सण हा लईभारी
सण हा लईभारी
सण हा मस्तीचा लईभारी
घेऊनी आली फाल्गुनाची स्वारी
सप्तरंगात न्हाऊनी वसंत हा फुलला
निसर्गाची किमयाच पहा न्यारी...
फाल्गुनोत्सवातले हे रंग विभिन्न
एकमेकांच्या रंगात जणु रंगुनी गेले,
असेल काही वैर गतवर्षीचे
त्यांनी आपल्यातच सामावुनी घेतले...
निसर्गाने रंग उधळले
वाऱ्यासंगे ते चहुदिशांना पसरले,
लाल गुलालाचा स्पर्श जणु हा गाली होताच
सख्या साजणीचे प्रेमही नव्याने फुलले...
भरूनी पिचकारी मारूनी तिजवरी
रंगुनी रंगात ह्या होती दोघे स्वैर स्वच्छंद,
भान ठेवुनी संस्कृती परंपरेचे
पसरवतील सर्वत्र आज प्रेमाचा आनंद...
रंग हे नात्यांचे, हर्षाचे अन् उत्साहाचे
कवेत आज जोपासले क्षण त्या
मौजमस्तीच्या आठवणींचे,
सप्तरंगात न्हाऊनी साजरे करूया
दैवी अनंत प्रेम असे ते कृष्ण अन् राधेचे...

