सोहळा वर्षेचा
सोहळा वर्षेचा


दशाक्षरी
भास्करतेजे अवनी पोळे
रत्नाकरही तप्त उसळे
नभाकडे धरती विनवे
जलदाने जलदान द्यावे (1)
आर्जव धरेचे परिसूनी
नभा व्यापिले घनमालांनी
वेगाने मृगधारा झरती
तृषार्त धरती शांतविती (2)
घन घन मेघांचे गर्जन
संतत धारांची उधळण
अनंत हस्ते वर्षति धारा
तृप्त जाहला निसर्ग सारा (3)
जलवर्षावे लता डोलती
झुलत सुखाने तृणपाती
धरेवरी हिरवाई साजे
इंद्रधनूचा गोफ विराजे (4)
जलधारांचे थांबे नर्तन
खग डोकावे कोटरातून
भिरभिरती जल प्राशूनी
झेपावती ते गगनांगणी (5)
ऋतुमागुनी ऋतू सरती
सृष्टीमाते सुखावून जाती
कालचक्र हे असेच चाले
निसर्गराजा तथास्तु बोले (6)