गणेशवंदना
गणेशवंदना
1 min
453
संत सज्जनास तू सत्वरीच पावतो
वक्रतुंड ईश तू सद्गुणांस भाळतो
त्याच भाविकावरी होतसे तुझी कृपा
भक्तिभाव अंतरी जो मनात राखतो
काम क्रोध लोभही गर्व मत्सरास तू
षड्रिपूस माझिया नित्य दूर ठेवतो
संकटे निवारुनी श्री गणेश या जगी
दुःख दूर सारुनी जीवनात तारतो
दुर्गुणास जो कुणी, दूरदूर लोटतो
तोच आज या जगी सर्व सौख्य भोगतो
मायबाप ठेवतो आपुल्या घरी सदा
पीडितास जाणतो स्वर्ग त्यास लाभतो
स्वार्थ दूर सारुनी हर्ष वाटती जगा
तारण्या अशा जनांस एकदंत धावतो
हे गजानना अता तार संकटातुनी
रोख कोविडास तू कर तुलाच जोडतो.
लाल पुष्पहार तो तव गळ्यात शोभतो
अर्पिता गझल तुला हा अजय सुखावतो.