स्वातंत्र्य
स्वातंत्र्य
स्मरण करूया आहुती दिलेल्या भारतभूच्या पुत्रांचे,
स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे।।धृ।।
एक दिवा पेटवू त्यांच्यासाठी ज्यांच्यामुळे आपला अंधार मिटला,
ज्यांच्या बलिदानामुळे आपला वनवास फिटला,
मिटवुनी निराशा पुसू डोळे वंचितांचे,
स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे।।१।।
होऊ यशस्वी प्रत्येकजण, उंच करू देशाची शान,
अख्ख्या जगात वाढेल भारतभूचा मान,
अवघे होऊ एकजण पुसुनी राजकारण जातींचे,
स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे।।२।।
एकसंघ हा देश आपुला येथे घडतात वीर पराक्रमी,
जन्मते गुणवत्ता येथे नसे कशाचीच कमी,
पावित्र्य जपावे नद्या, सागर आणि उंच पर्वतांचे,
स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे।।३।।