विरह - गजल
विरह - गजल


आक्रोशल्या मनाला रिझवायला तरी ये.
गाऊन गीत मजला निजवायला तरी ये.
संसार सावराया तव गात्र राबलेले
जे शेष त्राण गात्री झिजवायला तरी ये.
तनमन उदास झाले बगिचा उजाड झाला.
पाऊस होउनी तू भिजवायला तरी ये.
मी एकटाच उरलो अंधार दाटलेला.
मिणमिण करी दिवा हा विझवायला तरी ये.
बेचैन दर्शना मी, तू एकदा तरी ये.
अतृप्त वासना या थिजवायला तरी ये.
तोडून पाश सारे लावून फास गेली.
मज बेत मारण्याचा शिजवायला तरी ये.
विरहात आज तुझिया प्राणास त्यागतो मी
निष्प्राण देह माझा सजवायला तरी ये.