उन्हातले हात
उन्हातले हात
रान तापलं उन्हात,
भेगा पडल्या धरणीला
कुणबी असा ग राबतो
संग घेऊन कारभारणीला !!१!!
काळवंडले ते हात
सदा राबले उन्हात
धरील आभाय ग छाया
उगा आणावं मनात. !!२!!
पाय चिरले उन्हानं
जगतो रोजच मरण
नसे कष्टाला रे जोड
करण्या उदरभरण !!३!!
लाकडं घडवतो सुतार
वाणा शिवतो चांभार
सेवा पुरवतो अवघ्याना
चिखल वळवी कुंभार !!४!!
दाढी डोकी करण्यापाई
उभा ठाकतो न्हावी
कुणब्या सोबतच देवा
त्याची बरकत व्हावी !!५!!
घेई भारा तो शिरी
किती फोडी ती हाकाऱ्या
फनी गे कंगा गे
मारी गल्लोगल्ली फेऱ्या !!६!!
तान्ह बांधलं पाठीशी
काखी घेऊन गाठोडं
आग लागली पोटाला
दादला असा ग पेताड !!७!!
