रूपे मनाची
रूपे मनाची
कुणा ना कळे मनाचा अर्थ
मनाशिवाय परी जगणे व्यर्थ
कधी मनामध्ये शुद्ध भावार्थ
तर कधी काढतसे अनेक मतितार्थ
कधी मनामध्ये उंच मनोरे
तर कधी पायरीचे दगडच खरे
कधी मन नाचे मस्ती भरे
कधी वाटते जसे आहे तसेच बरे
क्षणात फिनिक्स परी भरारी घेतसे
कधी खिन्न होऊन कोपऱ्यात बसे
कधी मनात एक अन शब्दांत एक असे
जग हे सारे तेव्हा बेगडी भासे
कधी सुटतसे मनाला हावं
तर कधी सूड घेण्या करी धावाधाव
कठीण सर्वात घेणे मनाचा ठाव
कमरेला सुरी अन देवा मला पाव
कधी हे मन अतिशय प्रेमळ
क्षणापरी ते होई चंचळ
कधी मनात असे प्रचंड खळबळ
कुणा ना सापडे स्व मनाचाही तळ