रंगात रंगू या
रंगात रंगू या
पाना फुलांचे बनवुया रंग
रंगात रंगून होवू चला दंग||धृ||
गुलाबांचे रंग किती किती छानं
हिरव्यागार रंगाची झाडाची पानं
पिवळधम्मक झालं झेंडूचं रानं
रंगांनी या रंगवु सर्वांचं अंग.......||१||
केशरी फुल पळस तीन पानी
निळ्या रंगाची गोकर्ण राणी
पानफुल रंगात मिसळू पाणी
रंगासंगे होई द्या सुगंधित अंग.......||२||
कृत्रिम रंगानी होई नुकसान
टाळू असे रंग ठेवू थोडं भान
निसर्ग साक्षात रंगांची खाण
नैसर्गिक रंगाचा करुया संग........||३||
आनंद उधळीत रंगानी यावे
सप्तरंगी रंगात सर्वांनी न्हावे
सर्वांचे जीवन रंगमय व्हावे
ऐक्याच्या रंगाचे खेळुया रंग.........||४||
रंगुया नाचूया गाऊया गाणी
साऱ्यांनी जपून वापरु पाणी
नको पण खूप निसर्ग हानी
निसर्गरक्षण हा बांधूया चंग.......||५||