भग्न स्वप्न
भग्न स्वप्न


माझ्या आयुष्यात जेव्हा टाकलेस तू पाऊल,
तेव्हाच खऱ्या प्रेमाची लागली मला चाहूल.
प्रत्येक भेटीत मला नव्याने उमगणारा तू!
प्रेम, माया, आपुलकी आणि प्रोत्साहन, भरभरून देणारा तू!
त्यामुळेच मला लागली तुझ्या प्रेमाची आस,
क्षणोक्षणी हवाहवासा वाटू लागला तुझाच सहवास!
तुझ्या प्रेमात माझी मी राहिलेच नाही,
मागे वळून मग मी कधी पाहिलेच नाही.
आकंठ बुडाले तुझ्याच प्रेमात खरी,
माझ्यासाठी दिवसच होते ते सोनेरी!
पण म्हणतातना, प्रेमासोबत वेदनाही येतात,
आनंदी आयुष्यात अंधकार पसरवतात.
किती सहज म्हणालास,
'इथवरच प्रवास आपला, आता सोडून दे मला!'
तेव्हापासून जिवंतपणी मरणयातना भोगत आहे,
हे कसं
सांगू तुला!
तुझे काही चुकत नाही हे हे कळतंय मला,
समाजाची बंधन मोडवत नाहीत तूला!
आता तूच सांग,
ओळखीचे असूनही अनोळखी वागायचे ते कसे?
अंतरंगात सामावूनही अंतर ते ठेवायचे कसे?
तू आयुष्यातून गेलास तरी तुझी आठवण जात नाही,
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत, तुझ्यावरील प्रेम संपणार नाही.
मनामध्ये अपार दुःख सलते आहे,
कणाकणाने हृदय माझे जळते आहे.
आठवणी विसरता येतात, पण प्रेम विसरता येत नाही.,
मग माझ्या मनाची व्यथा, तुला कशी कळत नाही?
आता तुझ्याकडून अंतिम इच्छा एवढीच आहे,
माझं सर्वस्व तूच आहेस, याची जाणीव ठेवशील ना?
शरीराने माझा नाही झालास तरी, मनाने माझा कायम राहशील ना?