कवी आणि लेखणी
कवी आणि लेखणी
कवी लेखणीचे नाते,
जणू फूल सुगंधाचे!
शब्दच होतात फुले
गंध कवी प्रतिभेचे!
प्रतिभेतूनी कवीच्या,
उमटे जीवनगाणे!
मदतीने लेखणीच्या,
एकच धुंद तराणे!
शब्द सुमनांची माळ
अखंड गुंफत जाई,
कवी नि लेखणी नाळ
कधी न वेगळी होई!
कवी मनाची क्षितिजे
असतात भव्य मोठी,
क्षितिजापुढती त्याच्या
लेखणीच होई छोटी!
टेकतील हात सारे
परंतु कवी न हारे,
पेटतो सत्य वणवा
त्या लेखणीच्या आधारे!
सोसेल कवी जगाचे
चटके जरी निमूट,
सोसणार ना कधीही
लेखणीची ताटातूट!
कवी लेखणीचे नाते
जितके होईल दृढ,
रसिकांच्या मनातील
उकलेल सारे गूढ!
प्रेमळ आणि हळवा
कवी मनाचा स्वभाव!
कवी आणि लेखणीचा
समजून घेऊ भाव!
विश्व मायेत कवीला,
जन्म दिला ईश्वराने!
उजळल्या दाही दिशा,
साथ दिली लेखणीने!