आठवण
आठवण
छेडते नावेस माझ्या वादळाची आठवण
साद देते साजणीला पावसाची आठवण
मी फुलांची बाग माझी पेटतांना पाहिली
जाळते माझ्या मनाला मोगऱ्याची आठवण
ना जुळले नाते तुझे माझ्या जगाशी साजणी
का गुलाबाला सतावे कंटकाची आठवण
धावतो मागे धुक्याच्या सारखा मी साजणी
तोडते बंधास साऱ्या चुंबनाची आठवण
जीवनाचा पेटला वणवा किती मोठा सखी
जाळल्याने ही जळेना काळजाची आठवण
ढोल ताशे अन नगारे शांततेने वाजले
वाजते छम छम कुठे ती पैजणाची आठवण
*पंकज कुमार ठोंबरे वाशिम*

