स्वर्गातील फुल - गुलमोहर
स्वर्गातील फुल - गुलमोहर
चटकदार लालबुंद रंगांनी बहरलेला
वैशाखाच्या रणरणत्या उन्हात फुललेला
नाजूक मनमोहक हिरवी-पोपटी पाने
सौंदर्याचा मोहक साज जणू सजवला
लाल-केशरी पाकळ्यांवर आकर्षक रेषा
जशी पांढऱ्या-पिवळ्या रंगाची बेधुंद नशा
रंग उधळत पिळदार खोडांचे वृक्ष उभे
'स्वर्गातील फुल' असे प्रसिद्धी पावलेला
मकरंद शोधतो मधमाश्यांचा थवा
पराग कणांवर घेती पक्षीही धावा
फुलपाखरांचे ते अवखळ भिरभिरणे
शीतल छायेनी सगळ्यांचे मन मोहवलेला
सुगंधाने वातावरणात गारवा आणणारा
भर उन्हात फुलांची चादर अंथरणारा
प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा न डगमगणे
असे प्रण करीत स्वतःचे अस्तित्व टिकवलेला
प्रदूषणाला मात देत शहराची शोभा वाढवणारा
मरगळलेल्या जीवांना ऊर्जा प्रदान करणारा
सजीवतेचे साक्षात रूप, गुलमोहर नाव ज्याचे
मनाला या माझ्या एक अव्यक्त गवसणी घातलेला
