तुला पाहिले मी
तुला पाहिले मी
तुला पाहिले मी
तुला पाहिले मी आई
रातदिन कष्टताना
पांढऱ्या कपाळाने
संसारगाडा ओढताना
विधवा म्हणून अवहेलना
हसत पचविणारी नारी
लेकरांच्या भविष्याचीच
स्वप्न जपलीस उरी
भेकड वासनांध नजरा
तुझ्याभोवती घालायच्या पिंगा
संघर्षाने भेदक बनलेली नजर
दाखवायची त्यांना ठेंगा
आई कसं काय जमलं गं
आयुष्याचं विष पचवणं
फाटकी ठिगळ जोडताना
चारित्र्य जपून जगणं
कधी कमकुवत मनानी
ढासळली नाहीस जीवनी
लेकरांना पोरकं करण्याची
निती नव्हती गं तुझ्यामनी
आई तुला पाहिलं मी
दुर्गा कालिकेच्या रुपात
तुझ्या पुण्याईनंचं गं माई
आम्ही सुखानं नांदतोय जीवनात!
स्मिता मुराळी, सोलापूर
