उगवायचे आहे मला
उगवायचे आहे मला
उगवायचे आहे मला
सांगा क्षितिज आहे कुठे?
का माझ्यातील सूर्य बसला पाघरूनी
काळोख पुटे?
गंगेवर वाढणारी बेफाम बेमुर्वत प्रजा
ओरबाडून गब्बर होतो वस्तीचा बेनाम राजा
जो तो आपली वाट शोधतो जायचे तरी आहे कुठे?.....१
स्वातंत्र्याच्या पूर्वी इथे क्षितिजावर किरण होते
नव स्वप्नांचे इंद्रधनुष्य पहाटेच उगवत होते
आज दिसे ना शोभा ती नजरेचे पल्ले थिटे....२
उडी मारून मारणार किती बेडकासारखी पाण्याबाहेर
स्वतःचीच वाजवी टिमकी खिशातल्या नाण्यांचा कुबेर
स्वतःच गळा कापायची घेतली आम्ही कंत्राटे.....3
कुबडीविना चालणे कठीण लांब जावून करायचे काय?-
आणि तिथे गेल्यावरही होणारच की "हाय हाय"
पायातले अवसान गेले हातसुद्धा झाले थोटे.....४
धमनीतल्या रक्त नदीस, सागर कधी भेटेल का?
मेंदूतल्या ठिणगीने बाहेर वणवा पेटेल का?
पुतळा थोरांचा बघता माथ्यावर कावळा शिटे....५
गंजून भुगा झाले विचार, प्रयत्नांचे झाले भंगार
सूर्य गोठला बर्फाने कुठेच दिसेना अंगार
चुकून कुणी पेटलाच तर फुटते त्याचेही माथे...६
झाकोळ आहे भोवताली चाचपडून चालेल का?
सूर्यकुळात जन्म घेवून काळोखाशी तडजोड का?
उगवायला हवे मला व्हायलाच हवे मला रीते....७
