विवाह-वेदी
विवाह-वेदी
विवाह म्हणजे मंगलाक्षता, विवाह म्हणजे मंगल घटिका
विवाह केवळ नाही सोहळा, विवाह बंधन पवित्र भूमिका
गौरी हरांचे करुनी पूजन, गृहस्थाश्रमी टाकावे पाऊल
थोरांच्या मग आशिर्वचने, संसाराचे बनवावे राऊळ
सप्तपदीची चालता पाऊले, घेतल्या ज्या आणाभाका
विसरू नका त्या कधी जीवनी,आला जरी कधी प्रसंग बाका
विवाह म्हणजे दोन जीवांचा असतो साधला सुंदर मेळ
युगायुगांचे नाते जपावे, नाही हा दो घटिकांचा खेळ
सासू-सासरे जरी बोचरे, संसारामध्ये दुःख टोचरे
कॅक्टसच्या झाडावर सुद्धा फुलून येते कधी फूल साजरे
सासरची जपताना नाती, दोघांमध्ये फुलते प्रीती
समर्पणाची मनी भावना, विवाहाची रम्य ही नीती
संसाराच्या वेलीवरती जेव्हा सुंदर फुले उमलती
गोडगोजिरी मुले भोवती, संसाराची बाग फुलवती
विवाहाची ही परिसीमा , पती-पत्नीला पूर्णत्व देते
विवाहवेदीवर गुंफल्या नात्याला सुवर्णाची झळाळी येते
