स्वातंत्र्य
स्वातंत्र्य
कुठे हरवलं स्वातंत्र्य माझं
खूपदा मनी दाटतं
माझ आयुष्य असेच संपेल
नेहमी असंच वाटतं॥१॥
किती समजवायचं मनाला
किती करायचं शांत
मोकळेपणा मिळवण्याची
गरज आहे नितांत॥२॥
दुसऱ्यांच्या विचारांचं
स्वागत नेहमी करायचं
आपल्या माणसांसाठी मात्र
मनातल्या विचारांनी हरायचं॥३॥
कितीदा वाटतंय विचारावं
खोदून खोदून कोणी
काय काय लपलं आहे
तुझ्या निर्मळ मनी॥४॥
मलाही वाटतं वावरावं
या मोकळ्या नभात
कधी तरी सहभागी व्हावं
या भारावलेल्या जगात॥५॥
मांडावी स्वतःची मतं
परखडपणे चारचौघात
मिसळून जावं जगाच्या
धावत्या या ओघात॥६॥
अडकून राहिलेल्या या मनाला
कधी उभारी मिळेल
माझी द्विधा मनःस्थिती
कधी कुणाला कळेल॥७॥
