आता वेळ नाही....
आता वेळ नाही....


हां, आता अडखळतात
पाय जरासें,
समज आली आहे नां
चांगलं आणि वाईटाची...
आताशा मनात
एक भिती कायम राहते
नि मग स्वतःलाच विचारतो
हे, योग्य की अयोग्य...?
सूर ही ऐकू येत आहेत
काही स्पष्ट काही अस्पष्ट
अर्थ ही लागतोय,
दिवस कलला की,
पाखरे घराकडे धाव का घेतात, याचा...
लहाणपणी ऐकले होते
ग्रहण काळा आधी
वेध लागतात म्हणून,
साधारण पन्नाशी नंतर
असचं काहीस होत का...?
काहीही असो,
पण आता मागे वळून नाही पहायचे
उपयोग पण नाही,
सापासारखी आपल्याला
कुठे कात टाकता येते...?
आता वेळ ही नाही माझ्याकडे
बोलण्याचे अर्थ लावायला
वागण्याची मिमांसा करायला,
खरे असो की खोटे असो
पाप असो की पुण्य असो
कृष्णार्पणमस्तू....!!