देवत्व
देवत्व


हल्ली पावलं तुझ्याकडे वळतच नाही
तुझ्यासमोरून जाताना डोळे अलगद भरून येतात...
अन् तुझी मूर्ती हलल्याचा भास होतो
उगाचच वाटत राहातं माझ्यासारखंच कुणी चालत फिरतंय का तिथे...
कधी वाटतं थेट उभं राहावं तुझ्यापुढे भरल्या डोळ्यांनी...
ओघळणाऱ्या आसवांना न सावरता एकटक बघत राहावं तुझ्याकडे अन् साधावा संवाद आसवांसकटच...
पण असे करायला मन धजावत नाही कारण माझी आसवं तुझ्या डोळ्यातून पाझरु लागतील
आणि तूही माणसासारखाच भासू लागशील जे माझ्याकडे तेच तुझ्याकडेही...
तुझ्यातील 'देवत्व' हाच आशेचा किरण मानत
जगणं सुसह्य करायचंय मला...