तीळगुळ
तीळगुळ
ना जात कोणतीही, मानव्य हेच मूळ
राखू जगी सलोखा, घ्या आज तिळगूळ
ना गोड बोलण्याला, येई मुळीच खर्च
संदेश हाच देते, मंदिर, मशीद ,चर्च
तीऴ स्नेह दाखवितो, गुळ आणतोच गोडी
सेतूच माणसांना, आपापसात जोडी
भिंती नकोत आता, रस्ते नकोत बंद
माणुसकीस पोषक, अंगी हवेत छंद
करू या सुखी जगाला, वाटीत जाऊ सुखं
प्रेमाची आज जगता, सर्वात मोठी भूक
मारून माणसांना, अंती न काही मिळते
मग सूडभावनाच फक्त, साऱ्या जगास छळते
सूर्यास आजच्या या, ठेवू समोर ग्वाही
सुख वाटण्यास आता , किंचित उशीर नाही
वैश्विक सत्य जाणू, सुख देत जाई शांती
संक्रांतीच्या निमित्ते, होवो विचार क्रांती !
