सामान्य माणूस
सामान्य माणूस


खर म्हणजे
जो पर्यंत काही 'वाटत असत'
तो पर्यंतच माणूस
जिवंत असतो...
निर्विकार व्हायला
मी काही साधू नाही...!
प्रत्येकाला कस जमेल
निरपेक्ष वागणं....?
जन्मा सोबतच
विश्वास घेऊन येतो
श्वास घेण्यासाठी
प्राणवायू मिळण्याचा,
माय बाप भाऊ बहीण
आपली काळजी घेणार
सांभाळ होणार
लाड पुरवणार... याचा...!
आशा अपेक्षा ईच्छा,
विश्वास भावबंध नाते,
यानेच लगडलेले असते
अर्भक....!!
मग किती ही स्वच्छ करा
आयुष्यभर चिकटलेलेच राहते..!
आण
ि का असू नये..?
मनुष्यजन्म लाभलेल्या
देवादिकांनाही
चूकला नाही... कर्मभोग
मी तर माणूस आहे
माणूस म्हणूनच जगायचे
माणूस म्हणूनच मरायचे
मला नाही करायचा
प्रवास
सामान्या कडून असामान्याकडे...!
मी हसणार, रडणार,
बोलणार, अबोला धरणार,
रागावणार, प्रेम करणार,
लक्षात ठेवणार, विसरणार...
भावनाशून्य माणसाला
एकतर देवत्व प्राप्त होत
नाही तर पाषाण - हुदय...!
मला स्वर्गातही जायच नाही
नरकातही नाही....
माणूस आहे
माणूस म्हणून जगायचे आहे ....!!!!