तुझी सोबत
तुझी सोबत
माझ्या धन्याचे सपान
चल राजा पूरी करू,
नांगरून शेत सार
चल नांगर चालवू ...
बीज पेरते पेरते
लक्ष्मी कष्टते रानात,
साथ धन्याची सोबती
स्वप्न पहाते मनात...
आली पाऊस पहाळी
रान सारे भिजवले,
धरणीच्या भूगर्भात
कोंब कोंब अंकुरले...
जीव इवलासा परी
आशा जीवनी दावते,
माझ्या बळीच्या घामाचे
मोती रानात उगते...
काटा रुतला पायात
लाल रगात सांडते,
साथ सोबतीनं माझ्या
दुःख हसत रांधते...
उभं नभ पांघरून
खाली भुई अंथरली,
साथ सोबतीनं तुझ्या
मोती घामाचे जाहली...
