आला श्रावण
आला श्रावण


हिरवा शालू नेसून आला
आला माझा श्रावण
साजणी बाई
नवलाईने नटला मनभावन
झुळझुळ वाहे नदी नाले अन्
खळखळ वाहे पाणी
कोकीळ गातो मंजुळ गाणी
सुगंधली रातराणी
सण, उत्सव घेऊन आला
आला माझा श्रावण
साजणी बाई
नवलाईने नटला मनभावन
हरित पल्लवी, तृणपाती
वृक्ष लताही डोले
रंगीत गंधित पुष्पलता ही
वृक्ष लतांवर उमले
सुगंधी अत्तर लावून आला
आला माझा श्रावण
साजणी बाई
नवलाईने नटला मनभावन
मखमल मलमल हिरवी धरती
नववधू जणू शोभते
मेघ बरसता काळे काळे
चिंब धरा ही भिजते
श्रावण सरी या बरसत आला
आला माझा श्रावण
साजणी बाई
नवलाईने नटला मनभावन