घटस्फोट
घटस्फोट
*घटस्फोट*
तुझ्या माझ्यातले अंतर मिटायला हवे होते
तुझ्या सुरात माझे सूर मिळायला हवे होते
जळाली बाग स्वप्नांची विलंब फार झाल्याने
तुला गांभीर्य वेळेचे कळायला हवे होते
सखी डोळ्यात अश्रूंचे तलाव साठले होते
जरा थांबून दोघांनी रडायला हवे होते
तुझ्या मोठ्या अहंकारात स्वप्न राख झाले बघ
सखे प्रेमा पुढे थोडे झुकायला हवे होते
अबोला जीवघेणा तो कधीच संपला नाही
तुझ्या मौनातले कोडे सुटायला हवे होते
कधीही ऐकली नाहीस आर्त हाक तू चंद्रा
तुला आक्रोश लाटांचे दिसायला हवे होते
किती घाई ऋतूंनाही निघून दूर जाण्याची
वसंताने घरी माझ्या रहायला हवे होते
उजेडाला कुठे शोधू अशांत रात्र झाल्यावर
मनाने आणखी थोडे जळायला हवे होते
तुझ्या हातातल्या रेषा सदैव पाहते तू पण,
जरा माझ्या भविष्याला बघायला हवे होते
उशीराने कळाले ना तुलाच अर्थ नात्यांचे
जरा आधी असे काही घडायला हवे होते
*पंकज कुमार उत्तम ठोंबरे*
*कोंडोली वाशिम*
9503717255

