विसाव्याचे स्वप्न
विसाव्याचे स्वप्न
थकून भागून गलितगात्र झालेली मी
विसाव्यासाठी पाठ टेकते...
आपोआप डोळे मिटत जातात
माझी मी राहतच नाही ...
माझ्यातले मी पण हळूहळू जातं थेट परीराणीच्या हातात
उंचच उंच ढगांच्या पल्याड, निळ्या नवलाईत...
जिथे नसते कोणतीही फसवणूक, हेवेदावे अन् बेगडी पण , खाचखळगे अन् आडवळणाने जवळ आलेले जग ...
असतात फक्त निस्वार्थ आशेची किरणे अन माझी स्वतःची स्पेस...
ती मला सफर करवते एका स्वप्निल दुनियेची
ज्या दुनियेची मीच असते अनभिषिक्त सम्राज्ञी ...
या परिराणीला मी बोलावते कायमच माझ्यासोबत जागेपणाच्या राज्यात ...
पण ती आपल्या अस्तित्वाच्या खाणाखुणा दाखवते फक्त स्वप्नांच्या राज्यात...
फक्त स्वप्नांच्या राज्यात...
