स्वातंत्र्यवीर
स्वातंत्र्यवीर
अष्टभुजा देवीला स्मरूनी , शपथ घेतली मोठी
चला तोडू या सर्व शृंखला , समर्थ भाषा ओठी
अभिनव भारत हेच मानले , तुम्ही सदा गणगोत
कोट्यावधी युवकांच्या मनीचे , तुम्ही प्रेरणास्त्रोत
मरण यातना भोगुनी दिधला, प्राणपणाने लढा
मुजोर इंग्रज हबकून गेला , असा शिकविला धडा
काळकोठडी अंदमानची , केलीत तुम्ही पवित्र
दगडाच्या भिंतीत ,कोरले स्वतंत्रतेचे चित्र
सागरासही धडकी भरली , पाहून तुमची छाती
तुमच्या स्पर्शे पुलकित झाली , भारतभूची माती
हसत भोगले देशासाठी , तुम्हीच काळे पाणी
तरुणांनाही स्फूर्ती ठरली , तुमची अमोघ वाणी
रत्नागिरीच्या राम मंदिरी , केलीत प्रेमळ क्रांती
पतित पावन करून दिधली , लक्ष मनांना शांती
बंदूक येथे हतबल झाली , पाहुनी तव लेखणी
जीवनयात्रा यज्ञकुंड अन , पारदर्शी देखणी
विचार बैठक भक्कम तुमची , उपमा नाही धीरा
पुन्हा पुन्हा मी झुकतो चरणी , स्वातंत्र्याच्या वीरा !!
