विधवा
विधवा
नियतीच्या फेऱ्यात
कोसळले आभाळ
अकाली वैधव्याने
पांढरे झाले कपाळ
वास्तवाचे चटके
मुकाटपणे सोसावे
स्वतःला सावरत
लेकरांना पोसावे
घरदार सांभाळत
दिवस पळ पळतो
रात्री एकाकीपणा
वैरी बनून छळतो
तारुण्यातलं वैधव्य
जगणं अवघड वाटे
वासनांधाच्या नजरा
बोचणारे जहरी काटे
चारित्र्याची कसोटी
शरीराची मारावी भुक
दगडाच्या काळजात
संवेदनाच बनते मुक
लेकरांसाठी जगताना
ती धुंडाळते जीवनवाटा
जगू द्यावे तिच्या परीने
वाटेत पेरु नये काटा!