माझे बाबा
माझे बाबा
संकटकाळी नको डगमगू तुम्ही म्हणाला होता बाबा
जोवर तुमचा कर पाठीशी धीर मनाला होता बाबा
सासरास मी सुखात आहे ग्वाही देते आज जरी मी
अखंड चिंता वाहत माझी क्षणाक्षणाला होता बाबा
पाठवतांना मला सासरी अश्रू लपवित होता तुम्ही
शिवाय तुमच्या घोर जिवा का कधी कुणाला होता बाबा
कुस्करले हे फुल कुणीतरी सिंचन तुम्ही केले होते
पोखरते हे हृदयच तुमचे खात जिवाला होता बाबा
फोडच फुटला तळहाताचा जिवापाड जो जपला होता
राहिलाच ना देण्याला जो गंध फुलाला होता बाबा
क्षण सोनेरी जगले होते माहेरी मी आनंदाने
होई जेव्हा आनंदी मी हर्ष तुम्हाला होता बाबा
कठीण समयी खाल्ल्या खस्ता भविष्य माझे घडवत असता
सोपवताना परक्या हाती डाव पणाला होता बाबा
