येते
येते
मातीमध्ये रुजणे जमले त्याला जगता येते
जगणाऱ्याला पुन्हा नव्याने, येथे फुलता येते
कधीही करू नकोस मित्रा परिस्थितीचा बाऊ
युद्ध शेवटी तोच जिंकतो ज्याला लढता येते
वादळात उलमडून गेले जिद्द कुठे उलमडली
तग आशेवरती जगण्याच्या अविरत धरता येते
ऐकवले ना सृष्टीला मी दुःखाचे रडगाणे
जगता जगता बघ जगण्याचे गाणे रचता येते
आयुष्याच्या या प्रश्नावरती दिले कळीने उत्तर
काट्यांमध्ये राहुन सुद्धा मला उमलता येते
किती दिवस राहणार आहे पानगळीचा मौसम
श्रावणामधे आयुष्याला पुन्हा बहरता येते
आयुष्याच्या कॅनव्हासला, बघ रंगवता येते
मोहरता मोहरता मजला, दुःख विसरता येते
