पावसाळा
पावसाळा
धो धो पडून गेला रानात पावसाळा
फुलवून फूल गेला काट्यात पावसाळा
सांगू कसे कुणाला ते गूढ अंतरीचे
प्रीतीस साक्ष होता प्रेमात पावसाळा
तोडून ती अबोला भेटावयास आली
घेऊन गार वारा ओठात पावसाळा
स्पर्शून आज राणी अंगास वीज गेली
ओल्या तुझ्या मिठीच्या स्पर्शात पावसाळा
तो सूर एक झाला माझा तुझा कधीचा
संगीत वादळांचे गाण्यात पावसाळा
आता नको दुरावा चर्चा नको चुकांची
हासून सांग राणी गालात पावसाळा
आता सखे कुणाचे ऐकावयाचे नाही
घेऊ जगून आता हर्षात पावसाळा
चोरून काळजाला घेऊन आज गेली
सांगून गूढ गेला कानात पावसाळा
*सपना* त रोज राणी भेटावयास येते
ठेवून आज गेली हृदयात पावसाळा

