश दिला.
"पावण्यास्नी च्या ठिवा जरा फक्कडसा" स्वयंपाक घराकडे पहात पंतांनी आदेश दिला.
चहापाणी होईपर्यंत गडी भगाला बैलगाडीत घेऊन आला होता.
"पाव्हण, तुमी व्हा म्होरं. म्या आलोच तुमच्या मागच ह्यो नवरदेव घिऊन. त्येच्या आयबाला सांगावं लागन ना." असं म्हणत पंतांनी पाव्हण्यांना निरोप दिला आणि भगा म्हणजे नवरदेव भगवानला बैलगाडीत घेऊन त्याच्या गावाकडे निघाले.
भगा! म्हणजे भगवान पंतांच्या मुलीचा मुलगा. म्हणजे नातू. गोरापान, सुदृढ, सुंदर, राजबिंडा मुलगा. परंतु शिक्षणाचा अन् त्याचा छत्तीसचा आकडा. एका एका वर्गात दोन दोन तीन तीन वर्षे घालून कसा तरी आठवी पास झालेला. आजोबाच्या शेतात काम करणे, बागेची राखण करणे, बैल सांभाळणे, हे त्याचे आवडीचे विषय म्हणूनच तो पंतांकडेच असायचा. आताही तो तिथेच होता.
भगवानला घेऊन पंत जांभुळखेडला मुलीच्या घरी आले. मुलगी नेमकेच शेतातून घरी आलेली होती. हातपाय धूत असतांनाच दारापुढं गाडीचा आवाज आला तशी ती बाहेर आली. ती काही विचारणार एवढ्यात पंतांनीच विचारले,
"शांता, पोराचं लगीन करायचं का न्हाय?"
"आबा, तुमी म्हनताल तसं. पर बैलास्नी तर मोकळं करा." शांता बोलली.
"न्हाई, त्यवढा येळ न्हाई. जावाय कुठायत आमचं? आल्यावर भावकीच्या चारदोन जणायला घिऊन या म्हणावं जामखेडला. म्या चालतु पुढं. लौकर या." असं म्हणून पंतांनी गाडी जामखेडच्या रस्त्याला लावली.
इकडे सारी मंडळी पंतांची वाटच पहात होती. पंतांना पाहताच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. सावखेडची बरीचशी मंडळी निघून गेली होती परंतु काही निवडक मंडळी थांबली होती. भगवानला अंघोळ घालून हळद लावली, नवरदेवासाठीचे नवीन कपडे चढवले. सोन्याचे लॉकेट गळ्यात घातले. तोवर जांभुळखेडची मंडळी हजर झाली होती. हुंड्याची रक्कम आणि बस्त्यासाठी खर्च केलेली रक्कम सावखेडच्या वरबापाकडून परत घेतली गेली. भगवानच्या वडिलांकडे ती सर्व रक्कम सुपूर्द केली.
अशा रीतीने केवळ दोन अडीच तास उशिराने रुक्मिणीचा विवाह भगवान सोबत पार पडला. दामाजी पंतांसारख्या जेष्ठांचे आशीर्वाद लाभले. सर्वांनी तेथे जेवणाचा आस्वाद घेतला आणि एक अविस्मरणीय, मजेदार घटना चर्चेसाठी सोबत घेऊन गेले.